पळशीत आ. शहाजीबापू पाटलांची बैलगाडीतून मिरवणूक
सांगोला / नाना हालंगडे
बंद असलेला सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना डीव्हीपी उद्योग समूहाने चालू केल्याबद्दल पळशी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी सभासद ग्रामस्थांच्यावतीने आमदार शहाजीबापू पाटील व धाराशिव साखर कारखाना युनिट ४ चे चेअरमन अभिजित पाटील यांचा सत्कार करून सवाद्य गावातून मिरवणूक काढली.
शेतकरी सभासदांच्या उसाला चांगला दर देऊन कारखाना सुरळीत चालविला जाईल, असे अभिजित पाटील यांनी सांगितले.
सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे गेल्या नऊ वर्षांपासून बंद अवस्थेत होता. हा कारखाना चालू व्हावा म्हणून आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुखे-पाटील यांचे प्रयत्न सुरू होते. धाराशिव साखर कारखाना युनिट ४ चे चेअरमन अभिजित पाटील यांनी राज्य सहकारी शिखर बँकेच्या नियमानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सांगोला कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला.
अवघ्या महिन्याभरात कारखान्याच्या मशिनरीची दुरुस्ती, देखभाल करून गाळपासाठी सज्ज केला. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कारखान्याच्या गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ केला. दरम्यान, आमदार शहाजीबापू पाटील, चेअरमन अभिजित पाटील यांनी पळशी गावाला भेटी देऊन शेतकरी सभासदांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करून गावातून मिरवणूक काढली.
यावेळी सरपंच रामदास वाघमारे, उपसरपंच श्रीशैल्य पाटील, नंदकुमार बागल, हणमंत पाटील, रघुनाथ झांबरे, विजय राजमाने, धनंजय बागल, अभिजित नलवडे, संजय मेटकरी, महादेव तळेकर, मधुकर मौलानी, सचिन काळे, सचिन घोडके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विकास संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.