जवळा येथील नसरीबेगम नदाफ यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
जवळा : सांगोला तालुक्यातील बुरुंगेवाडी (जवळा) येथील शिक्षिका नसरीबेगम नदाफ यांना मा. दीपकआबा साळुंखे-पाटील शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सांगोला यांच्यावतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या रविवारी करण्यात येणार आहे.
नसरीबेगम नदाफ या सांगोला तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा बुरुंगेवाडी (जवळा) येथे कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षिका या नात्याने विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करून अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. त्यांनी देशमुख वस्ती, अंबिका वस्ती, बंडगर वस्ती या ठिकाणी उल्लेखनीय शैक्षणिक सेवा बजावली आहे.
त्यांनी 27 वर्षे जवळा व परिसरातील शाळांमध्ये अखंडित ज्ञानदानाचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मा. दीपकआबा साळुंखे-पाटील शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पात्र नुकतेच देण्यात आले आहे.
नसरीबेगम नदाफ यांना यापूर्वी कै. महादेव आबा लवटे फाउंडेशन, निजामपूर यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दीपकआबा साळुंखे-पाटील शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्या वतीने पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे जवळा, बुरुंगेवाडी येथे अभिनंदन करण्यात आले.