दीपकआबांच्या दणक्यानंतर सुस्त प्रशासन ताळ्यावर, उद्याच रस्ता होणार दुरुस्त
कडलास पुलावर राष्ट्रवादीने केले आंदोलन
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत आहे. त्यातीलच एक मुख्य रस्ता असलेला सांगोला-जत मार्गावरील कडलास रस्त्यावरील माणनदीवरील पुलाचे व रस्त्याचे काम रखडल्याने अनेक अपघात होत आहेत तर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नदीपासून ते कडलास गावापर्यतचा रस्ता मौत का कुआ बनलेला आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी कडलास जवळील मान नदीच्या परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा घेत ठोस आश्वासन द्या अन्यथा आम्ही या रस्त्यावरून उठणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर प्रशासन ताळ्यावर आले आणि त्यांनी उद्या म्हणजे बुधवारीच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याचा शब्द दिला.
सांगोला तालुक्यातील रस्त्यांची खूप वाईट अवस्था झाली आहे. जत ते इंदापूर अर्थात जत-सांगोला या राज्य मार्गावर अनेक ठिकाणी कामे रखडली असल्यामुळे तो तो परिसर वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. अगदी जतपासून सांगोल्याकडे येत असताना सिंगनहळी, शेगाव, सोनंद तसेच कडलास जवळील मान नदीचा पूल या ठिकाणी महामार्गाच्या रस्त्याची कामे तशीच सोडून देण्यात आलेली आहेत.
संतापजनक बाब म्हणजे या काही मीटर अंतराच्या खराब रस्त्यामुळे वाहने तसेच वाहनचालकाच्या कंबरेची अक्षरशा वाट लागत आहे. या काही मीटर अंतराच्या खराब रस्त्यामुळे शेकडोजण गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. कडलास सांगोला रस्त्यावरील मान नदीच्या पुलाच्या परिसरातही हा मार्ग बनवायचा तसा सोडून देण्यात आलेला आहे दीड ते दोन फुटाचे खड्डे या मार्गावर आहेत. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हा मार्ग रोखून धरला. प्रारंभी दीपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ते बोलताना म्हणाले की, जत ते इंदापूर हा रस्ता वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. भूसंपादनाच्या अडचणीमुळे काही ठिकाणी प्रशासनाला अडचणी येत आहे हे खरे असले तरी रस्त्यावरील खड्डे बुडवून बुजवण्यासाठी किंवा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी कुणाची आडकाठी नाही हे महामार्ग तसेच महसूल प्रशासनाने नीट लक्षात घ्यावे. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे ही कामे अशीच अर्धवट राहिलेली आहेत याबाबत मी अनेकदा महामार्ग अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांना निवेदन दिले मात्र त्यांचे काम दिरंगाईने सुरू आहे. या रस्त्यांमुळे जर निष्पाप लोकांचा बळी जाणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मला आत्ताच अधिकाऱ्यानी आश्वासन देऊन सांगावे की रस्ता कधी पूर्ण होणार आहे? तर तसे नाही झालं तर मी या रस्त्यावरून माझ्या शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन अजिबात उठणार नाही.
दीपकआबांनी असा आक्रमक पवित्र घेतल्यानंतर त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी महामार्ग प्रशासनाशी बोलून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम उद्याच करण्यात येईल असा शब्द दिला.
यावर बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, रस्त्याचे काम उद्याच्या उद्याच पूर्ण झाले पाहिजे. जर तसे नाही झाले तर मी शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन तुमच्या कार्यालयाच्या समोर बसून आणि तुम्हाला तिथून बाहेर पडू दिले जाणार नाही. माझ्या तालुक्यातील गोरगरीब लोकांना जर अशा रस्त्यांमुळे त्रास होणार असेल वाहनचालकांना मृत्यूला सामोरे जावे लागणार असेल तर हे मी सहन करणार नाही.
यावेळी दीपकआबांनी शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आपला महाराष्ट्र हा महिलांचा सन्मान राखणारा, त्यांना मान देणारा आहे. ही आपली संस्कृती आहे. याची जाणीव मंत्र्यांनी ठेवावी. सुप्रियाताई सुळे सारख्या संसदपटू लोकप्रतिनिधीबद्दल असे गलिच्छ वक्तव्य करणे हे अब्दुल सत्तार यांना शोभत नाही असे दीपकआबा म्हणाले.
पाहा व्हिडिओ
°°°°°°°°°°°°°°
इंदापूर जत या महामार्गावरील सांगोला तालुक्याच्या हद्दीतील सांगोला महुद रस्ता, शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेज ते गायकवाडवस्ती रस्ता आणि सोनंद येथील पुलाचे अर्धवट काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत कडलास ता सांगोला येथील माण नदीच्या पुलावर तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमलाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास हे आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, महादेव गायकवाड, युवकचे अनिल खटकाळे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत कारंडे, महादेव पवार, विजय पवार, बाळासाहेब शिंदे, सुनील साळुंखे, दिलीप नागने, यशवंत खबाले, चंद्रकांत बागल, योगेश खटकाळे, माजी सभापती अनिल मोटे, सूर्याजी खटकाळे, सतीश काशीद, ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी हरीहर, राज मिसाळ, मच्छिंद्र माने, गिरीश गायकवाड, संतोष पाटील, साहिल इनामदार, सुरेश गावडे, अनिल सुतार, जयवंत नागणे, शिवाजी जावीर, पोपट खाटीक, दीपक जाधव, अजित गोडसे, शिवानंद पाटील, भूषण बागल, असलम पटेल, राहुल ढोले, सखुबाई वाघमारे, शोभा खटकाळे, सरस्वती रणदिवे, शशिकला खाडे, शकुंतला खडतरे, सुजाता कांबळे, सरपंच मंगल भुसे, हसीना मुलानी, मनीषा मिसाळ, जयश्री पाटील, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, गेली वर्षभरापासून कडलास, महूद आणि सोनंद परिसरातील नागरिक महामार्ग प्रशासनाकडे वारंवार लेखी आणि तोंडी तक्रार करत आहेत. सांगोला-महुद या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे, कडलास येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज ते गायकवाडवस्ती परिसर आणि सोनंद येथील अर्धवट पुलाचे काम गा परिसर सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.
तरी महामार्ग प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. महामार्गाचे काम अर्धवट असल्याने या परीसरात दररोज अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी वेळोवेळी चालढकल केल्याने प्रशासकीय निष्काळजी पणामुळेच सांगोला तालुक्यातील १५ ते २० जणांचे बळी गेले आहेत. या परिसराचे नेतृत्व करत असताना आणि याच रस्त्यावरून दररोज ये-जा करत असताना आमच्या तालुक्यातील लोक प्रशासकीय हलगर्जीपणामुळे आमच्या डोळ्यासमोर मरत असल्याचे आपण पाहू शकत नाही.
त्यामुळे इथून पुढे आम्ही शांत राहणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही इथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा मा. आम. दिपकआबा, जयमालाताई आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करून दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिले. सोमवार दि सात रोजी मालट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या आदर्श ग्रामसेविका स्वप्नाली सोनलकर यांना सर्व आंदोलनकर्त्यांनी श्रद्धांजली वाहून रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी कडलास येथे झालेल्या अपघातात आदर्श ग्रामसेविका स्वप्नाली सोनलकर यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक रास्ता रोको करून या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक हे आंदोलन केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाच्या निमित्ताने रस्ता तर नीट होईल आणि आपली कायमची गैरसोय दूर होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त करून वाहनधारकांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला.
मंगळवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मान नदीच्या पुलावर रास्ता रोको केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तहसीलदार अभिजीत पाटील व पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांसह महामार्ग प्रशासनाचे दाणे घटनास्थळी उपस्थित राहून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी तात्काळ बैठक आयोजित करून दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी आंदोलनकर्त्यना दिले.
अन्यथा अधिकाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही..!
सांगोला तालुक्यातील या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आजपर्यंत वारंवार संबंधित प्रशासनाला लेखी व तोंडी तक्रार केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने आज आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली. या गंभीर विषयाकडे तात्काळ लक्ष न दिल्यास पुढील काळात तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून एकाही अधिकाऱ्याला बाहेर फिरू देणार नाही असा गर्भित इशाराच यावेळी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.
या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे नेते तानाजीकाका पाटील यांच्यासह तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते, वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी हे आंदोलन स्थगित करीत असल्याचे घोषित केले.