पंतप्रधान मोदींनी बनाळीचे सुपुत्र सुभेदार मेजर संतोष चव्हाण यांना मिठाई भरविली
जम्मूमधील नौशेरा सेक्टरमधील जवानांसोबत दिवाळी केली साजरी
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सीमेवरील जवानांसोबत (Indian Army’s) दिवाळी साजरी करण्याची त्यांची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. त्यांनी जवानांना मिठाई भरविली. जत तालुक्यातील बनाळी गावचे सुपुत्र सुभेदार, मेजर संतोष सुदाम चव्हाण यांना पंतप्रधान मोदी यांनी मिठाई भरविली. थेट पंतप्रधानांच्या हातून मिठाई खाण्याचा त्यांना योग आला. मिठाई भरवतानाचा हा फोटो व्हायरल होताच बनाळी, जतसह सांगली जिल्ह्याची दिवाळी अधिक प्रकाशमान झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी इथल्या नौशेरा सेक्टरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मोदींनी भावनिक साद घालत तिथल्या जवानांशी संवाद साधला. हस्तांदोलन करत जवानांना मिठाई भरवली. त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूसही केली.
सुभेदार संतोष चव्हाण १९९४ मध्ये सैन्यात दाखल
सुभेदार मेजर संतोष चव्हाण हे १९९४ मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले आहेत. १ ऑक्टोंबर २०२१ रोजी हे सुभेदार मेजर पदावर कार्यरत झाले आहे. काल देशाच्या पंतप्रधानांनी मिठाई भरविल्यानंतर बनाळीसह संपूर्ण जत तालुक्यात जल्लोष करण्यात आला.
सीमेवरील तैनात जवान हेच माझे कुटुंब
पंतप्रधान मोदी म्हणाले, “सीमेवरील तैनात जवान हेच माझे कुटुंब आहे. तुमच्यासोबतच मी प्रत्येक दिवाळी साजरी केली आहे”.
उरी सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा दिला. उरी सर्जिकल स्ट्राईकमध्ये नौशेरा सेक्टरमधील जवानांनी शौर्य गाजवले होते. मोदींनी त्या आठवणींनाही उजाळा दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्जिकल स्ट्राईकनंतर नौशेरा सेक्टरमधील शांतता बिघडवण्याचे अनेक कुत्सित प्रयत्न झाले, पण नौशेराचे जवान शूर आहेत. प्रत्येक वेळी जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. सर्जिकल स्ट्राईकवेळी या ब्रिगेडने बजावलेल्या भूमिकेबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो असे म्हणत त्यांनी कौतुकही केले. याआधी २०१९ मध्येही पंतप्रधान मोदींनी राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. देशातील प्रत्येक नागरिक जवानांना दिवा लावून जवानांना शुभेच्छा देईल. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करेल, असेही त्यांनी सांगितले.