देवा जोतिबा चांगभलं

चैत्र यात्रेनिमित्त जोतिबा मंदिराची ओळख करून देणारा लेख

Spread the love
❝ कोल्हापूर म्हटलं की आपसुकच जोतिबा देवस्थानाची आठवण येते. गर्द निसर्गाच्या कुशीत डोंगरमाथ्यावर वसलेल्या जोतिबाची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आज, सोमवारी पहाटे श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेतील धार्मिक विधी पार पडले. हा सोहळा १६ मानकऱ्यांसह देवस्थान समितीचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी अशा ४५ जणांच्या उपस्थितीत झाला. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी जोतिबा यात्रा सलग दुस-याही वर्षी रद्द झाली. लाखो भक्तांना घरातूनच दर्शनाचे समाधान मानाने लागतेय. आज जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त जोतिबा मंदिर व परिसराची एेतिहासिक ओळख करून देणारा हा लेख नक्की वाचा. ❞

• एेतिहासिक संदर्भ
जोतिबा हे दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रख्यात दैवत आहे. कोल्हापूरपासून वायव्येस सुमारे १४ कि.मी. वर पन्हाळा तालुक्यात पायथ्यापासून सुमारे ३०५ मी. उंचीचा जोतिबाचा डोंगर असून त्यावर जोतिबाचे ठाणे आहे. या डोंगराला ‘रत्नागिरी’ असे नाव आहे. जोतिबाच्या मंदिराजवळ गुरवांची वस्ती असून ते जोतिबाचे पुजारी आहेत. ही गुरवांची वस्ती ‘वाडी-रत्नागिरी’ म्हणून ओळखली जाते. प्राचीन काळापासून हा डोंगर एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. वाडी-रत्नागिरी ह्या खेड्यात काही प्राचीन मंदिरांचा समूह असून त्यातील केदारलिंग, केदारेश्वर,रामलिंग आणि चर्पटांबा किंवा चोपडाई ह्या देवतांची मंदिरे विशेष महत्त्वपू्र्ण आहेत. यांतील केदारलिंगाचे किंवा जोतिबाचे मंदिर प्रमुख असून मध्यभागी आहे. जोतिबा हा मूळचा ज्योतिर्लिंग केदरनाथ मानला जातो. कोल्हापूरच्या अंबाबाईला किंवा महालक्ष्मीला कोल्हासुर, रत्नासुर इ. दैत्यांच्या संहारकार्यात मदत करण्यासाठी प्रत्यक्ष केदारनाथच हिमालयातून जोतिबा डोंगरावर येऊन राहिला आणि त्याने दैत्यसंहार करून तेथे आपल्या केदारलिंगाची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे. अंगापूरकरविरचित मराठी केदार विजयात (सु. १७७९) ही कथा आलेली आहे. केदारेश्वर, केदारलिंगे, केदारनाथ, खळेश्वर इ. जोतिबाचीच नावे आहेत. जोतिबा हे उच्चारसुलभ लौकिक रूप ज्योतिर्लिंग ह्या शब्दापासूनच बनले असावे.

• मंदिराचा पूर्वेइतिहास
जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे ते इ.स. १७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुर्नचित करून बांधले. हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.

• इतर मंदिरांचे महात्म्य
दुसरे केदारेश्वराचे देवालय, विशेष म्हणजे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे. हे मंदिर १५५ वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले. केदारलिंग व केदारेश्वर यामध्ये चर्पटअंबा म्हणचे चोपडाईचे देवालय आहे. ते इ.स. १७५०मध्ये प्रीतीराव चव्हाण, हिंमतबहादूर यांनी बांधले. या तीन देवळांचा एक गट होतो.

चौथे रामेश्वराचे देवालय, हे इ.स. १७८० मध्ये मालजी निकम, पन्हाळकर यांनी बांधले. केदारेश्वरसमोर एका लहानशा चौथऱ्यावर दोन काळ्या दगडात नंदी आहेत. हेही दौलतराव शिंदे यांनी बसविले. देवालयाचे पूर्वेकडील बाहेरील बाजूस सटवाई पूर्वाभिमुख आहे. पश्चिमेस रामलिंग पूर्वाभिमुख आहेत. देवालयाचे भिंतीवर पाच, सहा ठिकाणी वीरगळ दगडही बसविले आहेत.

• बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना
श्री केदारनाथाने जोतिबा डोंगराभोवती बारा ज्योतिर्लिंग स्थापन केली म्हणून त्यांना ‘ज्योतिर्लिंग’ असेही म्हणतात. बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करताना त्यांनी सर्व प्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणाचे स्मरण म्हणून हिमालयातील केदारेश्वर लिंग स्थापन केले म्हणून त्यांना केदारलिंग असेही म्हणतात.

• जोतिबाची मूर्ती
जोतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेली आहे. या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच जोतिबाचे उपवाहन शेष आहे. जोतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. जोतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व जोतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. जोतिबाची बहिण यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला आहे.

• देवाचे वाहन घोडा
जोतिबा या नावाची उत्पत्ती ‘ज्योत’ या शब्दापासून झाली आहे. ज्योतिर्लिंग या शब्दाचा अपभ्रंश गावठी भाषेत जोतिबा झाले आहे. जोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडेचार फूट उंचीची आहे. मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हाती खड्‌ग, त्रिशूल, डमरू असून त्यांचे वाहन घोडा आहे.

• दररोज तीनवेळा होते पूजा
जोतिबा देवाची रोज तीन वेळा पूजा बांधली जाते. पहिली साधी पूजा सकाळच्या महाभिषेकापूर्वी, दुसरी खडी पूजा अभिषेकानंतर तर तिसरी पूजा बैठी असते. ती दुपारनंतर बांधण्यात येते. दर शनिवारी “श्रीं’ची दुपारी बारा ते तीन वेळेत घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. सर्व पूजा डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असतात. दक्षिण मोहिमेत श्री केदारनाथ व औंदासूर या राक्षसाची समोरासमोर भेट झाली. निकराचे युद्ध झाले; परंतु औंदासुराचा वध मूळ माया श्री यमाईदेवीच्या हस्ते असल्याने जोतिबा देवांनी देवीस “यमाई’ अशी साद घातली. तेव्हापासून देवीचे नाव यमाई असे रूढ झाले. यमाई ही जोतिबाची बहीण आहे.

• यात्रेत लवाजम्याला महत्त्व
श्री जोतिबाच्या धार्मिक विधीत उंट, घोडा, हत्ती या मानाच्या प्राण्यांना पूर्वीपासून मोठा मान आहे. पालखी सोहळे, पूजाअर्चा, धुपारती सोहळा यात उंट, घोडा, हत्ती यांचा सहभाग असतो. जोतिबाचे वाहन म्हणून घोड्यास मान आहे. प्रत्येक शनिवारी जोतिबाची घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. यावेळी मानाचा घोडा मंदिराच्या मुख्य कमानीत ( नावजींची कमान ) पूजा उतरेपर्यंत उभा करण्यात येतो. दर रविवारी दुपारी बारा वाजता व रात्री साडे आठ वाजता निघणाऱ्या पालखी सोहळ्यासमोर हे मानाचे प्राणी सजवून खडे केलेले असतात. जोतिबाच्या चैत्र यात्रेत तर या प्राण्यांवर गुलाल, खोबरे, खारीक यांची प्रचंड उधळण होते.

• जोतिबाची वस्त्रे व अलंकार
जोतिबा देवाची मूर्ती स्थानिक काळ्या पाषाणात घडवलेली असून ती अंदाजे ४ फूट ३ इंच उंचीची आहे. मूर्ती चतुर्भुज असून क्रमणपद अर्थात डावा पाय किंचीत पुढे टाकलेल्या स्थितीत उभी आहे. उजव्या हातात खड्ग, वर डमरू डावीकडे त्रिशूल आणि खाली अमृत पात्र असून कमरेला पंचा असून गळ्यात कंठहार आहे. माथ्याला नऊ वेटोळ्याची जटा आहे. हातात कडे आणि पायांत तोडे असून कानात नाथपंथी गोल कुंडलं आहेत. दररोज श्रींच्या वस्त्रालंकाराने सालंकृत पूजा बांधल्या जातात. श्रींच्या खड्या पूजेस डोईस मराठेशाही पगडी, बारा बंदी अंगरखा, शेला असा वेश असतो. अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात. पायात सोन्याचे तोडे, हातांच्या बोटात हिरेजडित अंगठ्या असतात. गळ्यात सोन्याच्या विविध माळा, डोईस शिरपेच असे अलंकार असतात. हे अलंकार परिधान केल्यानंतर येथील वातावरण प्रसन्न बनते.

• डोंगरच्या राजाला तोफेची सलामी
जोतिबा डोंगरावर महत्त्वाच्या सोहळ्यावेळी तोफेची सलामी दिली जाते. दर रविवार व पौर्णिमेच्या दिवशी पालखी सोहळा होतो. यावेळी रात्री नऊ वाजता तोफेची सलामी दिली जाते. विजया दशमीदिवशी सोने लुटण्याच्या कार्यक्रमावेळी सायंकाळी सहा वाजता पाच वेळा तोफेची सलामी दिली जाते. चैत्र यात्रा काळात मुख्य मंदिराच्या परिसरात दोन वेळा तर यमाई मंदिराच्या परिसरात एक वेळा सलामी दिली जाते. गुढी पाडव्याला पंचांग वाचण्यापूर्वी, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, काळभैरव जयंती या दिवशी तोफेची सलामी दिली जाते.

(संदर्भ साभार : मराठी विश्वकोश, www.shreejyotiba.com, देवस्थान समितीचे संकेतस्थळ, विकीपीडिया)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका