डिकसळमधील साळुंखे कुटुंबीयांना “आपुलकी”ची भेट
थिंक टँक न्यूज पोर्टलने मांडली होती व्यथा
- डिकसळमधील साळुंखे कुटुंबीयांना “आपुलकी”ची भेट
- दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिली मदत
- थिंक टँक न्यूज पोर्टलने मांडली होती व्यथा
- 12 हजार रुपयाचे किराणा साहित्य भेट
सांगोला / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील सुखदेव साळुंखे (जवळेकर) यांचे निधन झाल्यानंतर आधार संपलेल्या दिव्यांग बहीण-भावंडांना दिव्यांग दिनाचे औचित्य साधून आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने किराणा साहित्य देऊन मदत करण्यात आली. याबाबतची कैफियत थिंक टँक न्यूज पोर्टलने मांडली होती. मदतीचे आवाहन केले होते.
डिकसळ येथील सुखदेव जवळेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर त्यांची दिव्यांग मुलगी कमल आणि मुलगा सुभाष दोघेही असहाय्य झाले. या बहिण भावंडांचा मुख्य आधार निसर्गाने हिरावून घेतल्याने त्यांचा पश्चात असलेली ही 45 ते 50 वयाची दोन्ही अपत्ये पोरकी, निराधार, बेसहारा झाली. त्यानंतर हे दोघेजण आपली बहीण सुमन यादव यांच्याकडे राहावयास गेली होती.
दिव्यांग असल्याने या दोन्ही मुलांना श्रमाची कामे होत नसल्याने परिणामी ते आपल्या वडिलांवर अवलंबून होते. आता त्यांचे वडील वारल्याने या दोन्ही अविवाहित पाल्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली होती.
घरात अठराविश्वे दारिद्र्य, ४५ हून अधिक वयाची दोन्ही अविवाहित दिव्यांग लेकरे. अशातच या दोन्ही लेकरांचे पालनकर्ते पिता ८५ वर्षीय सुखदेव साळुंखे (जवळेकर) हे संपूर्ण कुटुंबीयांची जबाबदारी रडतखडत सांभाळत होते. मात्र, आजारपणात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. या असहाय, दिव्यांग कुटुंबाला आधार देण्याची खूप गरज होती. त्यांची ही गरज ओळखून आपुलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहा महिने किराणा माल देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर 2021 रोजी आपुलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या दिव्यांग लेकरांचा सांभाळ करणाऱ्या शिरशी ता.मंगळवेढा येथे कमल साळुंखे यांच्या बहीण सुमन ईश्वर यादव यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे हा किराणा माल पोहोच केला.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, उपाध्यक्ष दीपक चोथे, सुभाष लऊळकर, अरुण जगताप, अरविंद डोंबे, डॉ.मच्छिन्द्र सोनलकर, इंजि.विकास देशपांडे, डॉ.नाना हालंगडे, जितेंद्र बोत्रे, उमेश चांडोले, काशिलिंग सरगर, महादेव दिवटे, संतोष करांडे, बंडू वाघमोडे, राजू मोटे प्रकाश मेटकरी आदी उपस्थित होते.