‘बाबासाहेब’ हा आपला बाप खराच, पण कोणाच्या बापाची इस्टेट नव्हे : संजय आवटे
संजय आवटे
पश्चिम महाराष्ट्रातल्या कामगारनगरीत माझं व्याख्यान सुरू होतं. ही गोष्ट तीन वर्षांपूर्वीची. तेव्हा मी ‘साम टीव्ही’चा संपादक होतो. व्याख्यानाच्या उत्तरार्धात मी आक्रमक भूमिका घेतली. किंवा, रादर भूमिका घेतली! भाषण सुरू असतानाच, शेवटच्या रांगेतून गोंधळ सुरू झाला. शिव्यांची जाहीर लाखोली सुरू झाली. मी शांतपणे माझं व्याख्यान पूर्ण केलं.
पण, वातावरणात तणाव होता.
व्याख्यान संपलं, तेव्हा रात्रीचे साडेदहा झालेले. सगळे श्रोते निघून गेलेले. आयोजकही प्रवासखर्च वगैरे देऊन अदृश्य झालेले. माझे कथित चाहते- समविचारी परिवर्तनवादी, समाजवादी, गांधीवादी वगैरे वगैरे मित्र खुणेनंच ‘भारी झालं भाषण’ वगैरे दाद देऊन गायब झालेले.
मी ड्रायव्हरसोबत बाहेर गाडीजवळ आलो, तेव्हा तिथं चिटपाखरूही नव्हतं. सभागृहाचे दिवेही बंद. काही मिनिटांत हिंदुत्ववादी कार्यकर्ते वाटणारे पाच – सहा तरूण तिथं आले. आणि, त्यांनी राडा सुरू करण्याचा प्रयत्न आरंभला. आमची बाचाबाची सुरू होती. आता हे प्रकरण चिघळणार असल्याचे दिसत होते.
तेवढ्यात बाइकवरून आणखी काही कार्यकर्ते माझ्या आजूबाजूला येऊन उभे राहिले. मी मनात म्हटलं, ‘हे यांचेच लोक असणार!’
पक्षीय अंगाने, ते त्यांच्याच जवळचे होते. रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाचे ते कार्यकर्ते होते. त्यांनी माझ्याभोवती कडे केले. आणि, त्या राडाबाजांना त्यांनी हाकलून लावले.
“सर, तुम्ही भाषणात आमच्या साहेबाला लई धुतलं, पण तरी तुमचं भाषण आवडलं. कारण, बाबासाहेब तुम्ही मांडले. आम्ही तुमचे फॅन आहोत. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमची मजबुरी आहे, म्हणून आम्ही आज यांच्यासोबत आहोत. पण, आमचाही बाप एकच आहे. तो तुम्ही आज सांगितला!”
असं म्हणत त्यांनी सात-आठ बाइकच्या संरक्षणात मला हायवेपर्यंत सोडलं. जाताना फोन नंबर दिला. कुठंही काही अडचण असेल, तर फक्त एक कॉल करा. अर्ध्या रात्री येऊ, असं आश्वस्त केलं.
***
हे फक्त आंबेडकरवादीच करू शकतात.
असे लढाऊ तुम्हाला अन्य कोणी सापडणार नाही. बाबासाहेबांवर ते जे प्रेम करतात ना, त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. बाबासाहेबांसाठी मरायलाही तयार होतील, अशी कमिटमेंट आहे ही. शिवाय, यापैकी बहुतेकजण तुम्हाला बाबासाहेब वाचलेले सापडतील. म्हणजे, तुम्ही जरा टोलवाटोलवी केलीत की, असा एखादा माणूस तुम्हाला अचूक संदर्भ सांगेल की जो माणूस तुम्हाला तोवर सामान्य भासला असेल!
तुम्ही प्रेमाच्या अनेक गाथा ऐकल्या असतील. पण, बाबासाहेबांच्या अनुयायांचे बाबासाहेबांवर असणारे प्रेम ही अद्भुत प्रेमकथा आहे.
आणि, तुम्ही कोणे एकेकाळच्या अस्पृश्य जातीत जन्मल्याशिवाय बाबासाहेब म्हणजे ‘बाप’ का, हे तुम्हाला समजणारच नाही.
जिथे जनावरांपेक्षाही भयंकर स्थितीत तुम्ही होतात. उकिरड्याचे पांग फिटतील, पण या जातसमूहाचे काही खरे नाही, अशी स्थिती होती. आक्रोश आणि वेदना याशिवाय काहीच पदरी नव्हते. अशी कोटी कुळे ज्या माणसाने उद्धरली, त्याविषयी भक्तीशिवाय आणखी कोणती भावना असूच शकत नाही. शिवाय, कोणताही हिंसाचार नाही, सशस्त्र लढा नाही. मानवाधिकार, प्रज्ञा, शील, करूणा आणि कायद्याच्या जोरावर या माणसाने क्रांती घडवली. ‘मनुस्मृती’ नावाचा प्रस्थापित कायदा नाकारला आणि त्यानंतर अवघ्या दोन दशकांत ‘संविधान’ नावाचा नवा कायदा या देशाला दिला.
विषमतेच्या खाईत होरपळलेल्यांनाच समतेचे खरे महत्त्व समजणार! पिढ्यानपिढ्यांच्या गुलामीचे साखळदंड तुटतात, तेव्हा स्वातंत्र्याचे, बंधुतेचे मोल कळणार. बाबासाहेब नावाच्या माणसामुळं हे सगळं घडलं.
त्यामुळे बाबासाहेबांविषयी असणारे हे प्रेम, हा भक्तिभाव अगदीच स्वाभाविक आहे. शिवाय, हे काही फार पूर्वी नाही घडलेले. बाबासाहेब जाऊन ६५ वर्षेही नाहीत उलटलेली. बाबासाहेबांना ‘याचि देही’ पाहिलेली माणसं आहेत अजून.
आपल्या बापजाद्यांनी काय भोगलंय, हे पाहिलेली पिढी आहे अजून.
बाबासाहेबांनी जे केलं, ते सगळ्यांसाठीच. पण, नादान व्यवस्थेनं त्यांना सगळ्यांचा नेता नाही होऊ दिलं.
बाकी सोडा, अरे, प्रामुख्यानं ज्या हिंदू मायमाऊलींसाठी बाबासाहेबांनी मंत्रिपद सोडलं, त्या महिलांच्या मनात तरी कृतज्ञता आहे का बाबासाहेबांच्याविषयी? ज्या व्यवस्थेनं नवरा मेल्यावर बाईला जाळलं, केशवपन केलं, बेघर केलं, जिवंतपणी गुलामाचं जगणं दिलं, ती बाईही याच व्यवस्थेला शरण जात, बाबासाहेबांना नाकारत असेल, तर काय करायचं? इथली बाई कोणत्याही जातीची असो, तिनं ज्योती आणि साऊचा, भीमाचा आणि संविधानाचा जागर करायला हवा. पण, तीही जातीच्या पुरूषी आयकॉनांच्या दिशेनं जाते, तेव्हा तिची परवड अटळ असते. जातपितृसत्तेचा लढा वेगळा नाही, हेच तर बाबासाहेब सांगत राहिले. म्हणून, हिंदू कोड बिलासाठी आजारपणातही आग्रही राहिले. त्यापूर्वी र. धों. कर्व्यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ची सोबत देत राहिले. मुलींना माहेरच्या इस्टेटीत वाटा आणि सासरीही अधिकार, हे आज जे अजूनही कागदावर वा प्रक्रियेत आहे, ते बाबासाहेब तेव्हा सांगत होते. हिंदू महिलांसाठी ते बाबासाहेब प्राण पणाला लावत होते, जे तेव्हा बुद्धाच्या वाटेवर होते.
पण, ‘आरक्षणामुळे जात घट्ट होते’, असं म्हणणा-या काही सवर्ण बायका (आणि, अर्थातच पुरूष) आजही आहेत, त्यांना हे समजत नाही की, आरक्षणामुळे जात नाही आलेली. ‘जात’ होती, म्हणून आरक्षण आलंय. आरक्षणाच्या राजकारणाला माझाही विरोध आहे, पण सामाजिक न्यायाचं तत्त्व म्हणून हा ‘सकारात्मक भेदभाव’ अपरिहार्य आहे. आणि, तो जगभर आहे! आता या विषयावर नवी न्यायालयीन लढाई सध्या सुरू झाली आहे. त्यावर विस्ताराने लिहिनच.
मला परवा एकानं विचारलं, ‘पण किती दिवस राहाणार आरक्षण मग?’ मी म्हटलं, ‘जोवर गोखले थोर आणि कांबळे सामान्य’ हे तुमच्या मनातल्या नेणिवेत आहे, तोवर. जोवर, ‘जय भीम’ म्हणजे आपल्याशी संबंध नाही असे तुम्हाला वाटते, तोवर. मी तर म्हणेन, पूर्वी अस्पृश्य असलेला बाप आयएएस असो वा मंत्री, त्यांच्या मुला-मुलींना आरक्षण मिळायला हवं. (हे भावनिक अंगानंही म्हणतोय. कारण, बापामुळे त्यांना बाकी ॲक्सेस मिळेल. पण, या सामूहिक नेणिवेचं काय करायचं?) मराठा वा ओबीसींशी तुलना होऊ शकत नाही. कारण, पूर्वीच्या अस्पृश्यांचा मुद्दा या संदर्भात अत्यंत वेगळा आहे. आणि, तो केवळ आर्थिक निकषांवरचा नाही, हे समजून घेतलं पाहिजे.
त्यामुळं मराठ्यांना शिवरायांबद्दल, ब्राह्मणांना सावरकरांबद्दल वाटणं आणि पूर्वीच्या अस्पृश्यांना बाबासाहेबांबद्दल वाटणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. (महापुरूष जातींच्या पल्याड आहेत, असं म्हणतानाही…!)
***
आणि, तरीही पुढं जावं लागणार आहे. बाबासाहेब तेव्हा काळाच्या पुढे होते, म्हणून ही क्रांती होऊ शकली. आपण का एवढे मागे आहोत?
बाबासाहेबांचा इस्टेटीसारखा वापर करणारे क्षणभर जाऊ द्या. असेच तर आपल्या शिवबाचे झाले आणि गांधीबाबाचेही.
बाकी सोडा, पण आपल्याच नव्या पिढीला आता बाबासाहेबांची पोथी झालीय, असं वाटू लागलंय. कारण, सर्वसमावेशक ‘सक्सेस स्टोरी’ म्हणून आपण ती कधी प्रेझेंटच नाही केली. बहुआयामी पद्धतीनं मांडणी नाही केली. बाबासाहेबांना घट्ट मिठी मारून, सगळ्या जगापासून तोडलं आपण बाबासाहेबांना. म्हणजे, व्यवस्थेच्या नादानपणापेक्षा तुमचा नादानपणा अधिक.
अरे, तुम्ही बाबासाहेबांचे वारसदार आहात. अपेक्षा तुमच्याकडूनच असणार ना! हेडगेवारांच्या अनुयायांकडून नव्हे. मुळात, मुद्दा जातीचा नाही. मुद्दा लिंगाचाही नव्हे. अवघ्या मानवतेचा मुद्दा आहे. आणि, बाबासाहेब हे मानवजातीचे महानायक आहेत. आज तरी आपण हे सांगणार की नाही? त्यासाठी पुढाकार घेणार की नाही?
संविधान जाळले की तुम्हाला त्रास होतो.
पण, संविधानाच्या नावानं माणसं जाळली जातात. तरी, बाबासाहेबांचं नाव घेणारे नेते, या दंगलखोरांसोबत उभे असतात!
संविधानाची पायमल्ली झाल्यावर बाकी कोणीच बोलत नाही, हाही तुमचा गैरसमज आहे. प्रतिकात्मकता सोडा, पण आज संविधानाच्या बाजूने कोण उभे आहे?
‘गुजरात फाइल्स’साठी प्राणांची बाजी लावणारी राणा अय्युब तुमची नाही?
संविधान बदलू पाहाणा-यांना गारद करणा-या प्रशांत भूषणची परवाची ती कृती भूषणावह नाही?
एका साध्या सत्यासाठी नोकरी वगैरे सगळं सोडणारा निरंजन टकले तुमचा नाही?
या सगळ्या परिस्थितीचा आवाज होणारा रवीश महत्त्वाचा नाही?
हे सगळं मांडत, भांडत राहाणारा आपला आनंद पटवर्धन उपयोगाचा नाही की या धर्मसत्तेला आव्हान देणारा दाभोलकर नावाचा वेडा ‘डॉक्टर’ कामाचा नाही? ‘लॉकडाऊन’च्या काळात स्थलांतरितांची माय झालेली मेधा पाटकर वा उल्का महाजन आपली नाही?
डॉ. आंबेडकरांच्या संदर्भातील वादग्रस्त व्यंगचित्राच्या निमित्ताने ज्यांना एकेकाळी आपण ‘एनसीईआरटी’चा राजीनामा द्यायला लावला, ते योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर आज संविधानाचीच लढाई लढत आहेत की नाहीत?
खूप आहेत हो सोबती.
पण, तुम्ही बघा तर अवतीभवती.
तुम्ही बाबासाहेबांसोबत स्वतःला क्वारंटाइन केलंत. सगळ्या प्रवाहांपासून तोडत स्वतःला बेटावर उभं केलंत. मतभेद तर असतीलच, पण आपली बिरादरी वाढवायची की एकेकाला छाटत आपली स्थिती आणखी एकाकी करायची? सगळ्या जगाला ठोकण्याचा आपल्याला अधिकार, पण आपल्याला सुनावण्याची बिशाद कोणाची? याचाच तर फायदा घेतला त्यांनी, म्हणून फावलं त्यांचं!
नॉट डन, बॉस.
बाकीचे हे बोलणार नाहीत. कारण, त्यापैकी अनेकांना तुमचा इगो मुद्दाम सांभाळायचाय. आणि, आपल्या सोईने त्याचा उपयोग करून घ्यायचाय. तर, आपल्यातल्याच काहींना, ‘बाबासाहेब’ नावाचा सात-बारा आपल्या हातात घट्ट धरून ठेवायचाय.
मला यातलं काही नकोय.
मला बाबासाहेबांनी दाखवलेली वाट हवीय. म्हणून मी सांगतोयः पुतळा आणि प्रतिकात्मकतेपेक्षा ही लढाई मोठी आहे. आणि, लढणा-यांची उभी झुंजार फौज आहे.
थोडी जळमटं काढा तरी.
इतिहास, स्मरणरंजन आणि अंधभक्तीतनं बाहेर या तरी.
ही लढाई मूल्यांची आहे.
आणि,
तुमच्या-माझ्यासारख्या लढाऊ भीमपुत्रांची आज खरी गरज आहे.
जय भीम!
– संजय आवटे (राज्य संपादक – दिव्य मराठी)