“थिंक टँक”चा बांधकाम विभागाला दणका
खड्डे बुजवण्यास आज होणार प्रारंभ
“सांगोला खड्ड्यात” या मथळ्याखाली “थिंक टँक” न्युज नेटवर्कने सडेतोड वृत्तमालिका सुरू केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांमुळे तालुक्यातील रस्ते खड्ड्यात गेले होते. रस्ते मातीत घालण्याचे धोरण अवलंबले होते. त्यानंतर या गोष्टीचा पर्दाफाश केल्यानंतर तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची व्यथा मांडली होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने उरली सुरली लाज वाचवण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी निधी आणि पुलावरील कामासाठी ठेकेदारांना कामे दिली.
सांगोला / नाना हालंगडे
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या “थिंक टँक लाईव्ह” या न्यूज पोर्टलने सांगोला बांधकाम विभागाला चांगलाच दणका दिलाय. सलग चार दिवसांपासून प्रसिद्ध होत असलेल्या “सांगोला तालुका खड्ड्यात” या विशेष वृत्तमालिकेने राज्यात खळबळ उडवून दिली होती. आपली पिसे निघताहेत हे ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने जास्त खराब असलेल्या रस्त्याचे पुन्हा नव्याने डांबरीकरण करण्यास सुरुवात केलीय. असे असले तरी डागडुजी हा उपाय नाही. तालुक्याच्या सर्व खराब रस्त्यांचे पोस्टमार्टेम करून कामे मार्गी लागेपर्यंत आमची मोहिम सुरूच असेल.
उपअभियंत्याला अखेर जाग आली
जत-डिकसळ-घेरडी मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मोहीम सुरू झाली असून कालच ठेकेदाराने आपले साहित्य आणून टाकलेही आहे. खरे तर “थिंक टँक” च्या वृत्तमालिकेमुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून रस्त्यावरील खड्ड्याबरोबर आता पुलांचेही मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
“सांगोला खड्ड्यात” या मथळ्याखाली “थिंक टँक” न्युज नेटवर्कने सडेतोड वृत्तमालिका सुरू केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांमुळे तालुक्यातील रस्ते खड्ड्यात गेले होते. रस्ते मातीत घालण्याचे धोरण अवलंबले होते. त्यानंतर या गोष्टीचा पर्दाफाश केल्यानंतर तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची व्यथा मांडली होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने उरली सुरली लाज वाचवण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी निधी आणि पुलावरील कामासाठी ठेकेदारांना कामे दिली.
खड्डे बुजविण्याची तयारी पूर्ण
रविवारी सायंकाळी 7 वाजता जिल्ह्याच्या सरहद्दीवरील डिकसळ घाटाजवळ राऊत नामक ठेकेदाराने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी डांबरीकरणाचे साहित्य आणून टाकले. जिल्हाहद्दीपासून ते पारे गावपर्यंतचे खड्डे बुजविण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. तर याच मार्गावरील तीन पुलावरील कामे दुसऱ्या ठेकेदाराला दिलेली आहेत.
घेरडी- वाणीचिंचाळे रस्त्याचे काय?
आता घेरडीपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजतील पण घेरडी- वाणीचिंचाळे रस्त्याचे काय? त्यानंतर वाणीचिंचाळे ते शिरसी हद्दीपर्यंतचा रस्त्याचे काय? त्यापुढे ही घेरडी ते जवळा आणि जवळा ते कडलास रस्त्याचे काय? याचेही कोडे उलडले नाही.
सारा टक्केवारीचा खेळ
सांगोला तालुक्यात सारा खेळ हा टक्केवारीवर चाललेला आहे. त्यामुळे कामे गुणवत्तापूर्ण होतील हे कोणी सांगू शकत नाही. विरोधी पक्षही हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून गप्प आहे. रस्त्याच्या प्रश्नांसह अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. सर्वच शासकीय कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू आहे. हे सारे कशाचे द्योतक आहे.
घेरडी पुलावर धोका
पारे-घेरडी पुलावरील पुकळे वस्ती येथील पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम एका ठेकेदाराने केले. पण काम करताना या ठेकेदाराला दोन्ही बाजूच्या रस्त्याचा अंदाज आला नाही, आताही पुलावरून गाडी जाताना, उंचीमुळे मोठा हादरा बसत आहे. साईडच्या भिंती बांधल्या पण पुलावरील रस्त्याचे लेवल यांना काढता आली नाही. येथे बांधकाम इंजिनियर झोपले होते का? खरे तर या कामांमध्ये दर्जा नाही. त्यामुळे घेरडी हा पूल खतरनाक बनला आहे.
“थिंक टँक”चे वाचकांना आवाहन
सांगोला तालुक्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. खड्ड्यातून प्रवास करून पाठीचे मणके ढिले पडत आहेत. उखडलेल्या रस्त्यांमुळे दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत. बोलणार कोण? सत्ताधारी असो वा विरोधक, नेते आपल्याच धुंदीत आहेत. ना लाज ,ना शरम. मतांची भीक मागत जनतेचे पाय धरणाऱ्या नेत्यांना जनतेला छळण्यात आनंद वाटत आहे. “थिंक टँक”चे वाचकांना आवाहन आहे. आपण आपल्या भागातील खराब रस्त्यांची माहिती आमच्यापर्यंत फोटो व मजकुरासह पोहोचवा. आम्ही त्याला ठळक प्रसिध्दी देवू. (व्हॉट्सॲप : 7821831606)