पंढरपूरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्धविहार उभा करणार : राजरत्न आंबेडकर
पंढरपूर येथील जागेची केली पाहणी
पंढरपूर (विशेष प्रतिनिधी) : पंढरपूर नगरपरिषदेने आम्हाला केवळ जागा द्यावी. आम्ही त्या ठिकाणी विविध देशांतील बौद्ध अनुयायांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धविहार उभा करू. हे बुद्धविहार सोलापूर जिल्ह्याची अस्मिता बनेल, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले.

राजरत्न आंबेडकर हे सोलापूर जिल्हा दौ-यावर होते. त्यांच्या उपस्थितीत सोलापूर, सांगोला तसेच पंढरपूर येथे कार्यक्रम घेतले. त्यांनी नगरपरिषदेचे अधिकारी व नगरसेवक यांच्या समवेत बैठक देखील घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेस निवृत्त पोलिस आयुक्त भारत शेळके, सम्यक क्रांतीचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, स्वप्नील गायकवाड, रवींद्र शेवडे, रवी सर्वगोड, केदार चंदनशिवे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : बौध्द असल्याचा अभिमान बाळगा, जनगणनेत बौध्द असाच उल्लेख करा
राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, जनगणनेत समाज बांधवांनी जातीचा उल्लेख न करता केवळ बौद्ध म्हणूनच उल्लेख करावा. जगामध्ये भारताची ओळख बुद्धभूमी म्हणूनच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आपल्या विविध भाषणात बुद्धांचा वारंवार उल्लेख करतात. मात्र येथील लेण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. जगभरातील अनेक बौद्ध देश केवळ पर्यटनावर चालतात. भारत ही तर बौद्धांची जन्म व कर्मभूमी असून , येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. परंतु त्यांचा विकास होत नाही. पंढरीला मोठे आध्यात्मिक महत्त्व असून येथे बौद्धविहार होणे गरजेचे आहे. येथील जागा सरकारने एखाद्या बौद्ध संस्थेकडे द्यावी. यानंतर आम्ही जगभरातील बौद्ध देशांतील भक्तांच्या मदतीने येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्धविहार उभा करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . तसेच सध्या अनेक ठिकाणी बौद्धविहारं आहेत परंतु ती बंद अवस्थेत आहेत. त्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही. त्यांना चालना देण्याची गरज असल्याचे मतही आंबेडकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, येत्या काही दिवसात जगणगणना सुरू होत असून , यामध्ये दलित बांधवांनी आपल्या धर्माचा उल्लेख बौद्ध असा करावा तर जातीचा उल्लेख करू नये. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारला. परंतु अद्याप आपले बांधव जातीचा उल्लेख शासकीय योजनेसाठी करतात. यामुळे जातीचा
शिक्का जन्मभर आपल्या माथी राहतो. एकवेळ अनुसूचित जातीचे फायदे नाही मिळाले तरी चालतील परंतु आपल्या पुढे कोणतीही जात न लावता केवळ बौद्ध असा उल्लेख करावा. राज्यात बौद्धांना अनुसूचित जातीचे फायदे मिळतात ; परंतु केंद्रामध्ये असे फायदे मिळविण्यासाठी जातीचे दाखले द्यावे लागतात. यासाठी आपण केंद्रीय मंत्र्यांना याबाबत भेटणार असून बौद्धांना देखील अनुसूचित जातीचे सर्व फायदे मिळावेत, अशी मागणी करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.