जवळ्यातील दलित, मुस्लिमांच्या रस्त्यापेक्षा श्रेयवाद, इगो मोठा आहे का?
कसले हे राजकारण, कसली ही मानसिकता?
कसली ही मानसिकता? कसले हे राजकारण? गल्लीतल्या “महामार्गाला” भले तुमचे नाव द्या, तुम्हीच श्रेय घ्या, पण आमचा अडविलेला रस्ता मोकळा करा, अशी विनवणी येथील दलित, मुस्लिम बांधव करीत आहेत.
जवळा : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील जवळा येथील दलित, मुस्लिम रस्त्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित ठेवण्यात आलाय. त्याचे कारण चीड आणणारे आहे. लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला, प्रसार माध्यमांनी वाचा फोडली, अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. अशा स्थितीत लोकांना रस्ता दिला तर त्याचे श्रेय आंदोलक रहिवाशी व अधिकाऱ्यांना जाईल असे ग्रामपंचायतीला वाटतेय. कसली ही मानसिकता? कसले हे राजकारण? गल्लीतल्या “महामार्गाला” भले तुमचे नाव द्या, तुम्हीच श्रेय घ्या, पण आमचा अडविलेला रस्ता मोकळा करा, अशी विनवणी येथील दलित, मुस्लिम बांधव करीत आहेत.
सांगोला तालुक्यातील जवळा हे गाव विकासाबाबत “रोल मॉडेल” ठरत आहे. गावाची चारी बाजूंनी “भरभराट” होत आहे. कोणताही प्रश्न उरलेला नाही. समृध्दी, संपन्नता, ऐश्वर्य येथे लोळण घेत आहे. अशा स्थितीत दलित, मुस्लिम वस्तीच्या रस्त्याचा फालतू प्रश्न प्रसार माध्यमांनी चव्हाट्यावर आणला आणि तिथेच खरी चूक झाली. कारण गावाची इमेज, प्रतिष्ठा खराब झाली. दलित, मुस्लिमांनी उकिरड्यातच राहायला हवे. कशाला रस्ता मागतात? भले या गल्लीत संडासचे पाणी, सांडपाणी रस्त्यावर येते. येवू द्या. सहन करा. आठ महिन्यात या भागात डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनियाचे नऊ रुग्ण आढळले. मग काय झालं? तुम्ही मेलात तर मरा. तुमची तिरडी नेण्यासाठी स्मशानभूमीकडे १० लाखांचा सिमेंटचा रस्ता बांधलाय. तुमचा शेवट तर चांगला होईल ना? एवढी साधी गोष्ट या भागातील लोकांना न कळल्याने हा प्रश्न विचारून त्यांनी चूक केली आणि इगो दुखावला. तो दुरुस्त करण्यासाठी आता आणखी कोणती चूक करावी? असा प्रश्न येथील लोकांना पडलाय.
प्रश्न कायमचा सुटावा!
या भागातील रहिवाशी ज्या लाकूड वखारीतून रस्ता मागत आहेत तेथून पूर्वी वहिवाट होती. मागील दहा वर्षात हा रस्ता बंद झाला. उगीच वाद नको म्हणून लोकांनी जवळच्या मोकळ्या जागेतून ये जा सुरू केली. ज्याच्या जागेतून ही ये जा सुरू केली त्याचे खरे तर उपकार आहेत. कारण काहीही संबंध नसताना त्याने एवढे दिवस त्याची घरजागा वापरू दिली. आता त्याने त्याचे घर बांधायला काढले असल्याने तेथे तारेचे कुंपण बांधले. त्याचे चुकले कुठे? पूर्वेकडून येणारा वहिवाटीचा रस्ता पश्चिमेकडील मुख्य रस्त्याला मिळला तरच हा प्रश्न कायमचा सुटतो हे ढळढळीत सत्य आहे. हे सर्वांना माहीत आहे. मात्र सर्वजण मुद्दाम झोपेचे सोंग घेवून येथील रहिवाशांना गंडवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठला तरी सहा फुटाचा दोन घराच्या मधील रस्ता देवून हा प्रश्न दडपून टाकण्यासाठी आटापिटा सुरू आहे.
रस्ता जणू “नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग”
रस्ता अडवून त्यांची नाकाबंदी करण्यात आली. खरं तर हा रस्त्याचा प्रश्न किरकोळ आणि फालतू आहे. मात्र हा रस्ता जणू “नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग” असल्याचा आव आणला आहे.
प्रश्न मोठा, उत्तर फार सोपे
जवळा ग्रामपंचायतीने दलित, मुस्लिमांच्या जीवाशी खेळणे थांबवून हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत. हा रस्ता मोकळा करताना लाकूड वखार मालकाची जागा त्यात जात असल्याने त्याला जमिनीचा मोबदला द्यावा. फारतर १४ बाय ८० फुटाची जागा या रस्त्यासाठी लागू शकते. त्याचे मूल्य ग्रामपंचायतीने अदा करावे. ते ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे.
प्रश्न महत्त्वाचा, राजकारणाचा विषय नाही
या भागातील रहिवाशी ग्रामपंचायतीत सत्ता असलेल्या पक्षाला आजतागायत सतत मतदान करत आले आहेत. त्यामुळे येथील कोणी कोणत्या विरोधी राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून न्याय मागत आहेत असा आळ घेणे चांगले नाही. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. कोणी कोणताही निर्णय घेण्यास सक्षम आहे. मात्र तसे काहीच नसताना “घरातल्या माणसावर” असा विनाकारण आळ घेऊन त्याच्या अफेअरची चर्चा घडवणे याला काय म्हणावे?
अजूनही वेळ आहे!
मूळात याकडे प्रश्न म्हणून पहावे. एवढी चर्चा, गावाची नकारात्मक इमेज होण्याची वेळच का आली? अजूनही हा प्रश्न येथील रहिवासी शांततेत मांडत आहेत. हा प्रश्न इतर राजकीय पक्ष, संघटनाकडे गेला नाही. तो जाण्यास फारसा वेळही लागणार नाही. मात्र केवळ आणि केवळ गावाची शांतता, इमेज, प्रतिष्ठा जपण्यासाठी येथील लोक शांत, संयमीपणे न्याय मागत आहेत. दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लावा. तुम्ही न्याय देतच नसाल तर सर्व पर्याय खुले असतील, असे येथील एकूण परिस्थितीवरून दिसते.