सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव अशी ओळख असलेल्या जवळा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सविता दत्तात्रय बर्वे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा संभाजी घुले यांची बिनविरोध निवड झाली. मंगळवार दि. २२ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय जवळा येथे ही निवड करण्यात आली. जवळा ग्रामपंचायतीवर पूर्वी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व त्यानंतर सध्या त्यांचे चिरंजीव माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाचे सलग ५० हून अधिक काळ वर्षांचे वर्चस्व या नूतन सरपंच निवडीच्या निमित्ताने अबाधित राहिले आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या जवळा ग्रामपंचायतीवर असणारे आपले वर्चस्व कायम ठेवले होते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंच पदावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी धनगर समाजातील महिला असणाऱ्या सौ सविता दत्तात्रय बर्वे यांना सरपंच पदावर काम करण्याची मोठ्या मनाने संधी दिली होती. सौ सविता बर्वे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदाची मंगळवारी निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच पदासाठी सौ. सुषमा संभाजी घुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदाची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मंडलअधिकारी सी बी जाधव यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे बिनविरोध सरपंच ही या गावाची परंपरा यानिमित्ताने कायम राहिली. अठरापगड जातींचे व विविध समाजाचे लोक राहत असलेल्या जवळा गावातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची नेहमीच स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांची भूमिका होती पुढे हीच सामाजिक समतेची आणि सलोख्याची परंपरा माजी आमदार दिपकआबांनी कायम ठेवली आहे.
सर्वसाधारण जागेवर आधी एका धनगर समाजातील महिलेला गावचा प्रमुख होण्याची संधी दिली त्यानंतरही एका महिलेलाच दिपकआबांनी सरपंचपदाचा बहुमान दिल्याने जवळा ग्रामस्थांनी त्यांच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते अरुणभाऊ घुले सरकार, विजयकुमार देशमुख, बाबा इमडे, प्रवीण पाटील, अनिल साळुंखे पाटील, सुनीलआबा साळुंखे पाटील, चंद्रकांत देशमुख गुरुजी, रमेश आप्पा साळुंखे पाटील, अशोक आप्पा भोसले, दत्तात्रय बर्वे, प्रमोद साळुंखे पाटील, वैभव देशमुख, पोलीस पाटील अतुल गयाळी, माजी सरपंच सविता बर्वे, उपसरपंच नवाज खलिफा यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
सलग ५० हून अधिक वर्ष जवळा ग्रामपंचायतीवर दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाचा झेंडा फडकला आहे सरपंच पदी सौ सुषमा संभाजी घुले यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच जवळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे भरवून मुक्तहस्ते गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.
स्व. काकासाहेबांचे विचार आणि स्व. काकींचा संस्कार अबाधित ठेवा..!
तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे गाव अशी ओळख असलेल्या जवळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ सुषमा घुले यांची निवड होताच नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची वाड्यात जाऊन भेट घेतली. यावेळी नूतन सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि स्व. शारदादेवी साळुंखे पाटील तथा काकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. जवळा हे गाव विकासाच्या आणि सर्वच बाबतीत तालुक्यात आघाडीवर आहे.
गावात असणारी राजकीय आणि सामाजिक सलोखा कायम ठेवावा. तसेच स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांचा सर्वांना सोबत घेऊन जाणारा विकासाचा विचार व स्व. शारदादेवी साळुंखे पाटील तथा काकीचा आपलेपणाचा संस्कार नूतन सरपंच व सर्वच सदस्यांनी अबाधित राखावा असा कानमंत्र देत नूतन सरपंच सौ सुषमा घुले यांचा दिपकआबांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.