झालं इलेक्शन.. आता जपा रिलेशन
सांगोला तालुक्यात ८३ टक्के मतदान; ५ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका संपन्न झाल्या. यात सांगोला तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींचा समावेश होता. पण एक ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने,पाच गावाच्या निवडणुका आज संपन्न झाल्या. यामध्ये ८२.६३ टक्के इतके मतदान झाले. काहींचा दणदणीत विजय होईल काहींचा दारुण पराभव होईल तर कोणी काटावर निवडून येईल तर कोणी थोडक्यात अपयशी ठरेल. काहींनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली यात काही यशस्वी होतील तर काही अपयशी. गावकीचं राजकारण फार बेकार असते.
सोलापूर जिल्ह्यात एकूण १६९ ग्रामपंचायतीसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली.
मतदानाची टक्केवारी
सत्तेचा सारीपाट हा गेली एक महिन्यापासून आपण आप आपल्या गावात अनुभवला, निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवणे, आलेल्या सणाचा ही उपयोग करून घेणे,प्रचार प्रभावी कसा होईल यासाठी वाटेल ते करणे यामुळे नकळत आपलेच आपल्या विरोधात गेले, कोण हा वार्डात तर कोण विरोधी वार्डात घरातली, रक्ताची नाती प्रतिस्पर्धी बनली, एकमेकांचे उणेंदुणे काढून आपण याच्यापेक्षा कसा प्रभावी उमेदवार आहे हे पटवून देण्यात आले.
उमेदवारांनी दिवसाची रात्र केली, ढाबे, पाय रंगल्या, विकासकामांचे जाहिरनामे, विकासाची वचनपूर्ती, वेगवेगळ्या चालीवरती बसवलेली टेक्नॉलॉजी च पुरेपूर फायदा घेत प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी पराकाष्ठा केली आहे.
गुलाल कुणाचाही असो सर्व माणसं आपल्याच गावातील आहेत, आपलीच आहेत, कोणताही विजय किंवा पराजय हा अंतिम नसतो, शांत रहा संयमी रहा, मागील 15 दिवसात ज्या लोकांना हात जोडत होता त्यांना त्रास होईल असे न वागता, गावच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण पिढीच्या भवितव्यासाठी राग, विरोध, द्वेष विसरून एक होणे गरजेचे आहे, आपल्या कर्तृत्वाने प्रभुत्व निर्माण होईल नि नेतृत्वाची धुरा नक्कीच तुमच्या हातात येईल म्हणूनच झालं इलेक्शन आता जपा रिलेशन हे ध्यानात ठेवून सर्वांगीण विकासासाठी भविष्यात एकत्र येण्याची गरज आहे. आणि ती प्रत्येक गावात जपली पाहिजे.