“धर्मराज निमसरकर” : न विसरता येणारा उल्कापात
प्रा. प्रसेनजित तेलंग यांचा विशेष लेख
अगदी कळत्या वयात प्रवेश करतानाच पस्तिसेक वर्षापू्र्वी धर्मराजांची कविता भेटायला लागली. त्यांच्या कवितेतला आवेश मनाला रक्तबंबाळ करायचा. धमन्यांत जाळ पेरायचा. जात, धर्म , संस्कृती आणि एकूणच समग्र परंपरेची चीड त्यांची कविता वाचतांना/ ऐकतांना सरसरून वर यायची.
अस्मितादर्श, निकाय, युगवाणी, पूर्वा, लोकमतची साहित्यजत्रा, सा. जयभीम अशा अनेक नियतकालिके आणि वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांतून त्यांची कविता भेटायची. ’रणांगणावरील निळी गर्भाळ पहाट’, ‘निळ्या पहाटेच्या सूर्यपुत्रांची अधोरेखितं’ हे त्यांचे दोन्ही कवितासंग्रह याची साक्ष देतात. हा रणांगणातला कवी. सामाजिक समरांगणात विषमतेविरोधात डॅा.बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांचे खड़्ग हातात घेऊन लढत राहिला. ‘जंगलाच्या नव्या आलेखाबद्दल’ ही त्यांची एक मनात रूजून राहिलेली कविता.
त्याने जंगलाच्या संदर्भाचा नवा आलेख
फसवून द्विधा झालेल्या झुडुपांसमोर सादर केला
तो त्यांच्यासाठीच होता असा त्यांचा सूर होता.
पण उपस्थितांमध्ये फक्त रंगविलेले
चिनार झाडच होते,
तेवढ्यामध्येही त्याला बरंच समाधान झालं.
नाहीतरी आलेख तयार करीत असताना
त्याला असंच वाटायचं…
आपला आलेख समजून घेण्याची पात्रता फक्त
चिनार झाडामध्येच आहे.
हेही त्याला सांगायचं होतं;
म्हणजे चिनार झाडांचीही मेहरनजर
अटळ राहील आणि झुडुपांमध्येही
भरभक्कम पत अबाधित राहिलं.
यामध्ये आपण काही बनवाबनवीचा प्रकार करतो आहो
असे त्याचे गावीही नव्हते,
अर्थात हे सगळं त्याचेसाठी गृहीत.
त्याला माहित आहे जंगल उभारणीच्या
सत्कृत्यासाठी आपले जेवढे हात लागले
तेवढे आणखी कुणाचे लागले नसतील.
तरीपण अंगभर वाढलेल्या पापांकडे
दुर्लक्ष करून रस्त्यांवर भडव्यांचे हाट लागतात
हे त्याला सांगावसं वाटतं…
कारण दगडांवर कोरलेली वाक्यं…
इतिहासात जमा होतात;
आणि इतिहासाच्या पानांवर जमा असलेल्या
अर्थात; फसव्या तत्त्वज्ञानाची पुढची पिढी
उदो उदो करते.
मित्रा, ज्या जंगलाचे संदर्भ गोळा केले आहेस
त्या जंगलाचं जंगलपण उपभोगलं आहेस काय?
नाही… असं जर उत्तर असेल
तर तुझ्या आलेखाची काही किंमत नाही.
आधी जंगलाच्या काळोखात उसविणाऱ्या
आयुष्याच्या पोटी जन्म धे !
तुला कोणतेही संदर्भ गोळा करण्यासाठी
ग्रंथालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत,
सगळे संदर्भ तुझ्या मानगुटीवर ओझ्यासारखे
लादूनच येतील.
धर्मराज निमसरकरांच्या काव्यातून आकांतणारी ही लय त्यांच्या शेकडो कथांतूनही प्रकटत राहिली. त्यांनी विपूल कथालेखन केले. अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या आघाडीच्या नियतकालिकांतून, दिवाळी अंकातून त्यांच्या कथा भेटत राहिल्या. त्यांच्या कथांतील भाषेला एक देखणे भाषिक अलंकरण होते. अनेकदा त्यांच्यातला कवी त्यांच्या कथेतील भाषेवर आरूढ झालेला असायचा. हे सारं मोठं लोभसवाणंच असायचं. समाजातील सामान्यांचा जगण्याचा संघर्ष आपल्या कथांतून अधोरेखित करताना त्यांच्यातला आंबेडकरी जाणीवेचा आणि धम्माविचारांचा कार्यकर्ता त्यांच्या लेखनातून कधीच उणा करता येवू शकत नाही. अंतहिन, आंदोलन, उसवलेलं आकाश, वेदनास्पर्श, ठसठसणाऱ्या जखमा, संकेतबंड या कथासंग्रहांतून धर्मराज निमसरकरांचा लेखनाचा आवाका लक्षात येतो. काही वैचारिक तसेच कॅालम वजा लेखनही त्यांनी केले आहे. धर्मराज निमसरकर यांना ‘अस्मितादर्श’ आणि ‘लोकानुकंपा कथा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.
आयुष्याच्या अंतिम पर्वात ते धम्मचळवळीत मन:पूर्वक रमले होते. ०५ नोव्हे. १९४९ (वणी परिसरातील राजुरा कॅालनीत, जि.चंद्रपुर)ला निळ्या नभांगणात अवतीर्ण झालेला धर्मराज निमसरकर नावाचा हा तारा आंबेडकरी साहित्य,संस्कृती आणि माणसांच्या कळवळ्याच्या चळवळीत अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळ आपल्या तेज:पूंजकेने तळपत राहिला. बरोबर आज एक वर्षापूर्वी तो उल्का बनून निखळून पडला. हा तारा आता त्यांच्या कथा, कादंबरी, काव्यांच्या शब्दांतून लुकलुकत राहील… तो लुकलुकत राहील शब्दांच्या अस्तित्वापर्यंत… तुम्ही, मी आहे तोपर्यंत. कदाचित हे निळंभोर आकाश अस्तिवात आहे तोपर्यंत.
– प्रा. प्रसेनजित एस. तेलंग
(मो. 9960910240)
prasenjittelang@gmail.com