थर्टी फर्स्टला “माल” लावण्यासाठी सव्वा दोन लाख लोकांनी घेतला परवाना
पोलीस पाटील गावातल्या पेताड्यांवर ठेवणार वॉच
थिंक टँक / नाना हालंगडे
“जुने जाऊद्या मरणालागूनी.. जाळूनी किंवा पुरून टाका” अशा कवितांच्या ओळी आहेत. अर्थात जुन्या वर्षाला निरोप देवून नव्याचे स्वागत करण्याची एक संधी ३१ डिसेंबरला मिळत असते. या संधीचा कोण कसा लाभ उठवेल हे सांगता येत नाही. आता हेच बघा ना. नव्या वर्षाचे धूमधडाक्यात स्वागत करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सव्वा दोन लाख लोकांनी “माल” लावण्याचा अधिकृत परवाना घेतला आहे. विशेष म्हणजे यंदा पहाटे पाच वाजेपर्यंत घोट रिचविता येणार आहेत. कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. सर्वत्र पोलिसांचा वॉच राहणार आहे. ग्रामीण ग्रामीण भागात ही जबाबदारी पोलीस पाटलांवर देण्यात आली आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागताची तयारी आता सुरु असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून दारू पिण्याचे परवाने देण्यात आले आहेत. त्यामध्ये एक लाख देशी व सव्वालाख विदेशी दारुचे एकदिवसीय परवाने वितरीत झाले आहेत.
हॉटेल, धाब्यावर दारू नाही
हॉटेल, धाबे किंवा अन्य कोठेही विनापरवाना मद्यपान किंवा मद्यविक्री करू नये, नियमांचे उल्लंघन करून नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी ग्रामीण व शहर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण १५ पेक्षा अधिक पथके नेमली आहेत. या पथकाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.
रेस्टॉरंट पहाटे एक ते पाच वाजेपर्यंत सुरु
मागील दोन वर्षे कोरोना महामारीमध्ये गेली. त्यामुळे नववर्षाचे स्वागत फारसे करता आले नाही. घरच्या घरी अनेकांनी पेग मारून तृष्णा शांत केली. आता हे संकट बऱ्यापैकी टळले आहे.
कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात होणार आहे. यानिमित्त हॉटेल, धाबे, रेस्टॉरंटवर ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. “माल लावणाऱ्यांना बाटलीतील प्रत्येक घोटाचा आनंद घेता यावा यासाठी ३१ डिसेंबर रोजी बार व रेस्टॉरंट पहाटे एक ते पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जेथे दारू विक्रीची परवानगी आहे तेथेच हे करता येईल. मात्र, हॉटेल किंवा धाब्यांवर नवीन वर्षाची पार्टी करायची असल्यास २० हजाराचे शुल्क भरून त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसाचे क्लब लायसन्स घेणे बंधनकारक आहे. अशी परवानगी न घेताच हॉटेलात आडोसा धरून “माल” लावताना आढळल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
विनापरवाना पार्टी केल्यास पार्टीतील सहभागी व्यक्तींसह हॉटेल मालकाविरूद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. यानुसार मद्यपान करणाऱ्यांना दोन ते पाच हजारांचा दंड तर हॉटेल मालकास २५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.
उत्पादन शुल्क विभागाचा वॉच
३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर मद्यविक्री होते. मोजकेच जण विदेशी दारू घेतात. बहुसंख्य लोक हे देशीवाद जोपासतात. या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारु निर्मितीचे तांडे, वाहनांमधून अवैधरित्या दारूची वाहतूक यावर उत्पादन शुल्क विभागाचा वॉच असेल.
असे आहेत दर
हॉटेल्सला एक दिवसाच्या पार्टीसाठी २० हजार रुपये तर व्यक्तींनी एक वर्षासाठी १०० रुपये , आजीवन परवान्यासाठी एक हजाराचे शुल्क भरुन परवाना घेता येतो. विनापरवाना तसे प्रकार आढळल्यास १८००२३३ ९९९९ व ८४२२००११३३ या टोल फ्रि क्रमांकावर कोणीही तक्रार करू शकतो, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.
फटाके रात्री १० ते १२ या वेळेतच
फटाके उडवण्यासाठी रात्री १० ते १२ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मद्यपान करून कोणीही वाहन चालवू नये यासाठी तपासणीसाठी ४० ब्रिथ अॅनालायझर मशीन पोलिसांना दिल्या आहेत. सात पोलिस ठाण्याअंतर्गत ठिकठिकाणी नाकाबंदी असेल.
३१ डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत २५ पोलिस ठाण्याअंतर्गत नाकाबंदी राहणार आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या कारवाईवर भर देण्याचे पोलिसांनी नियोजन केले आहे. २५ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांना ३५ ब्रिथ अॅनालायझर मशीन देण्यात आल्या आहेत. मद्यपान करून कोणीही वाहन चालवू नये . नियमांचे पालन करून सर्वांनी नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.
पोलिस पाटील ठेवणार लक्ष
ग्रामीण भागातील सर्व घटना घडामोडींवर गावागावांतील पोलीस पाटील लक्ष ठेवणार आहेत. पोलिस पाटलांनी त्यांच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवावे. सतत पोलिसांच्या संपर्कात राहावे विनापरवाना मद्यविक्री , कुठे भांडण – तंटे झाल्यास व अवैध दारू वाहतूक होत असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी , अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरी भागात सेलिब्रेशन पार्ट्या
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी शहरी भागात दरवर्षी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये येथेच्छ मद्यप्राशन आणि डान्सचा समावेश असतो. यंदाही अशा सेलिब्रेशन पार्ट्यांचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आल्याचे पोस्टर वरून दिसून येत आहे. त्यामुळे यंदा तरुणाईचा झिंग आणखीन चढणार आहे, हे दिसून येते.
मटण, चिकनला वाढणार मागणी
जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री अनेकांच्या घरी मटण, चिकन शिजत असते. त्यामुळे या दिवशी मटण, चिकनला मोठी मागणी असते. हे ध्यानात घेऊन मटण, चिकन विकणाऱ्या दुकानदारांनी अधिकचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा