नामांतराला विरोध करणाऱ्या शिवसेनेसोबत प्रकाश आंबेडकरांची युती
देवेंद्र फडणवीसांची वंचित- शिवसेनेवर जहरी टीका
थिंक टँक : नाना हालंगडे
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या युतीचे राजकारणात फारसे परिणाम होतील असे मला वाटत नाही. कारण ही आघाडी फक्त भाजपला विरोध करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्यातील वैचारिक अंतर सर्वाना माहित आहे. ज्यावेळी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यायचं होते. त्यावेळी त्याला भाजपने पाठिंबा दिला होता. मात्र याचवेळी शिवसेनेने नामविस्ताराला विरोध केला होता. आता त्याच शिवसेनेसोबत प्रकाश आंबेडकर गेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, ही आघाडी फक्त भाजपला विरोध करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेना यांच्यातील विचाराचा अंतर आपल्याला माहित आहे. ज्यावेळी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यायचं होते त्यावेळी त्याला भाजपने पाठिंबा दिला होता. मात्र याचवेळी शिवसेनेने नामविस्ताराला विरोध केला होता. त्यामुळे त्यांच्या युतीचा फार काही परिणाम होणार नाही.
प्रकाश आंबेडकर सतत अकोल्यातून निवडणूक लढले. मात्र ते काही जिंकून येऊ शकले नाहीत. त्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल की, शिवसेना आपल्यासोबत आल्यावर हिंदुत्ववादी मते आपल्यासोबत येतील. पण त्यांना माहित नाही की, हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडलेली आहे. कारण शिवसनेने हिंदुत्व सोडले असल्याने हिंदुत्ववादी मते त्यांच्यासोबत राहणार कशी? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.
मंडल आयोग आला त्यावेळी मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचे समर्थन भाजपने केले होते. मात्र शिवसनेने त्याचा विरोध केला होता. सर्वच प्रकारे आरक्षण रद्द करून, ते आर्थिक निकषांवर केले पाहिजे अशाप्रकारची भूमिका सातत्याने शिवसेनेची राहिली आहे. त्यामुळे जी काही भूमिका आरपीआयची होती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती, किंवा आता प्रकाश आंबेडकर यांची आहे याच्या पूर्ण विपरीत भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेसोबत प्रकाश आंबेकर यांना जावं लागतय. याचा अर्थ म्हणजे भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड करायाला तयार आहेत.
या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवर भाष्य करत खोचक शब्दात टीका केली आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी विरोध करणाऱ्या शिवसेनेसोबत आज प्रकाश आंबेडकरांनी युती केली असल्याचा टीकाही फडणवीस यांनी केली आहे.