नाराज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी एनडीएमध्ये यावे
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ऑफर
मुंबई (विशेष प्रतिनिधी) भाजपचे हस्तक म्हणून अपमानित केलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी अपमान सहन करीत न राहता काँग्रेसचा त्याग करावा. देशाच्या विकासासाठी गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बलसारख्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप, आरपीआय आणि एनडीएमध्ये यावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व देशाच्या विकासासाठी कमजोर ठरले आहे. काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी ज्या नेत्यांनी काम केले त्या वरिष्ठ नेत्यांवर भाजपचे हस्तक म्हणून संशय व्यक्त करण्याचे काम राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप होत आहे. काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ प्रभावी अध्यक्ष द्यावा यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. ते पत्र लिहिणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता.
त्यामुळे असा अपमान या काँग्रेस नेत्यांनी सहन करू नये. गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखा निर्णय घ्यावा. एनडीएमध्ये या नेत्यांचे स्वागत होईल, असे ना. रामदास आठवले म्हणाले.