चिमुकलीचे गीत ऐकून बाबासाहेब झाले होते मंत्रमुग्ध
भीमाबाई सिद्धगणेश यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्पेशल स्टोरी
सोलापूर (मिलिंद मानकर) : मधूर स्वर आणि सहृदयता यामुळे सोलापूरच्या भीमाबाईला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमोर गीत गाण्याचे भाग्य लाभले. ‘निळा झेंडा उंच धरा रे, दलितांची घटना घडवा, जुन्या रूढींना देऊनी टोला, जयभीम बोला, जय भीम बोला… ‘ हे गीत ऐकल्यावर प्रत्यक्ष बाबासाहेबांनी त्यांचे अभिनंदन केले होते. आज, ३० जुलै थोर माऊली भीमाबाईंचा चौथा स्मृतीदिन.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आत्मोद्धाराची होती. सर्व समाजदर्शी होती. हजारो वर्षांच्या रूढी, परंपरा, अज्ञान यामुळे आधुनिक प्रगत जगाकडे पाहण्याची दृष्टी अस्पृश्य समाजाला नव्हती. ही दृष्टी बाबासाहेबांनी दिली. अस्पृश्य म्हणून गणलेल्या स्त्रियांच्या एका सभेत बाबासाहेबांनी ‘तुमचे राहणीमान बदलले पाहिजे. तुम्ही नेसणाऱ्या साड्या व्यवस्थित अंगावर परिधान केल्या पाहिजेत. तुम्ही आपले चारित्र्य सांभाळले पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी उच्च ध्येय ठेवले पाहिजे. त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत. व्यसनी आणि दारू पिऊन येणाऱ्या नवऱ्यास घरात घेऊ नका. त्याला अद्दल घडवा’ असे मार्गदर्शन केले होते. तत्कालीन स्त्रियांनी बाबासाहेबांचा हा विचार मनोमन जाणला.
काहींनी कृतीत उमटविला. त्यापैकी सोलापूरच्या भीमाबाई लक्ष्मण सिद्धगणेश एक होत्या. भीमाबाईंच्या घरी अठराविश्व दारिद्रय होते. वडील गिरणी कामगार होते. सोलापूरच्या फॉरेस्ट एरियाला लागून असलेल्या सुराट गल्लीत त्यांचे वास्तव्य होते.
बाबासाहेब जेव्हा जेव्हा सोलापूरला यायचे त्यावेळी फॉरेस्ट एरियातील गंगा निवासात मुक्काम करायचे. गंगा निवास ही इमारत हणमंतू पसलेलू (गार्ड) यांच्या मालकीची आहे. १९४० साली बांधलेली इमारत आतून अतिशय देखणी आहे. बाबांच्या वास्तव्याने हिच्या लौकिकात अधिक भर पडली आहे. विश्वासू आणि निष्ठावान सहकारी आमदार जीवप्पा सुभादा ऐदाळे यांच्या प्रचार दौऱ्यासाठी बाबासाहेब सोलापूरला आले होते.
भारदस्त व्यक्तीमत्त्व, मधूर स्वर आणि सतत भेटणाऱ्या माणसांशी आत्मीयतेने बोलणे, वागणे, चर्चा करणे या मनमिळावू स्वभावामुळे भीमाबाईला एकदा बाबासाहेबांच्या समोर गीत गाण्याचे भाग्य लाभले. ‘निळा झेंडा उंच धरा रे दलितांची घटना घडवा, जुन्या रूढींना देऊनी टोला, जय भीम बोला ट, जय भीम बोला..’ हे उत्स्फूर्त क्रांतिकारी सामाजिक संकल्पनेचा संदेश समाज बांधवापावेतो पोहचविणारे गीत ऐकून बाबासाहेब प्रभावित झाले. त्यांनी भीमाबाईचे अंतःकरणापासून अभिनंदन केले. याचा मनस्वी आनंद भीमाबाईंनी आपल्या हृदयकुपीत जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपासला.
भीमाबाई अशिक्षित असल्या तरी तडफदार आंबेडकरवादी कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या मुखातून निघणारा ‘जयभीम’चा हुंकार अनेकांना प्रेरणा आणि स्फूर्तीचा झरा ठरला. त्यांची बहीण सुभद्रा मात्र हुशार होती. उच्च शिक्षण घेऊन तिने नर्सिगची नोकरी पत्करली होती. सुभद्रा सिद्धगणेश, पार्वती शिंगे, विठाबाई काटे, सुलोचना काटे (केदारी ), सुशीला वनसाळे या तत्कालीन सोलापूरच्या निष्ठावान आंबेडकरी महिला कार्यकर्त्या होत्या. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि रिपब्लिकन पक्षाच्या लढ्यात भीमाबाईने मोठ्या हिरीरीने, हिंमतीने आणि बाणेदारपणाने महिलांचे नेतृत्व केले. गरोदर असतानाही त्यांनी भूमीहिनांच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. पुणे आणि सोलापुरातील तुरुंगात दोन महिने कारावास भोगला. म्हातारपणामुळे भीमाबाईला बोलणे अवघड जायचे. बाबासाहेबांबद्दल बोलायचे आहे असे म्हटल्यावर एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा खड्या आवाजात त्या बाबासाहेबांच्या ओजस्वी, दुर्मिळ आठवणी सांगायच्या.
आंबेडकरी चळवळीत बोलावले की त्या तेवढ्याच उत्साहाने, लगबगीने सहभागी व्हायच्या. ‘आंबेडकर नावाची ऊर्जा सर्व दुःखावर मात करण्याचे बळ देते’ असे त्या अभिमानाने सांगायच्या. सोलापूरची भीमजयंती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. एका जयंती समारोहाच्या भीमाबाई उपाध्यक्ष होत्या.
त्या प्रसंगाची उत्स्फूर्त आठवण सांगताना सुशीलाबाई वनसाळे म्हणतात, ‘मी आणि भीमाबाई भीम जयंतीच्या रॅलीसाठी गेलो होतो. सकाळपासून ते संपूर्ण रात्र त्यावेळी भीमाबाईने जागून काढली होती. तहान – भूक विसरून त्या ‘भीममय’ झाल्या होत्या. ‘भीमाबाईचे नाव उच्चारताच बाबासाहेबांच्या मातोश्रीचे दिव्य स्मरण होते. भीमाबाई आंबेडकर मोठी करारी आणि कर्तबगार स्त्री होती. बोलघेवडी, स्वाभिमानी, निश्चयी अन् धर्मपरायण होती. वर्णाने गोरी होती. डोळे टपोरे नि पाणीदार होते. सोलापूरच्या भीमाबाई म्हणजे या भीमाबाईचं जणू प्रतिरूप !
अशा या धीरगंभीर थोर माउलीने वयाच्या ८५ व्या वर्षी ३० जुलै २०१७ रोजी आपल्या राहत्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर , ता . पोलिस स्टेशन, सोलापूर येथे अखेरचा श्वास घेतला. जगातून जाणारे स्मृतीरूपाने सदैव जिवंत असतात. त्यांच्या आठवणीने हृदय भरून येते. डोळे नकळत पाणावतात. आज आंबेडकरी समाजाची दुरवस्था पाहून निष्ठावंत अन् कर्तबगार भीमरूपी सूर्याच्या सावलीत गीत गाण्याचे सुभाग्य लाभलेल्या ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्त्या भीमाबाईंना मानवंदना.
“धन्य प्रथम गायिका लाभली,
थोर आंबेडकरी चळवळीला
भिमाई नंतर भिमाई झाली,
अभिवादन गानकोकिळाला”
– मिलिंद मानकर, नागपूर
मो. 8080335096