नगरपरिषद निवडणूक ठरवणार सांगोल्याचा आमदार
कारण-राजकारण, नगरपरिषद निवडणूक तालुक्याला नवी राजकीय दिशा देणारी ठरणार
सांगोला : डॉ. नाना हालंगडे
सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर येणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने ‘शेकापसाठी अस्तित्वाची तर महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची’ असणार आहे. ही नगरपरिषदेची निवडणूक तालुक्याला नवी राजकीय दिशा देणारीच ठरणार आहे. त्यातच उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत जुळलेल्या नव्या समीकरणांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीच्या यश-अपयशावरच सांगोल्याचा आगामी आमदार ठरणार आहे.
हेही वाचा : जतजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात, एक ठार, दोघे गंभीर जखमी
राजकीय समीकरणे बदलली
तालुक्यात यावेळच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. राजकीय आखाड्यातील निवडणुकांंत कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हेच सध्या तालुक्यातील राजकारणात दिसून येत आहे. यावेळेच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठीही सर्वात अगोदरच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने ही निवडणूक एकत्रीत लढविण्याची घोषणा केली आहे. तर गेल्यावेळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पत्नी लोकनियुक्त नगराध्यक्षा व स्वतःही नगरसेवक असलेले आनंदा माने यांनी विधानसभेच्या निवडणूकीनंतर आमदार शहाजी पाटील यांची सोबत सोडून सध्या शेतकरी कामगार पक्षासोबत आपल्या युतीची घोषणा केली आहे.
शेकापला एकटे पाडण्याचा प्रयत्न
नुकत्याच उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाला महाविकास आघाडीने साथ दिली व शेकापला एकटे पाडण्याचा प्रयत्न यशस्वी केला. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीसाठीचे पक्ष, पक्षातील नेतेमंडळी या सर्वांची समीकरणेच वेगळी झाली आहेत. त्यातच शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याने यांच्या निधनानंतर शेकाप पक्ष प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे गेल्यावेळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात लढलेले आज काहीजण हातात-हात घालून युतीची, आघाडीची घोषणा करताना दिसत आहेत.
- सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले
- सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी हरीश बैजल
- सोलापूरात राष्ट्रवादीचा काँग्रेसला झटका
- शेतकऱ्यांनो ऐकलत का? शासनाच्या अनुदानातून करा ड्रॅगनफ्रूट लागवड
दोस्त – दोस्त ना रहा
विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर स्वर्गीय गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील सर्वच कार्यक्रमात, निवडणुकीत एकत्रित असत. परंतु विधानसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी शेकाप विरोधात भूमिका घेत आ. शहाजी पाटील यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तसेच नगरसेवक आनंदा माने व जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार हे विधानसभेच्या निवडणुकीत आ. शहाजीबापूंना आमदार करण्यासाठी प्रयत्न करणारे दोघेही आज आ. शहाजी पाटील यांची साथ सोडून शेकाप पक्षासोबत दोस्ताना करीत असल्याचे दिसून येत आहे.
राजकीय समीकरणांबाबत संभ्रम
नुकत्याच झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शेकापला पदापासून दूर ठेवण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला साथ देऊन निवडूनही आणले. त्यामुळे तालुक्यात येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपची भूमिका काय असेल हे पाहवे लागणार आहे. पक्षीय राजकारणाबरोबरच व्यक्तिकेंद्रित युती, आघाडीचे समीकरणेही जुळणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.
- हेही वाचा : संघर्षाचा इतिहास पुन्हा घडवा : शरद पवार
महाविकासकडे दिग्गज नेते मंडळी तर शेकापच्या नेतृत्वाचा कस
या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील व काँग्रेसचे प्रांतिक सदस्य प्रा. पी. सी. झपके हे तीन प्रमुख पक्षाचे दिग्गज नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची निवडणूक पार पडणार आहे. तर दुसरीकडे स्वर्गीय आबासाहेबांनंतर शेकापच्या नेतृत्वाची खरी कस लागणार असून अस्तित्व निर्माण करण्यासाठी ही निवडणूक खरी कसोटीची ठरणार आहे.