धनत्रयोदशी का साजरी केली जाते?
वाचा पुराणकथा, यादिवशी असते पूजेला महत्त्व

थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे
धनत्रयोदशी हीच धन्वंतरी जयंतीही आहे. धन्वंतरी म्हणजे समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निघाली, त्यापैकी एक प्रमुख रत्न. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे मूळ निर्माते. देवांचे राजवैद्य! कोणालाही अकाली मृत्यू येऊ नये, अशा उदात्त विचाराने सुरू झालेल्या दिवाळी या सणाच्या प्रारंभी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंतीची सांगड घातली जाणे हे खरोखरच मोठे सूचक आहे, नाही? वैद्यकशास्त्र तरी दुसरे काय करते? अकाली मृत्यू येऊ नये म्हणून धडपड करते. प्रकृती बरी राहावी, मृत्यू दूर असावा, यासाठी मार्गदर्शन करते. धार्मिक आचरणातून आपण अकाली मृत्यू टाळावा म्हणून यमराजाचे सांगणे ऐकून त्याप्रमाणे पिढ्यान्पिढ्या दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावतो. धर्म आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी धनत्रयोदशीच्या निमित्ताने अशा एकत्र आल्या आहेत.
धनत्रयोदशीचे महत्त्व दिवाळीचा शुभारंभ करणारा दिवस म्हणून तर आहेच पण अपमृत्यू टाळण्यासाठी आपण हा दीपोत्सव करीत आहोत आणि मिळणारे आयुष्य आरोग्यपूर्ण असावे, धर्माच्याच चौकटीत राहून त्यांचा मन:पूत उपभोग घेता यावा म्हणून त्या दिवशी धन्वंतरीचेही स्मरण केले जाते. – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (देवाचिये व्दारी पुस्तकामधून)
धनत्रयोदशी सण का साजरा केला जातो?
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.
या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली.
त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
धनत्रयोदशीपासून पाच दिवसीय दीपोत्सवाला सुरुवात होत आहे. यावेळी 22 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून धनत्रयोदशीला प्रारंभ होईल आणि 23 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. यामुळे 22 आणि 23 तारखेला धनत्रयोदशी साजरी होणार आहे. 22 रोजी संध्याकाळी धन्वंतरी पूजन आणि यम दीपदानासाठी 1-1 मुहूर्त असेल आणि संपूर्ण दिवस खरेदीसाठी शुभ राहील. या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होत आहे. असे मानले जाते की या योगात केलेल्या कामाचे फळ 3 पट मिळते.
23 तारखेला दिवसभर सर्वार्थसिद्धी योग राहील. त्यामुळे, संपूर्ण दिवस सर्व प्रकारच्या खरेदी, गुंतवणूक आणि नवीन सुरुवातीसाठी शुभ काळ असेल. अशा प्रकारे 22 आणि 23 व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाईल.
धनत्रयोदशीला सोने-चांदी आणि भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे. या दिवशी सायंकाळी प्रदोषकाळात कुबेर आणि लक्ष्मीसह भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. अकाली मृत्यू टाळण्यासाठी आणि उत्तम आरोग्याची इच्छा करण्यासाठी घराबाहेर यमराजासाठी दक्षिण दिशेला दिवा लावला जातो.
पौराणिक कथेनुसार, शरद पौर्णिमेला समुद्र मंथनाच्या वेळी, कामधेनू गाय कार्तिक महिन्याच्या बाराव्या दिवशी आणि धन्वंतरी दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला हातात सोन्याचा कलश घेऊन प्रकट झाले. जे अमृताने भरलेले होते. त्यांच्या दुसर्या हातात औषधे होती आणि त्यांनी जगाला अमृत आणि आयुर्वेदाचे ज्ञान दिले. यामुळेच या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. पुराणात त्यांना भगवान विष्णूचा अवतार देखील मानले गेले आहे..
या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.)
‘मपोसे’ ते आयपीएस अधिकारी : नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास
माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका : आ. शहाजीबापू पाटील