“तेव्हा शरद पवार कुठं होते?” : शहाजीबापूंची पुन्हा सडकून टीका
दीपकआबांना दिलेला शब्द बापू विसरले
सांगोला/नाना हालंगडे
एकनाथ शिंदे गटाचे आमदार, ‘काय झाडी काय डोंगार… काय हाटील..’ फेम नेते शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “माझ्या पडत्या काळात शरद पवार, अजित पवार कुठं होते”, असा सवाल करत त्यांनी पुन्हा टीका केली आहे. विशेष म्हणजे सांगोल्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी शहाजीबापूंना पुन्हा शरद पवारांवर टीका करू नका, असे सुनावले असताना ते त्यांनी मान्यही केले होते. मात्र या घटनेला महिना होत नाही तोवर शहाजीबापूंनी पुन्हा पवार कुटुंबियांवर कडाडून टीका केली आहे.
दिवाळीनिमित्त शहाजीबापू पाटील हे आपल्या मतदारसंघात महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करत असतात. सांगोला तालुक्यातील कटफळ येथे साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.
आ.शहाजीबापू पाटील यांचा गुवाहाटीला असताना त्यांनी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांना केलेला एक कॉल व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, मला माझ्या बायकोला साधी एक साडी घेणं देखील शक्य झालं नाही. या कॉलनंतर राष्ट्रवादीच्यावतीने शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीला एक साडी भेट पाठवण्यात आली होती. यावर देखील शहाजीबापू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी ती साडी घेतली नाही, कारण माझी जेव्हा हलाकीची परिस्थिती होती तेव्हा शरद पवार कुठे होते असा सवाल शहाजीबापू यांनी केला आहे.
या कार्यक्रमात बोलताना शहाजीबापू म्हणाले की, लोकांच्या प्रश्नांसाठी मी माझी मालमत्ता विकली. मी जनतेचे प्रश्न सोडवले. 1999 ला माझा पराभव झाला. या पराभवानंतर इथे जमलेली माझ्या मतदारसंघातील जनताच तुम्हाला सांगेल, माझ्या बायकोला साधी नवी साडी देखील मिळत नव्हती. 19 वर्ष सातत्याने घरात गरीबी होती. परंतु मी जनतेचे प्रश्न सोडवण्यात कुठेही कमी पडलो नाही.
या राजकारणाच्या चढाओढीत माझी संपत्ती मला विकावी लागली त्याचही मला दुःख वाटत नाही. कारण जनतेची सेवा हीच भगवंताची सेवा असं मी आजवर मानत आलो आहे. मात्र माझ्या गरिबीच्या काळात मी पक्षाचा कार्यकर्ता असूनही शरद पवार आणि अजित पवार हे माझ्यासोबत नव्हते याचं शल्य मला आयुष्यभर बोचत राहिलं असं आ. पाटील यांनी म्हटलं आहे.
पुन्हा पुन्हा पलटी
आमदार शहाजीबापू पाटील ‘काय झाडी काय डोंगार… काय हाटील..’ या लोकप्रिय डायलॉगमुळे राज्यभरात चर्चेत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र त्यांच्या भाषणांना मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जेथे सभा असतात तेथे शहाजी पाटील यांचे आवर्जून भाषण असते.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी अलीकडे केलेल्या काही विधानावरून ते आपल्या भूमिकांवर ठाम राहत नसल्याचे दिसून येते. माझ्या ऐवजी साखर सम्राट अभिजित पाटील यांना सांगोला मतदार संघातून उमेदवारी देवून त्यांना आमदार करावे. मला विधानसभेवर पाठवावे अशी जाहीर भूमिका त्यांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत मांडली होती. त्यानंतर त्यांच्या भूमिकेवर मोठे वादंग माजले.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला मतदार संघातून पळ काढला अशी टीका त्यांच्यावर झाली. मात्र दोनच दिवसांत त्यांनी आपण सांगोला मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. ज्या ज्याच्यात हिम्मत असेल त्यांनी तयारीला लागावे. मीच निवडून येईन, असा आशावाद व्यक्त केला होता.
महिना होतो न होतो तोच शहाजीबापूंनी पुन्हा पवार कुटुंबियांवर कडाडून टीका केली आहे. बापू पलटी का मारतात? की ते आपल्याला झालेल्या त्रासाचा सूड उगवत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी “शहाजीबापू तुम्ही कोणावरही टीका करा. फक्त पवार कुटुंबावर टीका करू नका. हे तुम्हाला ठणकावून सांगतो” अशा शब्दांत सुनावले होते.
मात्र महिना होतो न होतो तोच शहाजीबापूंनी पुन्हा पवार कुटुंबियांवर कडाडून टीका केली आहे. बापू पलटी का मारतात? की ते आपल्याला झालेल्या त्रासाचा सूड उगवत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
‘मपोसे’ ते आयपीएस अधिकारी : नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास
हेही पाहा
पाहा खास व्हिडिओ