दानिश सिद्दीकी : प्रलयंकारी काळाचा स्नॅपशॉट घेणारा पत्रकार

श्रीरंजन आवटे यांचा मर्मभेदी लेख

Spread the love

 

दानिशचा एक-एक फोटो हजारो शब्दांहून अधिक बोलत जातो. पाषाणाला पाझर फुटेल इतकी त्या फोटोंमध्ये ताकद आहे. त्याच्या फोटोत प्राणांतिक वेदना आहे. व्याकूळता आहे, आर्तता आहे. पाशवी क्रूरतेची भीषणता त्यात आहे. राजसत्ता कोणती आहे, हे पाहून त्याने फोटो ‘क्रॉप’ केले नाहीत !
अफगाणिस्तानमधील युद्धाचे जीवघेणे प्रसंग टिपत असताना दानिश सिद्दीकी या पत्रकाराचा मृत्यू झाला. त्याच्यावर हल्ला करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी ही बातमी ऐकली तेव्हा डॅनियल पर्ल या ज्यू वंशाच्या अमेरिकन पत्रकाराची आठवण आली. तो वाल स्ट्रीट जर्नलचा साउथ एशिया ब्युरो चीफ होता. आतंकवादी टोळीने अपहरण करून त्याचा शिरच्छेद केला. वयाच्या अवघ्या अडोतिसाव्या वर्षी डॅनियलचा प्रवास संपला. ही घटना घडली तेव्हा मी खूप लहान होतो. पण त्याचं नाव इतकं खोलवर रजिस्टर झालं आहे माझ्या मनात की परवा लगेच तो डोळ्यासमोर आला. त्याच्यावर नंतर माहितीपटही आला.

दानिशही ३८ वर्षांचा. अफगाणिस्तानमधील युद्धप्रसंगात तो वाचला असता तरी आज ना उद्या त्याचा कुठेही खून झाला असता कारण तो टकमक टोकावर उभा राहून पत्रकारितेचं कर्तव्य जीवावर उदार होऊन करत होता. काश्मीरमधलं रानटी लॉकडाउन असो की दिल्लीची रक्तरंजित दंगल, सीएए-एनआरसी विरोधी आंदोलनं असोत की शेतकरी मोर्चे हा वेडा पीर आजच्या काळाचा पट आपल्या कॅमेऱ्यात साठवून ठेवत होता. रॉयटर या आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थेचा छायाचित्रकार पत्रकार म्हणून लोक त्याला ओळखतात. पुलित्झर विजेता फोटोजर्नलिस्ट असाही त्याचा आज लौकिक आहे.

परवा त्याला मारलं गेलं तेव्हापासून त्यांच्याविषयी वाचतो आहे. Ted Talk मधलं त्याचं केवळ आठ मिनिटांचं भाषण ऐकून लक्षात आलं की या माणसाच्या आस्थेचा परीघ किती मोठा आहे. कोणत्याही सीमारेषेत त्याला बंदिस्त नाही करता येत. अफगाणिस्तानातील युद्धजन्य परिस्थिती तो कव्हर करतो. अफगाणिस्तानवरचं सोव्हिएत आक्रमण असो की अमेरिकन, त्याविषयी थेट टीका करत तालिबानी प्रवृत्तीला तो थेट आव्हान देतो. नेपाळमधील भूकंपानंतर हा तिथे पोहोचतो. श्रीलंकेतील इस्टर संडेला झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सुखी कुटुंबाचं सुरेख गोजिरं मात्र रिकामं पडलेलं घर त्याच्या कॅमेऱ्यात येतं तेव्हा त्याचा जीव कासावीस होतो. हाँगकाँगमधील निदर्शनं तो कव्हर करत राहतो. म्यानमारमधला रोहिंग्या प्रश्न ऐरणीवर यावा म्हणून तो झटतो.

‌दिल्लीत लिंचिंग होत असलेल्या माणसाचं लाईव्ह चित्रण करताना त्याचंही लिंचिंग होऊ लागतं, त्यातून कसाबसा वाचतो. स्मशानाभोवती तटबंदी घालून कोविडचं वास्तव लपवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला जातो तेव्हा आकाशातून तो अक्षरशः मरणासन्न वास्तव टिपत राहतो. एकाच बेडवर ऑक्सिजन घेणारे दोघं त्याच्या कॅमे-यात येतात तेव्हा अधिक काही बोलण्याची आवश्यकताच भासत नाही.

दानिशचा एक-एक फोटो हजारो शब्दांहून अधिक बोलत जातो. पाषाणाला पाझर फुटेल इतकी त्या फोटोंमध्ये ताकद आहे. त्याच्या फोटोत प्राणांतिक वेदना आहे. व्याकूळता आहे, आर्तता आहे. पाशवी क्रूरतेची भीषणता त्यात आहे. राजसत्ता कोणती आहे, हे पाहून त्याने फोटो ‘क्रॉप’ केले नाहीत !

अखिल मानवतेला साद घालणारा, तिला कवेत घेणारा दानिश अजब रसायन होतं. त्याच्या पत्रकारितेला केवळ मानवी चेहरा नाही, तर मानवी ह्र्दय होतं. सहृदयी पत्रकारिता अस्तंगत होण्याच्या काळात दानिशसारखा माणूस विरळाच.

आजच्या प्रलयंकारी काळाचा स्नॅपशॉट घेणारा माणूस काळाच्या उदरात गाडला जाईल, पण त्याने टिपलेले क्षण जमिनीतून पुन्हा उगवून सांगतील कहाणी इथल्या जुलूमाची आणि त्या विरोधात उमटलेल्या प्रत्येक आवाजाची.

प्रिय दानिश,
तुला आम्ही कसला सलाम करणार !
स्क्वेअर फुटात अडकलेली आमची मध्यमवर्गीय स्वप्नं.
आम्हाला माफ करुन आमची मानवंदना स्वीकार कर बाबा.

– श्रीरंजन आवटे

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका