पिरॅमल स्वास्थ व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या सहकार्याने व आंबेडकर संस्थेतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे वाटप
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी केले मार्गदर्शन
सांगोला / प्रतिनिधी
पिरॅमल स्वास्थ फौंडेशन व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या वतीने सांगोला तालुक्यातील अकोला आणि जवळा प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्यात आले.
यावेळी सांगोला नगरपालिका उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार, वैद्यकीय अधिकारी ए. एम. काझी, अकोला गावच्या सरपंच सौ. अक्काताई खटकाळे, महादेव शिंदे, रज्जाक मुलांनी, शशिकांत गव्हाणे, संतोष गुरव, भागवत शिंदे, ग्रामसेवक पोरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक ऐवळे तर जवळा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळे मॅडम, सरपंच दत्ता बर्वे, उपसरपंच नवाज खलिफा, पोलीस पाटील आयुल गयाळी, सुशांत मागाडे, नामदेव मागाडे, बापूसाहेब ठोकळे व संस्थेचे नंदू मोरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना बहुजन नेते तथा प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे बापूसाहेब ठोकळे म्हणाले, कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्व कळाले आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांचे जीव गेले आहेत. आपल्या भागातील आरोग्य सुविधांची उपलब्धता याचा विचार करता डॉ. आंबेडकर संस्थेने पिरॅमल स्वास्थ फाऊंडेशन व प्रथम एजुकेशन फाऊंडेशनच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे वाटप, मास्क, सॅनीटायजर, हँडवाश याचे वाटप केले आहे. यापुढेही ये कार्य सुरू राहणार आहे.
ठोकळे पुढे बोलताना म्हणाले की, मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व काही जागच्या जागी थांबले. देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. अनेक लोकांना कोरोनाची लागण होऊन आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आशासेविका, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते व सर्वच शासकीय यंत्रणांनी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. आपल्या भागातील आरोग्य सुविधांची उपलब्धता याचा विचार करता डॉ. आंबेडकर संस्थेने पिरॅमल स्वास्थ फाऊंडेशन व प्रथम एजुकेशन फाऊंडेशनच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे वाटप, मास्क, सॅनीटायजर, हँडवाश याचे वाटप संस्थेने सांगली कोल्हापूर सोलापूर, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने संस्था काम करत असून आपल्या भागातील आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुसज्ज व्हाव्यात यासाठी संस्थेने सांगोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्यात आले असून येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही ठोकळे यांनी सांगितले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार यांनी सांगितले कि, पिरॅमल स्वास्थ फाऊंडेशन व प्रथम एजुकेशन फाऊंडेशन आणि डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता ऑक्सिजनसाठी बाहेर जावे लागणार नाही तसेच समाजातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील रुग्णांचे होणारे आर्थिक नुकसान थांबणार आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी सांगितले कि, गावातील आरोग्य व्यवस्था सुसज्ज असणे आवश्यक असून संस्थेच्या वतीने देण्यात आलेले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर हे अतिशय महत्वाचे असून याचा फायदा तालुक्यातील रुग्णांना होणार आहे.
दोन्ही गावातील कार्यक्रमावेळी गावातील नागरिक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका, गट प्रवर्तक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी यांनी संस्थांचे आभार मानले.