घेरडी जि.प. गट कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेणार
रा.स.प. नेते सोमा (आबा) मोटे यांचा निश्चय
सांगोला : डॉ. नाना हालंगडे
स्थानिक स्वराज्य संस्थांतील महत्त्वाचा घटक अर्थात मिनी मंत्रालय अशी ख्याती असलेल्या जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक गटागटांत इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या घेरडी जि.प. गटातही रासपचे जिल्हाध्यक्ष सोमा (आबा) गुलाबराव मोटे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. घेरडी जि.प. गट कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेणार असल्याचा निश्चय सोमा (आबा) मोटे यांनी थिंक टँकच्या विशेष प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.
खेड्यापाड्यातील पायाभूत सुविधा व विकासाची मदार असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा आगामी काही दिवसांतच होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने गावखेड्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. यंदाही मागीलप्रमाणे इच्छुकांची भाऊगर्दी होणार असली तरी मागील निवडणुकीत आपले बंधू उद्योगपती तथा घेरडीचे विद्यमान सरपंच पिंटूदादा पुकळे यांच्या पाठिशी राहून जोरदार फाईट दिलेले सोमा (आबा) मोटे हे यंदा नव्या जोशाने स्वतः या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मागील जि.प. निवडणूक शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढविली होती. त्यावेळी रासप व त्यांच्या मित्रपक्षांनी एकाकी झुंज दिली होती. मागील निवडणुकीत पिंटुदादा पुकळे यांचा केवळ 1,241 मतांनी निसटता पराभव झाला होता. त्या निवडणुकीत त्यांची ताकद दिसून आली होती. त्यामागे सोमा (आबा) मोटे यांचे मोठे बळ होते. आपल्या बंधूच्या पराभवानंतर खचून न जाता सोमा (आबा) मोटे यांनी मागील चार वर्षांपासून घेरडी जि.प. गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. लोकप्रतिनिधीचे पद नसतानाही त्यांनी अनेक शासकीय लाभाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या आहेत.
कोण आहेत सोमा (आबा) मोटे?
सोमा (आबा) मोटे हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते व रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचे निकटवर्तीय, विश्वासू सहकारी मानले जातात. ते 1998 पासून आजतागायत महादेव जानकर यांच्यासमवेत काम करीत आहे. या काळात कित्येक जणांनी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडचिठ्ठी दिली मात्र सोमा (आबा) मोटे यांनी एकनिष्ठ राहून जानकर यांचे हात बळकट करण्याचे काम केले. मा. महादेव जानकर यांची पूर्वीची यशवंत सेना ही संघटना व सध्याचा राष्ट्रीय समाज पक्ष या दोन्ही संघटनांत सोमा (आबा) मोटे यांनी जोमाने काम केले आहे. मागील 7 वर्षांपासून सोमा (आबा) मोटे हे रासपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनेक निवडणूक पार पडल्या आहेत. रासपचे जिल्ह्यातील वजनदार नेते म्हणून सोमा (आबा) मोटे यांच्याकडे पाहिले जाते.
सोमा (आबा) मोटे यांची राजकीय वाटचाल
समाजकारणातून राजकारणात प्रवेश केल्यापासून आजतागायत सोमा (आबा) मोटे यांनी महादेव जानकर यांची साथ सोडली नाही. तब्बल 23 वर्षांपासून ते आजतागायत जानकर यांच्यासोबत आहेत. रासप हा राज्यात भाजपसोबत सत्तेत भागीदार पक्ष असतानाही कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सोमा (आबा) मोटे यांनी काम केले. मागील विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्याने रासप व भाजप हे विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत. जर असे न घडता भाजप व रासपची सत्ता राहिली असती तर सोमा (आबा) मोटे यांना विधानपरिषद अथवा महामंडळाचे अध्यक्षपद निश्चित मिळू शकले असते असे राजकीय जाणकार मत मांडतात.
- हेही वाचा : सांगोल्याच्या डाळिंबाला वातावरणातील बदलाचा फटका
अफाट संघटन व गोरगरिबांना न्याय
सोमा (आबा) मोटे हे स्वतः तरुण असले तरी तरुण कार्यकर्त्यांसोबतच बुजुर्ग मंडळीही त्यांना मानतात. उत्साही तरूण नेता, युवक संघटन मजबूत असणारा संघटक, मदतीला धावून जाणारा नेता अशी सोमा (आबा) मोटे यांची घेरडी गटात ओळख आहे. मागील काळात सोमा (आबा) मोटे यांनी असंख्य विकासकामे केली आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीत रासप व शेकापने युती करून घेरडी ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. रासप व शेकापचे या ग्रा.पं. मध्ये 9 सदस्य आहेत. ही राजकीय घटना सोमा (आबा) मोटे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी आहेे.
घेरडी जि.प. गटाचे भौगोलिक स्वरुप
घेरडी गटात घेरडी, हंगिरगे, पारे, नराळे, गावडेवाडी, हबिसेवाडी, तरंगेवाडी, आगलावेवाडी, भोपसेवाडी, बुरंगेवाडी, सोनंद, गळवेवाडी, डोंगरगाव, डिकसळ आदी गावे येतात. हा गट सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. सोमा मोटे हे स्वतः या सर्वच गावांत मोंठा जनसंपर्क ठेवून आहेत. केवळ निवडणुकीपुरते लोकांकडे न जाता ते सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात. लोकांना शक्य ती आर्थिक मदत, शासकिय कामे, न्याय देण्याची भूमिका त्यांची आहे. शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचे बंधू पिंटू पुकळे यांचे हत्तीचे बळ मिळाल्याने सोमा आबा मोटे धडाडीने काम करताना दिसतात. घेरडी जि.प. गटातील घेरडी गावातच शेकापमध्येही गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. ही गटबाजी युवा नेते डॉ. बाबासाहेब व डॉ. अनिकेत देशमुख यांनी मिटवणे गरजेचे आहे. असे झाल्यास शेकापला याचा चांगला फायदा होईल. या गटतटाला दोन्ही डॉक्टर बंधूंनी थोपविणे गरजेचे आहे.
यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच
आगामी जिल्हा परिषद निवडणूक रासप व शेकापच्या युतीतून लढविण्याची दाट शक्यता आहे. घेरडी गटाची जागा शेकाप किंवा रासप या दोन्हीपैकी कोणालाही सुटली तरीही ज्या पक्षाला जागा सुटेल त्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यावर मोटे ठाम आहेत.
- हेही वाचा : आमदार निलेश लंके यांच्यावर येतोय मराठी चित्रपट
शेकापची भूमिका ठरणार निर्णायक
नुकत्याच झालेल्या सांगोला नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेना यांनी युती केली आहे. आगामी सर्व निवडणुकांत या तीन पक्षांची युती कायम राहिल असे दिसते. याचे स्पष्ट चित्र जि.प. व पंचायत समिती निवडणुकीवरही दिसत आहे. राज्यात सत्तेत असलेले हे तिनही पक्ष एकत्र आल्याने शेकाप हा एकाकी पडला आहे. शेकाप हा भाजपसोबत कदापिही जाणार नाही, असे वक्तव्य सांगोल्याच्या दोन दिवशीय शिबीरात शेकापचे चिटणीस भाई जयंत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी निवडणुकीत भाजपसोबत शेकाप जाणार नाही हे स्पष्ट आहे. आता शेकापला समविचारी पक्षांसोबत जाण्याशिवाय गत्यंतर नाही. मागील निवडणुकीतील मित्रपक्ष रासपला सोबत घेणे क्रमप्राप्त आहे. त्यात रापसचे नेते जिल्हाध्यक्ष सोमा (आबा) मोटे यांची युतीबाबतची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. ते घेरडी गटातून निवडणूक लढण्यावर ठाम आहे. शेकापने संधी दिली तर शेकापमधूनही निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी असल्याचे त्यांनी थिंक टँक प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
दोघा डॉक्टरबंधूची भूमिका काय?
महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी शेकापसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. असे असले तरी शेकाप हा तालुक्यातील बलाढ्य पक्ष आहे. अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती गण, जि.प. गण त्यांच्या ताब्यात आहेत. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी डॉक्टर बंधूंना खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहेत. आपल्या जुन्या मित्रपक्षाला नाराज करणेही त्यांना परवडणारे नाही. आपल्याच पक्षातील हेवेदावे व गटतट आताच शेकापला मिटविणे क्रमप्राप्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशातच सोमा (आबा) मोटे यांनी निवडणुकीसाठी निर्णायक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत शेकाप व रासप मधूनच निवडणूक लढणारच असा चंग बांधून कामाला सुरुवात केली आहे.