दूध व्यवसायातून मिळतेय ग्रामीण अर्थकारणाला बळकटी
रविवार विशेष / डॉ. नाना हालंगडे
दूध व्यवसायाने ग्रामीण अर्थकारणच बदलवून टाकले आहे. हजारो लोकांना हक्काचा रोजगार यातून प्राप्त होत आहे. दूध व्यवसायातून ग्रामीण अर्थकारणाला मोठी बळकटी मिळताना दिसत आहे. असे असले तरी हा व्यवसाय जोखमीचा आहे. यासाठी दुधाचा दर्जा टिकवण्यासाठी काही काळजी घेण्याचीही गरज आहे.
दूध काढणी, हाताळणी, वाहतूक आणि विपणनादरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी दूध उत्पादन वाढीबरोबरच स्वच्छ दूध निर्मितीकडे काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.
दूध हे नाशिवंत असून जनावरांच्या कासेतून दूध काढल्यापासून ते दूध संकलन केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत योग्य काळजी घेणे आवश्यक असते. दूध काढणी, हाताळणी, वाहतूक आणि विपणना दरम्यान दुधामध्ये संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे दुधाची प्रत ढासळण्याची शक्यता असते. परिणामी दूध नासते. अस्वच्छ दूध आरोग्यास हानिकारक ठरते. अशा दुधामध्ये रोगजंतूंची झपाट्याने वाढ होऊन गुणवत्ता खालावते. त्यासाठी पशुपालकांनी दूध उत्पादन वाढीबरोबरच स्वच्छ दूधनिर्मितीकडे काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून दूध व दुग्धजन्य पदार्थांची प्रत टिकून राहण्यास मदत होईल आणि चांगले दर मिळतील. महत्त्वाच्या बाबी.
दुधाळ / दुभती जनावरे
दुभती जनावरे नेहमी स्वच्छ व निरोगी असावीत. जनावरांना कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग नसावा. प्रामुख्याने कासदाह, क्षय व विषमज्वर अशा आजारांची बाधा झालेल्या जनावरांचे दूध वापरू नयेत. जनावरांची नियमितपणे पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी. आजारी जनावरांना वेळेवर उपचार करावे. संसर्गजन्य रोगग्रस्त जनावरांची व्यवस्था स्वतंत्र ठिकाणी करावी. दूध काढताना गाई-म्हशींची पाठीमागची त्वचा तसेच कासेभोवतीचा भाग स्वच्छ करावा.
दूध काढणारी व्यक्ती
दूध काढणारी व्यक्ती नेहमी स्वच्छ व निरोगी असावी. कोणतीही जखम किंवा संसर्गजन्य आजार नसावा. कोणत्याही प्रकारचे व्यसन नसावे. नखे वाढलेली नसावीत. दूध काढण्यापूर्वी हात जंतुनाशकाने धुऊन घ्यावेत. गोठ्यामध्ये थुंकणे, खोकणे, धूम्रपान इत्यादी वाईट सवयी टाळाव्यात. नेहमी कोरड्या हाताने दूध काढावे.
दूध काढण्यासाठी पूर्ण हात पद्धतीचा अवलंब करावा. दूध साधारण ७ ते ८ मिनिटांत काढावे. कारण, गाई-म्हशी पान्हावल्यापासून दूध देण्यासाठी आवश्यक असलेल्या संप्रेरकांचा अंतःस्त्राव ८ मिनिटांपर्यंत होतो.
दूध काढण्याची जागा किंवा गोठ्याचा परिसर
दुभत्या जनावरांचा गोठा मानवी वस्तीपासून लांब, थोड्या उंचावर व पाण्याचा निचरा होणाऱ्या मुरमाड किंवा खडकाळ ठिकाणी असावा. गोठ्याच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा उग्र वास येत नसावा. धार काढताना भांड्यामध्ये धूळ उडणार नाही याची दक्षता घ्यावी. गोठ्याची उघडी बाजू पश्चिमेस राहील अशा रीतीने गोठ्याची उभारणी असावी. यामुळे गोठ्यात हवा खेळती राहून घाण वास, डास, गोचीड, माश्या यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
दूध काढण्याच्या अर्धा ते १ तास आधी केरकचरा व शेण काढून गोठा स्वच्छ करावा. वर्षातून १ ते २ वेळा गोठ्याला चुना लावावा. पाण्याच्या हौदाला सिमेंटचे प्लास्टर करावे. दूध संकलनाच्या खोलीमध्ये कांदा, कीटकनाशके, खते, रंग, रॉकेल इत्यादी वस्तू ठेवू नयेत. गोठ्यातील मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावावी.
दुधाची भांडी व यंत्रे
दूध काढण्यासाठी व साठवण्यासाठी लागणारी भांडी फक्त दुधासाठी वापरावीत. भांडी ओबडधोबड किंवा चेपलेली नसावीत. भांडी शक्यतो स्टेनलेस स्टीलची असल्यास जास्त काळ टिकतात. दूध काढण्यापूर्वी व काढणीनंतर दुधाची भांडी कोमट पाण्यामध्ये जंतुनाशक द्रावण तयार करून त्याने धुऊन घ्यावीत. दुधाची भांडी धुतल्यानंतर कोरड्या जागी वाळण्यास ठेवावीत. शक्य असल्यास उन्हामध्ये वाळवून ठेवावीत. भांड्यांचा पुन्हा वापर करताना भांडी क्लोरीनयुक्त पाणी टाकून संपूर्ण निर्जंतुक करावीत.
*जनावरांचे खाद्य व पाणी
जनावरांचे खाद्य व पाण्याला उग्र वास येत नसावा. कीडनाशक व बुरशीनाशके फवारलेला चारा जनावरांना देऊ नये. आंबवण देताना नेहमी ओलसर करून द्यावे. गोठा व भांडी धुण्यासाठी वापरलेले पाणी शुद्ध व स्वच्छ असावे. शक्यतो धुण्याच्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतंत्र असावी.
*इतर बाबी*
प्रतिजैविकांचा वापर कमीत कमी आणि तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच करावा. दुधातील भेसळ करणे ही भेसळ आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असून कायदेशीर गुन्हा आहे. दूध काढल्यावर त्वरित दूध संकलन केंद्रात पाठवावे. जेणेकरून दुधाची प्रत टिकून राहील. दूध शीतगृहात ठेवून थंड केल्यास जास्त काळ टिकते. आणि विक्रीपर्यंत चांगले राहते.
गाई, म्हशींतील दुग्धज्वराची लक्षणे, कारणे
चयापचय आजारांपासून गाई, म्हशींना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधक उपाय महत्त्वाचे आहेत आजार होण्यापूर्वीच योग्य आहार व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता, उत्तम निगा राखल्याने हा आजार टाळण्यास मदत होते. आजाराच्या उपचारापेक्षा प्रतिबंध करणे उपयुक्त ठरते.
उच्च दूध उत्पादन आणि आहारातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे उत्पादकतेशी निगडित दुधाळ जनावरांमध्ये विविध चयापचयाचे आजार होतात. यामध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे दुग्धज्वर. हा आजार प्रामुख्याने जास्त दूध देणाऱ्या संकरित गाई आणि म्हशींमध्ये आढळून येतो. आजाराचा प्रादुर्भाव साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळून येतो.
गाभण काळातील शेवटचा टप्पा व व्यायल्यानंतर जास्त दूध उत्पादनाचा काळ यामध्ये दुधाळ जनावरांची निगा, आरोग्य, आहार व व्यवस्थापन योग्यप्रकारे न करणे हे चयापचय आजार होण्यामागचे मुख्य कारण आहे. दुभत्या जनावरांमध्ये तिसऱ्या ते पाचव्या वेतामध्ये आजार दिसतो. पहिल्या किंवा दुसऱ्या वेतामध्ये जनावराची चाऱ्यातील क्षार शोषण्याची क्षमता तसेच हाडांमध्ये असलेले जास्त कॅल्शिअमचे प्रमाण यामुळे आजार होण्याचा धोका फार कमी असतो. आजार मुख्यत्वे संकरित गाई (५ ते ७ %) आणि म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. रक्तातील कॅल्शिअम कमतरतेमुळे आजार होतो. प्रसूतीनंतर दूध देण्याचा कालावधी तसेच चीक आणि दूध उत्पादनासाठी कॅल्शिअमची मागणी शरीराच्या कॅल्शिअम पुरवठा करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असते, तेव्हा आजार दिसतो.
गाय आणि म्हैस व्यायल्यानंतर ४८-७२ तासांच्या आत अचानक कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते व्यायल्यानंतर १-३ दिवसांत आजाराची लक्षणे दिसतात. जनावर अस्वस्थता आणि अशक्तपणा येऊन खाली बसते दुधाळ गायी, म्हशींमध्ये कॅल्शिअमची सामान्य पातळी ८.१२ मिलि, डीएल असते. जेव्हा ही पातळी ५.५ मिलि, डीएल पेक्षा कमी होते, तेव्हा आजाराची लक्षणे दिसतात, शरीरातील उर्वरित कॅल्शिअम स्नायूंमधून वापरले जाते. यामुळे शेवटी पक्षाघात आणि मज्जासंस्थेच्या अति उत्तेजनाची लक्षणे दिसून येतात.
आहारातील कॅटायन आणि अनायन असंतुलनामुळे दुग्धज्वर होतो. उच्च डी कॅड असलेले पशुखाद्य आहारामध्ये आल्यास या आजाराची शक्यता वाढवते. आहारामध्ये नकारात्मक डी कॅड हा आजार रोखू शकते.
विण्यापूर्वी आहारामधील कॅल्शिअम सामग्रीऐवजी डी कॅड कमी करणे, ही आजार टाळण्याचा उपाय आहे. कारण कॅल्शिअमचे प्रमाण कमी करण्यासाठी भाकड गायींना जास्त खुराक किंवा तृणधान्ये खायला देणे घातक ठरू शकते. यामुळे गाईंना फॅटी लिव्हर सिंड्रोम, किटन बाधा, अतिरिक्त ऊर्जेच्या घनतेमुळे पोट सरकणे यांसारख्या इतर गुंतागुंत होण्याची शक्यता असते.
डी कँडचे संतुलन राहण्याकरिता प्रसूतिपूर्व गायींच्या आहारामध्ये अनिओनिक क्षार (म्हणजे क्लोराइड, सल्फर किंवा फॉस्फरसचे क्षार) पुरवठा केल्याने ही परिस्थिती टाळता येते, सामान्यतः दुभत्या गायींच्या आहारामध्ये डी कॅडची पातळी + १०० ते + २०० meq / kg असते, अनिओनिक क्षार किंवा आहारामध्ये खनिज आम्ल जोडल्याने डी कॅड पातळी घटते आणि दुग्धज्वराचे प्रमाण कमी होते.
हा आजार मुख्यतः माफक हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे आणि व्यायल्यानंतर उच्च दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांमध्ये बघायला मिळतो. चीकामधील कॅल्शिअम रक्त पुरवठ्यापेक्षा ८ ते १० पट जास्त असू शकते, हे प्रमाण रक्तामध्ये हाडांमधून सोडलेल्या कॅल्शिअमपेक्षा जास्त असते. म्हणून रक्तामधील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. अशा जनावरास दुग्धज्वर होतो. याव्यतिरिक्त इतर चयापचय विकारांमुळे क्लिनिकल आणि सबक्लिनिकल हायपोकॅलेसिमिया होऊ शकतो (म्हणजे बद्धकोष्ठता होणे, पोट सरकणे, जार अडकणे, गर्भाशय विकार, गर्भाशयस्नायू दाह आणि किटन बाधा (केटोसिस).
*आजाराची मुख्य कारणे :
रक्तातील कॅल्शिअमची पातळी कमी होते. व्यायल्यानंतर चिकामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शिअम सवल्यामुळे रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते.
प्रसूतिपूर्व व पश्चात दुधाळ जनावरांमध्ये जीवनसत्त्व ड ची कमतरता. दुधाळ जनावरांमध्ये कॅल्शिअमची वाढलेली गरज.
आहारातून कमी प्रमाणात कॅल्शिअम मिळणे. आहारात कॅल्शिअम आणि स्फुरदाचे योग्य संतुलन नसणे ( योग्य संतुलन २:१). विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर जनावरांना पोषक आहार कमी प्रमाणात मिळणे किंवा उपासमार होणे. आहारात ऑक्सलेट आणि मॅग्नेशिअम जास्त प्रमाणात असणे. चाऱ्यातील कॅल्शिअमचे आतड्यामध्ये योग्य प्रकारे शोषण न होणे. प्रसूतिपूर्व गर्भावस्थेत जनावरांना आवश्यकतेपेक्षा, गरजेपेक्षा जास्त कॅल्शिअम पुरवणे. शरीरात कॅल्सीटोनिनचे अधिक प्रमाण आणि पॅराथार्मोन या संप्रेरकाची कमतरता असणे. प्रसूतीच्या वेळी जनावराची तणावपूर्ण स्थिती.
*आजाराची लक्षणे :
आजारास दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फीवर असे नाव असले, तरी यामध्ये जनावराचे तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले असते. जनावरास ताप नसतो (९७-९८ अंश फॅरनहाइट). जनावराची रोग प्रतिकार शक्ती कमी होते, प्रसूती नैसर्गिकरीत्या व्हायला अडचण निर्माण होते.
दुग्धज्वर हा आजार दृश्य (ज्यामध्ये आजाराची लक्षणे दिसून येतात) आणि सुप्त (ज्यामध्ये आजाराची लक्षणे दिसत नाहीत) या प्रकारांमध्ये आढळून येतो.
*लक्षणांचे टप्पे
_*(अ ) प्रथम अवस्था :
_अवस्थेमध्ये दुग्धज्वर बहुतेक वेळा त्याच्या कमी कालावधीमुळे (< १ तास) पशुपालकांच्या लक्षात येत नाही._
या अवस्थेत दिसलेल्या लक्षणांमध्ये भूक न लागणे, उत्तेजितता, चिंताग्रस्तपणा, अतिसंवेदनशीलता, अशक्तपणा, वजन बदलणे, थर थर कापणे, डोके हलविणे, सतत जीभ बाहेर काढणे, दात खाणे, तोंडातून लाळ गाळणे, अडखळत चालणे यांचा समावेश होतो.
*(ब ) द्वितीय अवस्था :
या अवस्थेमध्ये चिन्हे १ ते १२ तासांपर्यंत दिसू शकतात. प्रथम लक्षण म्हणजे जनावर खाली बसते, ते नीट उभे राहू शकत नाही.
बाधित जनावर पोटावर बसून मान पोटाकडे वळवून बसते. निस्तेज आणि सुस्त दिसते.
नाकपुड्या कोरड्या पडतात, डोळे कोरडे पडतात. त्यांची हालचाल मंदावते, शरीर थंड पडते. शरीराच्या तापमानात सामान्यतः ९६ अंश फॅरनहाइट ते १०० अंश फॅरनहाइटपर्यंत घट दिसते. श्वासोच्छ्वास व नाडीचे ठोके जलद होतात (प्रति मिनीट १०० ठोके).
जनावर लघवी करणे, शेण टाकणे, व दूध देणे बंद करते. जनावर रवंथ करणे थांबवते आणि ओटी पोटाची हालचाल मंदावल्यामुळे जनावराचे पोट फुगते, गुदद्वार सैल पडते.
गाभण जनावरांमध्ये शेवटच्या महिन्यात जर कॅल्शिअमची पातळी कमी असेल तर मायांग बाहेर येते (प्रामुख्याने म्हशींमध्ये हे बघायला मिळते).
आजार विण्याच्या वेळी गर्भार गायीला झाला तर नवजात वासरू व गाय सुदृढ असल्यावर ही गर्भाशयाच्या मंदावलेल्या हालचालींमुळे नैसर्गिकरीत्या प्रसूती होत नाही. जर अशा गायीला कॅल्शिअम सलाइनद्वारे दिले, तर रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण योग्य होते. बाधित गाईंची प्रसूती नैसर्गिकरीत्या होते. दृष्टीस दिसणारे चिन्ह म्हणजे अपचन आणि बद्धकोष्ठता. जनावराला उठविण्याचा प्रयत्न करून ही जनावर उभे राहत नाही.
*(क ) तिसरी अवस्था
जनावरांच्या हृदयाचे ठोके क्षीण होऊन वाढलेले असतात. हृदयाची ध्वनी शक्यतो ऐकायला येत नाहीत. हृदय गती १२० ठोके प्रति मिनीट किंवा त्याहून अधिक वाढते. तिसऱ्या टप्प्यातील गायी उपचारांशिवाय काही तासांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत.
दुसऱ्या टप्प्यामध्ये योग्य उपचार न मिळाल्यामुळे जनावर तिसऱ्या टप्प्यामध्ये जाते जनावर उभे राहण्यास असमर्थ असते. जनावर आडवे पडते. जनावराचे अंग सैल पडते, पापण्यांची हालचाल होत नाही, गुदद्वार बाहेर येते, जनावर बेसावध होते आणि चेतना कमी होते. जनावर अत्यवस्थ होते.
तिसऱ्या टप्प्यात जनावरास तत्काळ योग्य उपचार न मिळाल्यास जनावर दगावू शकते.