ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमाध्यमविश्वरोजगार/शिक्षण
Trending

प्रागतिक विचारांच्या राजमाता जिजाऊ माँसाहेब

डॉ.श्रीमंत कोकाटे यांचा खणखणीत लेख

Spread the love

जपमाळ ओढून आणि नामजप करून स्वराज्य स्थापन करता येणार नाही, हे वास्तव ओळखणाऱ्या जिजाऊ प्रागतिक विचारांच्या होत्या. त्या भाबड्या किंवा प्रवाहपतित नव्हत्या. त्या देवभोळ्या-धर्मभोळ्या तर अजिबात नव्हत्या. त्यांचा विश्वास कर्तृत्वावर होता, यज्ञ, होम-हवन, ज्योतिष-पंचांगावर नव्हता.

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा हत्ती पिसाळला त्याप्रसंगी आप्तस्वकीयात जीवघेणा संघर्ष झाला. दीर शरीफजीराजे, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे रणमैदानात धारातीर्थी पडले.

पुत्र शिवाजीराजे यांना जिवे मारण्यासाठी अफजलखान आला, पन्हाळा वेढा, आग्रा कैद, पुरंदरचा तह, राज्याभिषेकाचे राजकारण, असे अनेक प्रसंग जिजाऊ माँसाहेब यांनी अनुभवले. पण अशा कठीण प्रसंगी जिजाऊ माँसाहेब डगमगल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, त्यांनी धीर सोडला नाही, संकटाने त्या गर्भगळीत झाल्या नाहीत, याउलट संकटसमयी जिजाऊ लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. संकटाला संधी समजून त्यावरती त्यांनी यशस्वी मात केली.

जिजाऊंनी ज्याप्रमाणे शिवरायांना घडवले, तसेच नातू शंभूराजांना देखील घडविले. स्त्री देखील हिंमतवान, बुद्धिमान, कर्तृत्ववान, पराक्रमी, दूरदृष्टीची असते, हे जिजाऊंनी दाखवून दिले. जिजाऊ हे स्वराज्याचे विद्यापीठ आणि ज्ञानपीठ आहे. आपल्या सर्वांचे प्रेरणापीठ आणि संस्कारपीठ म्हणजे जिजाऊ माँसाहेब आहेत.

राजमाता जिजाऊ कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. त्या जितक्या संवेदनशील मनाच्या होत्या तितक्याच त्या स्वाभिमानी आणि लढवय्या होत्या. परकियांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. त्यांनी शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली. जिजाऊ माँसाहेब या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ आहे.

पती निधनानंतर सती न जाता जिजाऊ आपल्या पुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्वराज्यनिर्मितीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. पारंपरिक अनिष्ट प्रथांना त्यांनी लाथाडले. सती प्रथासारख्या क्रूर, अमानुष प्रथेला लाथाडणाऱ्या जिजाऊ क्रांतिकारक आहेत. त्या ग्रंथप्रामाण्यवादी नव्हत्या म्हणूनच, त्या अशी हिंमत करू शकल्या. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून भूमिपुत्रांत भय निर्माण केले होते, त्याच पुण्यात बाल शिवबाला हाताशी धरून जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून भूमिपुत्रांत अभय निर्माण केले, यावरून स्पष्ट होते की जिजाऊ बुद्धिप्रामाण्यवादी अर्थात प्रयत्नवादी होत्या.

जिजाऊ माँसाहेब अत्यंत सुंदर होत्या. त्या कुरुप असत्या तरी त्यांच्या योग्यतेला तडा गेला नसता, कारण कर्तृत्व हेच खरे सौंदर्य असते. त्या विजयवर्धिनी म्हणजे विजय खेचून आणणार्‍या यशस्विनी होत्या, असे समकालीन परमानंद म्हणतो. जिजाऊ या पराक्रमी, धैर्यशाली होत्या. त्या गरिबांची सावली होत्या. त्या अत्यंत गंभीर आणि दूरदृष्टीच्या होत्या.

यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागेल, रणांगण गाजवावे लागेल, चातुर्य पणाला लावावे लागेल, हे त्यांनी ओळखले होते. जपमाळ ओढून आणि नामजप करून स्वराज्य स्थापन करता येणार नाही, हे वास्तव ओळखणाऱ्या जिजाऊ प्रागतिक विचारांच्या होत्या. त्या भाबड्या किंवा प्रवाहपतित नव्हत्या. त्या देवभोळ्या-धर्मभोळ्या तर अजिबात नव्हत्या. त्यांचा विश्वास कर्तृत्वावर होता, यज्ञ, होम-हवन, ज्योतिष-पंचांगावर नव्हता.

जिजाऊ माँसाहेबांना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड होती. त्या गरीबाप्रती अत्यंत कारुण्यमूर्ती होत्या. त्यामुळे त्या निर्भीड आणि लढवय्या होत्या. बाल शिवबाला मांडीवर बसवून महिलावर अत्याचार करणाऱ्या रांजे गावच्या बाबाजी गुजरला त्यांनी कठोर शिक्षा ठोठावली. आपल्या राज्यातील सर्व स्त्रिया आणि लहान मुलं यांचे रक्षण झालेच पाहिजे, हा नियम जिजाऊनी घालून दिला.

आपले राज्य नीतिमूल्यांची जोपासना करणारे असले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. त्या अत्यंत न्यायनिष्ठुर होत्या. त्यांनी शिरवळ परगण्यातील मुजेवी येथील लखो विठ्ठल आणि पुणे परगण्यातील बहेरखेड येथील गणोजी गुरव यांना जमिनीच्या खटल्यात योग्य न्याय दिला. आपल्या राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय करणारा मोकळा सुटणार नाही याची काळजी जिजाऊनी घेतली.

जिजाऊंचा गुप्तहेर खात्यावर अंकुश होता. त्यांची स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा होती. गुप्तचर यंत्रणनेवर त्यांनी विशेष लक्ष दिले होते. शिवाजीराजे कोकण मोहिमेवर असताना खवासखान येत असल्याची बातमी जिजाऊनी शिवरायांना पोच केली.

शिवाजीराजे आग्रा कैदेत असताना जिजाऊंनी स्वराज्याचे नेतृत्व केले. त्यांनी स्वराज्याची इंचभर भूमी देखील शत्रूला जिंकू दिली नाही. जिजाऊंनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्यामुळे शिवरायांना साथ देणारे सर्व जाती धर्मातील मावळे निस्वार्थ आणि निर्भीडपणे पुढे आले.

जिजाऊ स्वतः युद्धकलेत निपुण होत्या. त्या घोडेस्वारीमध्ये तरबेज होत्या. त्या लढवय्या होत्या. त्यांच्या धैर्याचे, शौर्याचे, पराक्रमाचे आणि लढाऊ वृत्तीचे वर्णन त्यांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या समकालीन कवींद्र परमानंदाने *शिवभारत* या ग्रंथात विस्ताराने पुढील प्रमाणे केले आहे. “राजगडावर राहणारी शिवाजीची माता जिजाऊ आपल्या गडाच्या रक्षणाच्या कामी दक्ष झाली”(शिवभारत, अध्याय 26/5). शिवाजीराजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असताना जिजाऊ डोळ्यात तेल घालून गडांचे रक्षण करत होत्या, असे परमानंद म्हणतो.

प्रदीर्घकाळ शिवाजीराजे पन्हाळा वेढ्यात अडकले असताना जिजाऊ अस्वस्थ झालेल्या होत्या. त्या स्वतः शिवबाची सुटका करण्यासाठी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून निघतात, त्याप्रसंगी जिजाऊ काय म्हणतात त्याचे वर्णन परमानंद पुढील प्रमाणे करतो “त्या माझ्या पुत्रास (शिवाजीस) स्वतः सोडवण्याचा मी प्रयत्न करीन आणि जोहराचे मुंडके आज युद्धातून घेऊन येईन” (शिवभारत, अध्याय 26/14).

यावरून स्पष्ट होते की कठीण प्रसंगी जिजाऊ स्वतः हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून युद्धास सज्ज असत. कठीण काळात त्या हतबल होऊन रडत बसल्या नाहीत, तर शस्त्र घेऊन रणांगण गाजवण्यास रणमैदानात उतरल्या. त्यात केवळ शहाजीराजांच्या महाराणी, शिवबाच्या माता, शंभूराजेची आजी एवढी मर्यादित ओळख नाही, तर त्या स्वतः महान योद्धा, शूर, मुत्सद्दी, धैर्यशाली, राजनीतिज्ञ होत्या. भारतीय परिप्रेक्षात पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखन अजून आलेले नाही. त्यामुळे कर्तृत्ववान स्त्रियांची योगदान दुर्लक्षित झालेले आहे.

शिवाजीराजे आग्रा कैदेत असताना जिजाऊंनी स्वराज्याचे नेतृत्व केले. त्यांनी स्वराज्याची इंचभर भूमी देखील शत्रूला जिंकू दिली नाही. जिजाऊंनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्यामुळे शिवरायांना साथ देणारे सर्व जाती धर्मातील मावळे निस्वार्थ आणि निर्भीडपणे पुढे आले. जिजाऊंनी मावळ्यावर उदात्त विचारांचे संस्कार केले. त्यांच्यात नीतिमूल्यांची जोपासना केली. त्यांच्यात ध्येयवाद आणि आत्मविश्वास निर्माण केला.

समकालीन डच दप्तरात जिजाऊंच्या योगदानाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे “शिवाजी महाराजांच्या मातोश्री जरी सुमारे 80 वर्षाच्या होत्या, तरी त्या राज्याभिषेक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आल्या. त्यानंतर बारा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडून शिवाजीराजांना 25 लाख पॅगोडे मिळाले. जिजाऊंनी स्वतः जवळील पंचवीस लाख पॅगोडे शिवरायांना स्वराज्यासाठी सुपूर्त केले. ते स्वतःकडे ठेवले नाहीत. जिजाऊ नि:स्वार्थी होत्या. त्यांनी सर्व काही रयतेच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यामुळेच शाहीर अमर शेख जिजाऊंच्या योगदानाचे वर्णन पुढील प्रमाणे करतात.

“आला आला शिवाजी आला।
योग्य समयाला जिजाईन दिला।
थोर त्या मातेचे उपकार।
थोर त्या आईचे उपकार ।
मराठ्यांनो तुमच्याने नाही फिटणार।”

रयतेवर जिजाऊंचे अनंत उपकार आहेत. इतके त्यांचे महान योगदान आहे. असे शाहीर अमर शेख सांगतात. तर महात्मा फुले म्हणतात “ज्या शिवबाची मातोश्री युद्धकला, राजनीतीमध्ये निष्णांत आहे, त्या शिवरायांना कोणत्याही बाह्य गुरूंची गरजच नव्हती”

राजमाता जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचे, व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ वर्णन समकालीन परमानंद, जयराम पिंडे यांनी केलेले आहे. त्यामुळे तथाकथित कल्याणच्या सुभेदाराच्या सौंदर्याची तुलना जिजाऊंशी करणारी कविकल्पना अनैतिहासिक आणि खोडसाळ ठरते. परमानंद म्हणतात “शहाजीराजांची महाराणी जिजाऊ म्हणजे विजयलक्षणा, कमलनेत्रा, यशस्विनी, विजयवर्धिनी अशी जाधवराव यांची कन्या आहे” (शिवभारत, अध्याय 2/44, 5 /53)

जिजाऊ माँसाहेब अत्यंत सुंदर होत्या. त्या कुरुप असत्या तरी त्यांच्या योग्यतेला तडा गेला नसता, कारण कर्तृत्व हेच खरे सौंदर्य असते. त्या विजयवर्धिनी म्हणजे विजय खेचून आणणार्‍या यशस्विनी होत्या, असे समकालीन परमानंद म्हणतो. जिजाऊ या पराक्रमी, धैर्यशाली होत्या. त्या गरिबांची सावली होत्या. त्या अत्यंत गंभीर आणि दूरदृष्टीच्या होत्या. याबाबतचे वर्णन शहाजीराजांच्या पदरी असणारा समकालीन जयराम पिंडे राधामाधवविलासचंपू या ग्रंथात पुढील प्रमाणे करतो..

“जशी चंपकेशी खुले फुल जाई।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ।

जिचे किर्तीचा चंबु जंबुद्वीपाला।
करी साऊली माऊली मुलाला।”

राजमाता जिजाऊ या हिंमतवान, कर्तृत्ववान आणि पराक्रमी होत्या त्या शिवाजीराजांच्या मार्गदर्शक दीपस्तंभ होत्या, असे वस्तुनिष्ठ इतिहासकार कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, वा. सी. बेंद्रे, डॉ. जयसिंगराव पवार सांगतात, तर डॉ. बाळकृष्ण सांगतात “Jijabai was a guide and philosopher of chhatrapati shivaji Maharaj throughout her life”.

जिजाऊंनी ज्याप्रमाणे शिवरायांना घडवले, तसेच नातू शंभूराजांना देखील घडविले. स्त्री देखील हिंमतवान, बुद्धिमान, कर्तृत्ववान, पराक्रमी, दूरदृष्टीची असते, हे जिजाऊंनी दाखवून दिले. जिजाऊ हे स्वराज्याचे विद्यापीठ आणि ज्ञानपीठ आहे. आपल्या सर्वांचे प्रेरणापीठ आणि संस्कारपीठ म्हणजे जिजाऊ माँसाहेब आहेत. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि जिजाऊमातेला विनम्र अभिवादन!

– डॉ श्रीमंत कोकाटे


डॉ श्रीमंत कोकाटे यांचे इतर लेख

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका