पत्रकारितेचा आदर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा विशेष लेख

Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता पाक्षिकात प्रसिद्ध लेखांचा एकत्रित संग्रह महाराष्ट्र शासनाच्या डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा हा विशेष लेख खास थिंक टँक लाईव्हच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. – संपादक

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाज सुधारक, अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडीत, शेत व पाणी व्यवस्थापनाचे धुरंदर अशा विविध रूपाने केली जाते. मात्र या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाशिवाय बाबासाहेबांची एक ओळख आहे ती म्हणजे ते एक थोर पत्रकार आणि संपादक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे एक थोर समाजचिंतक आणि संस्कृतिपुरुष होते, ज्यांना आमूलाग्र समाजपरिवर्तन हवे होते. त्यासाठी महाराष्ट्रातील अनेक समाजकारणी व राजकारण्यांप्रमाणे वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजोन्नती होईल, यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी एक निष्ठावान संपादक आणि सव्यसाची लेखक म्हणून वृत्तपत्रसृष्टीत पाऊल ठेवले.

१९२० च्या दशकापर्यंत बहिष्कृत समाजाची ठामपणे बाजू घेईल असे एकही वृत्तपत्र नव्हते. ब्राह्मणी पगडा व विचार असलेल्या मराठी वृत्तपत्रांच्या साखळी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत व जनता पत्र मुंबईतून प्रकाशित करत बहिष्कृतांची परंपरा निर्माण केली.

१९२० साली ‘मूकनायक’, १९२७ साली ‘बहिष्कृत भारत’, १९३० साली ‘ जनता’ तर १९५६ साली ‘प्रबुद्ध भारत’ या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला वैचारिक प्रबोधनाची दीक्षा दिली. एक मन्वंतर घडले. आंदोलने आणि विचार या दोन्ही साधनांचा अत्यंत समृद्ध, संपन्न आणि प्रभावी असा उपयोग त्यांनी केला.

२४ नोव्हेंबर १९३० ला बाबासाहेबांनी जनता पाक्षिक प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली. जवळपास २५ ते २६ वर्षे आंबेडकरी चळवळीचे आंबेडकर कालीन दीर्घकाळ प्रवास करणारे साप्ताहिक वृत्तपत्र म्हणून जनताचा उल्लेख करावा लागतो. भारतातील या काळातील राजकिय, सामाजिक, धार्मिक स्थितीचे या पत्रामधून आंबेडकर दृष्टीने केलेले विश्लेषण यात बघायला मिळते. भारतातील तत्कालीन वेगवेगळ्या विचारांच्या चळवळीचा आणि घटनांचा तपशील व संदर्भ यात पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने तो त्या काळातील घडामोडींचा दस्तऐवज म्हणजेच ऐतिहासिक ठेवा आहे . ‘जनता’ मधील हा थोर संदर्भमूल्य असलेला ठेवा आणि पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणारा हा धगधगता दस्तावेज पुस्तकरूपात प्रकाशित होत आहे, याचा मला खूप आनंद वाटतोय. हे पुस्तक प्रत्येकाने वाचून बाबासाहेबांच्या विचारांपासून, संघर्षापासून प्रेरणा घ्यावी, असे नम्र आवाहन मी या निमित्ताने करू इच्छितो. बाबासाहेबांच्या विचारांनुसार समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्या सर्वांनी आपापल्यापरीने, आपल्या क्षेत्रात सक्रिय होणे, हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे.


वृत्तपत्र जगवण्यासाठी बाबासाहेबांकडे पैसा नव्हता आणि अद्ययावत पुरेशी यंत्रणाही नव्हती, मात्र आपल्या वर्तमानपत्रातून चोवीस चोवीस रकाने लिहिणारे बाबासाहेबांचे हात, दलितांच्या नवसृष्टीचे रचनाकार ठरले!
तत्कालीन प्रभात, सकाळ सारख्या वृत्तपत्रांनी जुनाट विचारांचा प्रतिकार केला. मात्र ते ही व्यापक आणि व्यावसायिक राहिली. त्यावेळी जनता पाक्षिक हे जाती बद्दल थेट मांडणी, जातीभेद, अस्पृश्यता नष्ट करण्याची भूमिका,मोघम, गुळगुळीत भूमिका न घेतला, नेमकी भूमिका घेऊन चालू झालेले एकमेव वर्तमानपत्र होते! जनता या पाक्षिकात बाबासाहेबांनी अस्पृश्य विरूद्ध सवर्ण या संघर्षात अस्पृश्यांची बाजू घेऊन सनातनी व प्रतिगामी सवर्णांना धारेवर धरले. जातीय दृष्टीकोनातून तत्कालिन वर्तमानपत्रांची मीमांसा त्यांनी केली. राजकीय पारतंत्र्यासोबतच सामाजिक गुलामगिरी नष्ट होणे हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे, हा मुद्दा त्यांनी जनता पाक्षिकातून ठळकपणे सातत्याने अधोरेखित केला. ब्रिटिश राजवटीच्या चुकांवर,त्यांच्या अपयशांवरही त्यांनी कठोरपणे आसूड ओढले. जनता ही सवर्णविरोधी नव्हता तर जातीयवादी विचारांच्याविरूद्ध होता. त्यामुळेच आधुनिक विचारांच्या पुरोगामी सवर्णांचे लेखनही जनतामध्ये प्रसिद्ध करण्यात आले.

कामगार प्रश्न आणि कामगार यांच्याबद्दल बाबासाहेबांना कमालीची आपुलकी होती. याच प्रेमापोटी त्यांनी १९३७ मध्ये बॉम्बे म्युनिसिपल कामगार संघ स्थापन केला होता. या संघटनेने १९४९ साली जेव्हा संप पुकारला तेव्हा त्या संपाचे विस्तृत वार्तांकन जनता पाक्षिकात करण्यात येत होते.

“जातीव्यवस्थेचे निर्मूलन झाल्याशिवाय देशात श्रमिकांचे संयुक्त लढे उभे राहू शकणार नाहीत. जातीव्यवस्थेचा विध्वंस हा लोकशाही मार्गाने दोन टप्प्यात क्रांती घडवून आणण्यासाठीची पूर्व अट आहे,’’ असे बाबासाहेबांनी २५ जून १९३८ च्या जनता मधील लेखात म्हटले होते.

लोकजागृतीच्या चळवळीला लोकभाषेचे माध्यम स्वीकारावे लागते. बाबासाहेबांनी इंग्रजी भाषेत विपुल ग्रंथरचना व वृत्तपत्रीय लेखन केले असले तरी, जनसामान्यांना प्रबोधित करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचाच व मराठी वर्तमानत्रांचाच अवलंब केला, हे त्यांचे वेगळेपण आहे.

लोकसाहित्य हा सांस्कृतिक आविष्कार आहे, असे बाबासाहेबांचे मत होते. यामुळे हे साहित्य जतन केले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी स्वतः “जुन्या वाड़मयाचा जीर्णोद्धार’ या नावाचा लेख जनतामध्ये २ ऑगस्ट १९५२ रोजी प्रकाशित केला होता. आधुनिक वाड्मयात ‘नाटक हा प्रकार त्यांना विशेष आवडत होता. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘खरा ब्राह्मण’ या नाटकावर त्यांनी समीक्षा लिहुन त्यावर साधकबाधक चर्चाही जनता पाक्षिकातून केली होती.

सुप्रसिद्ध विचारवंत व अस्मितादर्शकार, समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी त्यांची पीएचडी ही डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेवर केली आहे. पत्रकार म्हणून बाबासाहेबांच्या लेखणीचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणतात-

“बाबासाहेबांची लेखणी स्वयंभू आणि स्वयंसिद्ध होती. अमोघ युक्तिवाद हे तर त्यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ट्य होय. त्यांचा युक्तिवाद भावनेपेक्षा बुद्धीला आणि कल्पनाविलासापेक्षा तर्कशक्तीला आवाहन करतो. बाबासाहेबांनी तत्कालीन विरोधी व जातिवादी पत्रांच्या व पत्रकारांच्या वृत्तीचा व अहंकाराचा दंभस्फोट वेगवेगळ्या उदाहरणांनी योग्य त्या वेळी केला आहे. प्रतिपक्षाचे बिनतोड वाटणारे मुद्दे कुशलतेने खोडून काढताना मार्मिक युक्तिवाद आणि मर्मभेदी इतिहास, यांचे दर्शन त्यांच्या लेखणीने घडवले आहे.”

बाबासाहेबांच्या काळातील अन्य वर्तमानपत्रांच्या पत्रकारितेबद्दलही बाबासाहेब समाधानी नव्हते. त्या काळात लोकांचे प्रश्न मांडणारी, त्यांचे प्रबोधन करणारी खरी पत्रकारिता होत नसून केवळ काही व्यक्तींचे उदात्तीकरण करणारी खोटी पत्रकारिता केली जात असल्याचा आक्षेप त्यांनी जाहीरपणे नोंदवला होता. स्वतःच्या लेखणीबद्दल अभिमान असणा-या पत्रकारांनी जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांच्या विरूद्ध लिहून दाखवावे असे आव्हान त्यांनी त्यावेळेसच्या पत्रकारांना दिले होते. मात्र हे आव्हान स्वीकारण्याचे धाडस कुणीही दाखवू शकले नाही.

“In a time of universal deceit, telling the truth is a revolutionary act” या जॉर्ज ऑरवेलच्या विधानाप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्या पत्रकारितेतून सत्य मांडण्याचे क्रांतिकारी कार्य केले.

बाबासाहेबांनी आदर्श पत्रकारिता कशी करावी याचे उदाहरण घालून दिले असताना आज पत्रकारितेची स्थिती अतिशय चिंताजनक आहे.

लग रहा है किसी की गोदी में सो रही है मीडिया

अब अपनी पुरानी पहचान खो रही है मीडिया।

अब तो जिसकी हो सरकार, उसी की हो रही है मीडिया।

अशी स्थिती देशभरात निर्माण झाली आहे.

“He who controls the media, controls the minds of public” असे जगप्रसिद्ध विचारवंत नोम चोमस्की यांनी म्हटले आहे. त्यानुसार माध्यमांना हाताशी धरून लोकांच्या मेंदूशी खेळ सुरू आहे. त्यांचा ब्रेनवॉश केला जात आहे. इतका की पेट्रोलची दरवाढीवरून संतप्त होणारा एक वर्ग आता या दरवाढीबद्दल काहीही बोलण्यासही तयार नाही.

केवळ सनसनाटी पसरविणे, टीआरपी मिळवणे, खपाचे आकडे फुगविणे यात माध्यमे इतकी गुंतली आहेत की त्यांची विश्वसनीयता संपत चालल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे केवळ माध्यमांचे नव्हे तर देशातील शोषित, वंचित, दलित, बहुजन, शेतकरी, कामगार यांचे मोठे नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर देशाची लोकशाहीही संकटात सापडली आहे.

१९२७ साली पुणे येथे गोखले सभागृहात बोलताना बाबासाहेबांनी पत्रकारितेबद्दल जी चिंता व्यक्त केली होती तीच आजही प्रासंगिक आहे.

“एकेकाळी भारतात पत्रकारिता ही उपजिविकेचे साधन होते, व्यवसाय होता. मात्र आता ती व्यापार झाली आहे. जनतेचे जबाबदार सल्लागार ही भूमिका माध्यमे वठवताना दिसत नाहीत. कोणताही हेतू न ठेवता कोणताही अभिनिवेश न बाळगता बातम्या दिल्या जात नाहीत. उच्चपदस्थ व शक्तीशाली लोकांनी चुकीचे वर्तन केले तर त्यांची खरडपट्टी काढण्याचे धाडस माध्यमे दाखवत नाहीत,’’ ही डॉ. आंबेडकरांची माध्यमांबद्दलची जवळपास १०० वर्षांपूर्वीची प्रतिक्रिया आजही तितकीच प्रासंगिक वाटते.

फ़िलहाल मिडिया वालों के दो भगवान,

कभी हिन्दू – मुसलमान तो कभी पाकिस्तान।।

केंद्रातील सत्ताधारी व त्यांची विभाजनवादी विचारधारेच्या तालावर सध्या माध्यमे नाचत आहेत. देशातील ज्वलंत प्रश्न, केंद्रातील सरकारचे अपयश, केंद्र सरकारच्या नोटबंदी, जीएसटी सारख्या धोरणांमुळे देशोधडीला लागलेले गरीब, छोटे-मध्यम व्यापारी, शेतकरी, कामगार यांच्या वेदनांना प्रसिद्धी देण्याचे नाकारून केवळ हिंदू-मुसलमान, पाकिस्तान अशा विषयांवर बातमीदारी करून मूळ विषयांवरून लक्ष वेधले जात आहे. भूतकाळातील गडे मुर्दे अर्थात निरूपयोगी मुद्दे शोधून त्यावरून रान पेटवले जात आहे.

मख़मल के पैहरनो से खुरदरी जमीं को नापे है।
अख़बारों ने छालें नहीं, पैर के निशान छापे है

असा प्रश्न निर्माण होतोय.
दलितांना स्वातंत्र्यपूर्व काळातही मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये स्थान नव्हते आणि आजही स्थान नसल्याचे चित्र आहे. दलितांवर होणारे अत्याचार, दलित मुलींवर होणारे बलात्कार, दलितांची हत्या, दलितांच्या प्रगतीत निर्माण केले जाणारे अडथळे या विषयाशी संबंधित बातम्यांना प्राधान्य दिले जात नाही, त्यावर लेखही प्रसिद्ध होत नाही. उत्तर प्रदेशात दलित समुदायातील एका तरूणीवर सामुहिक बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आले. तिचा मृतदेह कुटुंबियांना देण्याऐवजी पोलिसांनी रात्रीच्या अंधारात रॉकेल टाकून जाळून टाकला तरीही माध्यमांनी तेथील सरकारला सळो की पळो करून सोडले नाही. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. या उलट महाराष्ट्रात पालघर येथे गावक-यांनी चोर समजून काही साधूंना मारून टाकले तर त्यावर एकच गहजब करण्यात आला. माध्यमांनी हा जणू हिंदूंवर हल्ला असल्याचे चित्र देशभर निर्माण केले आणि त्याला भाजपने खतपाणी दिले.

हवा का रुख़ ना जाने “मीडिया’ कैसे बदल देती है।

“मुद्दों” से भटक कर आजकल “मुर्दों” पर चर्चा होती है।।

त्यामुळे मुद्यांवर चर्चा व्हायची असेल तर त्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या पत्रकारितेचा आणि संघर्षाचा आदर्श ठेवावा लागेल. कारण सदैव धनशक्तीसमोर लोटांगणे घालणारी माध्यमे विराट जनशक्तीचे दर्शन एखाद्या विचाराच्या वा नेत्याच्या पाठिशी झाले तर मनातून इच्छा नसतानाही वाचक नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना प्रसिद्धी देतात. मात्र बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवणारे आपण रस्त्यावर उतरून संघर्ष करणे विसरू लागलो आहोत का हा प्रश्नही पडतोय. सत्ता कुणाचीही असो जोवर आंबेडकरी जनता आपल्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आपल्या न्याय्य मागण्या पूर्ण करवून घेत नाही तोवर बाबासाहेबांनी ‘जनता’ पाक्षिकातून आपल्या लेखणीद्वारे घडविलेली क्रांती पूर्ण यशस्वी होणार नाही, याची जाणीव निर्माण झाली तर जनता पाक्षिकातील लेखांचा संग्रह प्रसिद्ध करण्याचा हेतू सफल झाला असे म्हणता येईल.

जय भीम, जय भारत!

– डॉ. नितीन राऊत
(लेखक राज्याचे ऊर्जामंत्री आहेत)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका