फोमो आणि जोमो
डॉ. शिवाजी जाधव यांचा महत्त्वपूर्ण लेख
डिजिटल माध्यमांनी भारतीयांच्या जगण्यात निर्णायक हस्तक्षेप केला आहे. अशा नव माध्यमांची जाण आणि वापराचे भान नसेल तर त्याचा कशा पद्धतीने माध्यमांचा गैरवापर होऊ शकतो, याचे भारत हे उत्तम उदाहरण आहे. या देशात माध्यमांची संख्या आणि प्रभाव प्रचंड असला तरी ही माध्यमे हाताळायची कशी, याविषयीची पुरेशी समज आपल्याकडे नाही. त्यामुळे डिजिटल मीडियातून जे काही प्रसवलं जातं ते खरं मानून आपली मतं बनविणार्यांची संख्या या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. खर्या-खोट्याची शहानिशा करण्याची कुवत येण्याआधीच आपल्या हातात स्वस्तात रोजच्या रोज एक-दोन जीबी डेटा पडल्याने आणि तो काहीही करून त्याचदिवशी संपवण्याच्या नादात बहुतांशी भारतीय आपल्या मेंदूत कचरा रिचवत आहेत. यातूनच परस्परांत द्वेष, मत्सर, घृणा आणि उन्मादी वर्तनाचा आलेख वाढताना दिसत आहे. खर्या जगाच्या जागी आपण एक काल्पनिक जग उभा करून त्यात रमत चाललो आहोत. परिणामी, रोजच्या जगण्याशी आपला संबंध तुटला असून डिजिटल माध्यमांतून जे दिसते, तेच खरे आयुष्य अशी आपली समजून झाली आहे.
फेसबुक, इंस्टाग्राम यासह अन्य प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असणार्या कित्येक पोस्ट, छायाचित्रे लोक खूप मनाला लावून घेतात. एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने कुठेतरी फिरायला गेल्याचा मस्त धम्माल करत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला तर आपण आपल्या जगण्याशी त्याचा संबंध जोडतो. म्हणजे त्यांच्याशी आपली तुलना करून आपलं आयुष्य कसं कंटाळवाणं आहे आणि इतर लोक कसे एन्जॉय करतात, असा विचार करत आपण कुढत बसतो. या अवस्थेचे वर्णन पॅट्रिक के. मॅकजिनिस यांनी ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ (फोमो) असे केले. दुसर्यांच्या तुलनेत आपण काहीतरी हरवत चाललो आहोत, अशी भीती मनात निर्माण होणे, याला फोमो म्हटले जाते. पॅट्रिक यांनी 2004 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या नियतकालिकात ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. विशेषतः तरूण आणि किशोरवयीन मुलांच्या बाबतीत इतरांशी तुलना करण्याचे प्रकार जास्त घडतात. इतरांच्या आनंदी पोस्ट वाचून किंवा पाहून आपण अशा आनंदाला मुकत आहोत, अशी भावना वाढीस लागते. आपण सोडून सगळे मस्त आयुष्य जगत आहेत. आपल्याच आयुष्यात असे क्षण येऊ शकत नाहीत म्हणून कित्येकजण नैराश्याच्या गर्तेत अडकतात.
सोशल मीडियावर प्रत्येकजण आपण कसे चांगले, कर्तृत्त्ववान, आनंदी आणि सद्गुणांचा पुतळा आहोत, असेच सांगत सुटले आहेत. स्वतःबद्दल नकारात्मक किंवा वाईट पोस्ट कोण कशाला व्हायरल करेल? सोशल मीडियावर व्यक्तीगत पोस्ट पाहिल्या तर सगळीकडे आबादीआबाद आहे, असेच वाटेल. पण हा एक भ्रम आहे. वस्तुस्थिती त्यापेक्षा कितीतरी वेगळी असू शकते. मात्र ती नीट समजून न घेता केवळ वरवर दिसणार्या पोस्ट पाहून आपण आपली मते तयार करतो आणि त्यांच्याशी तुलना करून आपल्याला कमीपणा घेतो. ‘फोमो’ची शिकार ठरलेला व्यक्ती स्वतःच्या आयुष्याबद्दल नकारात्मक असतो. यातून त्याची मानसिक आणि शारीरीक कार्यक्षमता कमी होते. अशा व्यक्तींमध्ये निद्रानाश, वजन वाढणे, चिडचिडेपण अशा अनेक व्याधी पहायला मिळतात, असे संशोधन सांगते. या फोमोतून बाहेर पडण्यासाठी अभ्यासकांनी ‘जॉय ऑफ मिसिंग आऊट’ (जोमो) चा उतारा सांगितला आहे.
ज्या क्षणी लोक त्यांचं जगणं एन्जॉय करत होते, त्या क्षणी आपणही आपलं जगण आपल्या पद्धतीने जगत होतो. काय मिस केलं त्यापेक्षा त्याक्षणी आपण त्या काळात जे काही मिळवलं, त्यावर लक्ष केंद्रीत करणे म्हणजे ‘जोमो’ होय. जोमो आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतो. आहे ती स्थिती स्वीकारायला भाग पाडतो. तो रिअल लाईफशी जोडण्याचे काम करतो. या अर्थाने ‘फोमो’च्या गर्तेत अडकलेल्यांनी ‘जोमो’शी म्हणजेच वस्तुस्थितीशी मैत्री केली तर निराशा किंवा पश्चातापाची वेळ येणार नाही.