जवळ्याचे आदम टेलर गेले
दोन पिढ्यांनी गावाला दिली टेलरिंगची सेवा
जवळा : थिंक टँक न्यूज नेटवर्क
जवळा गावात टेलरिंग व्यवसायात नाव कमावलेले मनमिळावू आणि निगर्वी व्यक्तिमत्त्व असलेले आदम टेलर (आदमभाई खलिफा) यांचे रविवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६४ वर्षे होते. त्यांच्या निधनाने जवळा गावावर शोककळा पसरली आहे. आदमभाई यांचे सुपुत्र नवाजभाई खलिफा हे जवळा गावाचे उपसरपंच आहेत.
दोन पिढ्यांनी दिली टेलरिंग सेवा
आदमभाई खलिफा यांचे वडील बाबालाल खलिफा यांनी जवळा गावात टेलरिंग व्यवसायाला ५० वर्षांपूर्वी सुरुवात केली. गावातील चौकातच देशमुख यांच्या मालकीच्या दुकानात त्यांनी आपला व्यवसाय केला. बाबालाल यांनी आपल्या मुलांनाही टेलरिंग व्यवसायात आणले. त्यांची तिनही मुले टेलरिंग व्यवसायात रुजू झाली. आदमभाई व इलाइलभाई यांनी दीर्घकाळ टेलरिंग व्यवसाय केला. आदमभाई खलिफा यांचे भाऊ अल्लाउद्दीन हेसुध्दा टेलर होते. काही काळानंतर त्यांनी शेती व्यवसाय पत्करला. आदमभाई व इलाइभाई यांनी दीर्घकाळ टेलरिंग व्यवसाय केला.
नव्या व्यवसायाचे आव्हान पेलले
जवळा गावातील बहुसंख्य खलिफा बांधव हे केशकर्तनाचा व्यवसाय करतात. बाबालाल खलिफा यांनी मात्र हा व्यवसाय न करता टेलरिंग व्यवसायास सुरुवात केली. हे खरे तर त्यांच्यासाठी आव्हान होते. बाबालाल खलिफा यांच्या हातून सुबकपणे तयार झालेले कपडे शेकडो लोकांच्या पसंदिस उतरले होते. बाबालाल खलिफा यांचा या व्यवसायाचा वारसा त्यांचे सुपुत्र आदमभाई यांनी पुढे चालविला. आदमभाई यांच्या कपडे शिलाईचा मोठा चाहता वर्ग होता. त्यांच्याकडे कपडे शिवून घेण्यासाठी वेटींग असायचे. सध्या रेडिमेडच्या जमान्यातही आदमभाई यांच्याकडे कपडे शिवून घेण्यासाठी गर्दी असायची.
आदम टेलर यांच्या निधनामुळे जवळा गावावर शोककळा पसरली आहे.