जवळा ते म्हसोबा देवस्थान रस्त्याची दाणादाण
खड्यातूनच रस्ता शोधत करावा लागतो प्रवास
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
संपूर्ण सांगोला तालुक्यात रस्त्यांची दाणादाण उडालेली आहे. त्याला जवळा ते म्हसोबा- लोहगाव रस्ताही अपवाद नाही. मागील ४ वर्षापासून या रस्त्याचे रडगाणे सुरू असून कोणीही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने प्रवाशी वर्गाना तसेच येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
तालुक्यात जवळा हे गाव राजकीय पटलावरील आहे. गावात मात्तब्बर नेते पण सगळेच विकासहिन. त्यांना जनतेचे काहीही देणेघेणे पडलेले नाही. सांगोल्यातून जवळ्याला यायचे म्हंटले तर धड रस्ता नाही. जवळा येथून घेरडीला जाण्याचीही अवस्था ही न पाहावनारी अशीच आहे. यासह अन्य रस्ते ही खड्ड्यातच, पण लोकप्रतिनिधींना याचे काहीही देणेघेणे नाही.
काही दिवसापूर्वी लोकप्रतिनिधींनी तालुक्यात रस्ते उदघाटनाचा जंगी कार्यक्रम घेतला. पण प्रत्यक्ष कामाचा कुठेच शुभारंभ नाही.
जवळा ते लोहगाव रस्त्याची अवस्था तर न पाहवनारी अशीच आहे. या ८ किलोमिटरच्या मार्गात खड्डेच खड्डे पहावयास मिळत आहेत. याच मार्गावर प्रसिद्ध असे म्हसोबा देवस्थान आहे. तर ८ किलोमिटर पैकी ६ किलोमिटरचा रस्ता सांगोला तालुक्यात येतो, पण कोणी ही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने हा रस्ता अडगळीत पडलेला आहे.
रस्त्याच्या कडेला काटेरी झाडांनी साम्राज्य केले आहे. जिल्ह्याच्या सरहद्दीवरील या रस्त्याकडे बांधकाम विभागही लक्ष देइना. या संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. १ ते दिडफुटाचे रस्त्यावरील खड्डे मृत्यूस आमंत्रण देत आहेत. दररोजच्या प्रवाश्यांना, वाहन धारकांना तारेवरची कसरत करूनच प्रवास करावा लागत आहे.