जवळ्यात पिता-पुत्राची ऑनलाईन फसवणूक
८९ हजाराला गंडा; तोतया इसमाकडून पुन्हा धमकी
सांगोला/ एच. नाना
फेसबुकवरील व्हिडिओ पाहताना १ हजार ८६९ रुपयाचे बक्षीस लागल्याचा आनंदाच्या भरात मुलाने मेसेज ओपन करुन स्क्रॅच करताच तोतया इसमाने त्याच्या वडिलांच्या बँक खात्यावरून एकाच वेळी १ हजार ८६९ रुपयांसह सुमारे ८८ हजार ०२६ रुपये असे एकूण ८९ हजार ८९५ रुपये ट्रान्सफर करून पिता-पुत्राची फसवणूक केली.
हा प्रकार २४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास जवळा (ता.सांगोला) येथे घडला. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता त्या तोतया इसमाने पोलिसात तक्रार दिली म्हणून मुलास फोन करुन बँकेतील खात्यावरील सर्व पैसे काढून घेऊ अशी धमकी त्यांना दिल्याने पिता-पुत्र चांगलेच घाबरले आहेत.
जवळा येथील संभाजी नारायण आगलावे हे २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घरी असताना त्यांचा मुलगा रोहन फेसबुक वरून व्हिडिओ पाहत होता. त्यावेळी त्याला बक्षीस जिंकल्याचा मेसेज आल्याने त्याने तो ओपन करुन स्क्रॅच केला असता तुम्ही १ हजार ८६९ रुपये जिंकले आहेत, असा मेसेज आला. त्यावेळी मुलाने समोरून आलेल्या लिंकवर क्लिंक केले असता वडिलांच्या बँक खात्यातून १ हजार ८६९ रुपये ट्रान्सफर झाल्याचा पुन्हा मेसेज आला.
मुलाने गुगल वरून इंडस लँड बँकेचे कस्टमर केअरशी संपर्क साधला असता त्यांनी ‘तुम्ही बँकेत येऊन भेटा’ असे सांगितले. दरम्यान मुलाने परत गुगलवरून सदर बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर प्राप्त करून त्यावर कॉल केला असता नंबर बंद लागत होता.
त्यानंतर दोनच मिनिटाच्या अंतराने त्यांच्या मोबाईलवर कॉल करणाऱ्या इसमाने हिंदीतून तुम्हाला तुमचे पैसे परत पाहिजे असतील तर आम्ही सांगतो ते नंबर दाबा असे म्हणाल्याने मुलाने ते सांगतील त्याप्रमाणे मोबाईलमधील बटन दाबत गेला. तसे वडिलांच्या अकाउंटवरील ४४ हजार ०१३ असे याप्रमाणे दोनवेळा ८८ हजार ०२६ सह १ हजार ८६९ असे एकूण ८९ हजार ८९५ रुपये फोनमधून खात्यातून ट्रान्सफर झाले. अज्ञात इसमाने फसवणूक करून वडिलांच्या खात्यातून पैसे काढून घेतल्याने घडला प्रकार त्यांने वडिलांना सांगितला. मात्र रविवारी बँक बंद असल्याने त्यांनी सोमवारी सांगोला येथील सदर बँकेत जाऊन चौकशी करून खातरजमा केली.
संभाजी नारायण आगलावे यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर त्या तोतया इसमाने पुन्हा त्यांच्या मोबाईल नंबरवर फोन करून तुम्ही पोलिसात तक्रार केली तर तुमच्या खात्यात वरील सर्व पैसे काढून घेतले जातील अशी धमकी दिली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.