डिकसळमधील भाईंच्या देवराईची समाजकंटकांकडून मोडतोड
तालुक्यात तीव्र पडसाद, नामफलक व वनपरिक्षेत्राचे बॅनर फाडले
पर्यावरण रक्षणाचे चांगले काम उभा राहत असताना काही समाजकंटकांकडून मुद्दामहून असे कृत्य वारंवार केले जात आहे. याबाबत या प्रकल्पाचे प्रमुख पत्रकार नाना हालंगडे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. सतत हल्ला करून मोडतोड करणाऱ्या अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, या भागात पोलिसांची गस्त सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
सांगोला : विशेष प्रतिनिधी
पर्यावरणाची चळवळ गतिमान करण्यासाठी भाई कै. गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ डिकसळ (ता. सांगोला) येथे उभारण्यात आलेल्या “भाईंची देवराई” या प्रकल्पस्थळी अज्ञात समाजकंटकांनी मोडतोड केली आहे. नामफलक व वनपरिक्षेत्राचे बॅनर फाडण्यात आले आहेत. या घटनेचे सांगोला तालुक्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी दोन वेळा अशा घटना येथे घडल्या आहेत. बुधवारी सायंकाळी पुन्हा अशीच घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
देवराईत बॅनर फाडण्याची तिसरी वेळ
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे भाई स्व. आम. गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ 10 ऑगस्ट 2021 रोजी भव्यदिव्य देवराई साकारण्यात आली. तालुक्यातील सर्वच स्तरातील समाजबांधवांनी मदतीचा हात देत ही देवराई साकारलेली आहे. हा प्रकल्प कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. केवळ आणि केवळ वृक्ष संवर्धन करण्यासाठी हा प्रकल्प उभारला आहे. सांगोला तालुक्याचे दीर्घकाळ नेतृत्व करणारे, सर्वाधिक वेळा सलग निवडून येणारे आमदार म्हणून भाई गणपतराव देशमुख यांचे नाव या प्रकल्पास देण्यात आले.
या प्रकल्पास भाई गणपतराव देशमुख यांना मानणाऱ्या, पर्यावरण चळवळ गतिमान व्हावी असा हेतू असलेल्या सर्वच स्तरातील पक्षविरहित लोकांनी याला मदत केली आहे. असे असताना काही विघनसंतोषी लोकांनी मुद्दामहून त्रास देण्याच्या हेतूने सलग तीन वेळा हे कृत्य केले आहे.
बुधवारी अज्ञात समाजकंटकांनी देवराईच्या प्रवेश द्वारातील मुख्य बोर्डवरील बॅनर फाडून नासधूस केली आहे. या प्रकल्पात वन परिक्षेत्र विभागाने पर्यावरण प्रबोधनात्मक बोर्ड लावले होते. तेही अज्ञात समाजकंटकांनी फाडले.
देवराईचे राज्यात नाव
भाईची देवराई हा प्रकल्प संपूर्ण राज्यभर नावारूपास आलेला असून राज्यभरातून अनेक मंडळी याची पाहणी करण्यासाठी येथे आहेत. या प्रकल्पात हजारो विविध प्रकारची, दुर्मिळ, औषधी झाडे लावून जतन केली जात आहेत. पत्रकार नाना हालंगडे यांनी स्वतःची दोन एकर जमीन या प्रकल्पास देवून ते स्वतः जातीने यात लक्ष घालून देवराई साकारत आहेत. रोपण केलेली झाडे मोठी होत आहेत. अनेक संकटांवर मात करून या देवराई प्रकल्प आकारास आला आहे. हा प्रकल्प राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.
यातून चांगले काम उभा राहत असताना काही समाजकंटकांकडून मुद्दामहून असे कृत्य वारंवार केले जात आहे. याबाबत या प्रकल्पाचे प्रमुख पत्रकार नाना हालंगडे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. सतत हल्ला करून मोडतोड करणाऱ्या अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, या भागात पोलिसांची गस्त सुरू करावी अशी मागणी केली आहे.
ही घटना घडल्याचे समजताच सोशल मीडियावर पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला.
याशिवाय राजू कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, गणेश पाटील, डॉ. संतोष शेंबडे, पत्रकार सचिन धांडोरे, श्रीपाद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते सचिन गेजगे, डॉ. बिरा बंडगर, पत्रकार अशोक बनसोडे, चिदानंद स्वामी, दीपक भाकरे, संदीप कारंडे, पत्रकार अमेय मस्के, प्रा. राजकुमार गावडे, बाबर मॅडम, काकासाहेब कारंडे, काशिलिंग सरगर आदींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा व त्यांना फूस लावणाऱ्या विकृत सूत्रधारांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.