बेफिकीरी नको, पावसाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

#कामाची माहिती

Spread the love

थिंक टँक डेस्क : राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस चांगलाच बरसत आहे. यंदा पाऊसमान चांगले असल्याने बळीराजा खूश आहे. मात्र, कोरोनाच्या (Covid-19) थैमानानंतर संकटात भरीस भर म्हणून विविध पावसाळी आजार डोके वर काढताहेत. शहरे व ग्रामीण भागातील दवाखाने साथीच्या तसेच संसर्गजन्य रुग्नांमुळे भरून गेल्याचे चित्र आहे. यावर मात करण्यासाठी पावसाळ्यात आपल्या घरातील ज्येष्ठ, बालके तसेच इतर सर्वांचे आरोग्य कसे जपावे, याची माहिती देणारी ही स्पेशल स्टोरी..


बदलत्या वातावरणाचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे काही प्रमाणावर काळजी घेणे आवश्यक आहे. ही काळजी नेमकी कशी घ्यायची?

हात – पाय स्वच्छ धुवावेत : घराबाहेरुन आल्यावर हात पाय निटपणे धुवावेत. प्रवासात, बस, ट्रेनमध्ये चढता- उतरताना, ऑफिसमध्ये, मार्केटात, शाळेत, कॉलेजात आपल्या नकळत ब्यॅक्टेरिया जमा करत असतात. त्यामुळे बाहेरून घरी पोचल्यावर, जेवणाआधी किंवा काही खाण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. सॅनिटायझरचाही याकामी वापर करावा.

उकळून प्यावे पाणी
पावसाळ्यात नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणीस्त्रोताच्या ठिकाणी जलप्रदूषण आपोआप होत असते. ही बाब नवीन नाही. अलिकडे नवनवीन संसर्गजन्य आजारांमुळे स्वच्छ पाण्याचा मुद्दा महत्वाचा ठरत आहे. स्वास्थ्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी, शरीरातील toxins चा नीट निचरा होण्यासाठी शरीराला साधारण ३ लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसभरात ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. हे पाणी स्वच्छ फिल्टर्ड असावे किंवा ते उकळून गाळून घ्यावे. कोमट पाणी पिणेही उत्तमच.

डासांची वाढ थांबवा : पावसाळ्याच्या दिवसात डासांची वाढ झपाट्याने होते. डासांपासून सुरक्षेची काळजी घेताना डासांना दूर ठेवणारे क्रीम [mosquito repellent ] चा वापर करू शकता. घरात किंवा घराच्या आसपास पाणी फार काळ साचणार नाही ह्याची काळजी घ्यावी. साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त होते. डासांमुळे डेंगू मलेरियासारखे आजार पसरतात. रात्रीच्या वेळेस घरातील दारे, खिडक्या बंद ठेवल्यास डास आत येणास प्रतिबंध होईल.

उघड्यावरील अन्न खाणे टाळा : उघड्यावर बनवलेले अथवा ठेवलेल्या पदार्थांवर माशा, धूळ जमा होते. बॅक्टेरियाचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते हे पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले पाणी नीट गाळलेले, उकळलेले नसते. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या खाण्यावर माश्या बसून ते अन्न दुषित करतात. त्यामुळे बाहेरचे अन्न खाने टाळावे. असे अन्न सेवन केल्याने फूड पॉयझनिंगही होऊ शकते.

हलका आहार : पावसाळ्यात सकस, शुद्ध, पोषक अन्नच खावे. हे अन्न शक्यतो घरचेच हवे. भाज्या, फळांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत होते. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपल्या रोजच्या आहारात भरपूर समावेश करावा. मसाल्याचे पदार्थ सुद्धा पचनाला मदत करतात. पण पावसाळ्यात खूप तिखट पदार्थ खाणे टाळावे. फळे, पालेभाज्या पावसाळ्यात व एरवीही धुवूनच खाव्यात.

त्वचेची काळजी : पावसाळ्यात त्वचा जास्त ओली किंवा कोरडी पडू शकते. थंडीत ती तडकते. भेगा पडतात. त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी जेवणात कडू भाज्यांचा समावेश करा. जसे की मेथी, कार्ले, कडुलिंब इ. ह्या भाज्यांमधील रसायने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. चेहऱ्याचा तवटवीतपणा टिकून राहण्यासाठी मदत होते. ह्या पदार्थातील रसायनांचे अनेक फायदे शरीराला होतात. भाज्या ताज्या असतील तर उत्तमच.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार : रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्यावा. लसूण हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे सर्दी खोकला, ताप अशा पावसाळी आजारांपासून सहज संरक्षण मिळते. मसाल्याचे इतर पदार्थ देखील रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त ठरतात. मिरपूड, आले, हिंग, हळद, कोथिंबीर, जीरे, लिंबू हे घटक पचनसंस्था नीट काम करण्यासाठी देखील मदत करतात. याचा मात्र संतुलित वापर हवा.

तळलेले, मांसाहारी पदार्थ बेतानेच : पावसाळ्यात पचनसंस्था थोडी अशक्त झालेली असते. त्यात पचायला जड पदार्थ खाल्ले तर आजारी पडण्याची शक्यता असते. म्हणून पचायला जड असणारे पदार्थ टाळावेत.

आंबट पदार्थही चवीपुरतेच : पावसाळ्यात चिंच, लोणच, चटणी अशा आंबट गोष्टी टाळाव्यात. ह्या पदार्थांमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढून [ water retention] शरीराला सूज येण्याची शकता असते.मिठाचे प्रमाण शक्य तेवढे कमी ठेवावे. आंबट खालल्याने पावसाळ्यात खोकवा लवकर धरतो.

शितपेये, आईस्क्रीम टाळा : अलिकडे पावसाळा व थंडीतही आईसक्रीम खाण्याची फॅशन आलीय. हे ऋतूला धरून नाही. पावसाळ्यात शीतपेय घेणे टाळावे. शीतपेये शरीरातील खनिज साठा कमी करतात. त्यामुळे शरीरातील enzyme activity कमी होते. ज्यामुळे पचनसंस्थेवरचा ताण वाढतो. गरम सूप, हर्बल टी, ग्रीन टी अशी पेय घेणे जास्त चांगले.

हेल्थ इज वेल्थ : आरोग्य हिच संपत्ती असल्याचे वारंवार सिद्ध होते. कोरोना काळात ते अधिक ठळकपणे समोर आलेय. तेव्हा आरोग्य जपले तरच आपण ठिक अन्यथा अनर्थ अटळ हेच अंतिम सत्य आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका