घेरडी-जवळा रस्त्यावर मरण यातना
7 कि.मी.च्या प्रवासाला लागतात 70 मिनिटे
घेरडी ते जवळा रस्ता हा जत, मंगळवेढा तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. तालुक्यातील दररोज शेकडो लोकांचा जवळा, सांगोला, घेरडी या गावांशी संबंध येतो. घेरडी ते जवळा रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने या रस्त्यावरून जाणे म्हणजे अग्नीपरिक्षा देण्यासारखे आहे. नेते मंडळी महागड्या गाड्यातून या रस्त्यावरून जातात. मात्र, हा रस्ता चांगला व्हावा असे त्यांना वाटत नाही. कारण जनतेला छळण्यात त्यांना आनंद वाटतो.
सांगोला / नाना हालंगडे
घेरडी व जवळा ही गावे तालुक्याच्या राजकीय पटलावरील महत्त्वाची गावे मानली जातात. या भागात नेते बडे असले तरी त्यांच्या कर्तृत्वशून्यतेमुळे जनतेचे प्रश्न मात्र तसेच अधांतरी आहेत. घेरडी ते जवळा ह्या 7 कि.मी.च्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. अत्यंत दयनीय अवस्था होऊनही कोणताही पुढारी या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. लोकांनी या खड्ड्यात पडून मरावे हीच भावना बांधकाम विभाग व नेतेमंडळींची दिसून येत आहे.
7 कि.मी.च्या अंतरासाठी 70 मिनिटे
घेरडी ते जवळा ह्या 7 कि.मी.च्या रस्त्याची चाळण झाल्याने सात किलोमिटरसाठी आत्ता चक्क सत्तर मिनिटे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची वाट बिकट झालेली आहे.
उद्घाटनाचा फुसका बार
सांगोला तालुक्यात मोठा धाटमाट करीत आजी-माजी लोकप्रतिनिधींनी रस्ताच्या कामाचा शुभारंभ केल्याचे नाटक केले. पाट्या लावल्या, अमूक एवढा निधी आणला म्हणून भिष्मगर्जना केली, पण कामे का सुरू झाली नाहीत? हा मोठा संशोधनाचा विषय आहे.
बांधकाम विभागाकडून रस्त्यांची “माती”
दोन वर्षापासून तालुक्यातील रस्त्यांची डागडुजी केली नाही. जी केली ती बांधकाम विभागाने मातीत घातली. त्यामुळे तसे तालुक्यातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्यातील हा एक घेरडी ते जवळा रस्ता. या सात किलोमिटरच्या मार्गावर प्रवास करावयाचा म्हटले तर सत्तर मिनिटे लागतात, मग तुम्हीच कल्पना करा रस्ता किती सुपेरियर असेल.
घेरडी गावच्या पुलापासून ते पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता जरा बरा आहे. त्यानंतर नळापासून ते तरंगेवाडीपर्यंत खड्ड्यांचे सामाज्य. तर तरंगेवाडी ते जवळ्याच्या सरकारी दवाखान्यापर्यंत महाकाय खड्ड्यांचे साम्राज्य. अशी ही रस्त्यांची दुरवस्था आहे. जवळा ते कडलास गावापर्यंत रस्त्यांची अवस्था ही अशीच आहे.
असा हा सात किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खराब असल्याने, घेरडीकराना नाहक त्रास सोसावा लागत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांनाही तारेवरची कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे. त्यामुळे आज एकही घेरडीकर यामार्गाने प्रवास करीत नाही. हे असे किती दिवस चालायचे.
खरे तर घेरडी हे गाव तालुक्यातील नावाजलेले गाव. दोन्ही जिल्ह्यातील लगतच्या मंगळवेढा तालुक्यातील लोकांची सतत ये-जा असते. पण वाटच बिकट असल्याने, घेरडीला कोणीही येण्यास धजावत नाही. या बिकट रस्त्यामुळे यांची कोंडी झाली आहे.
नेते बडे, मात्र बिनकामाचे
गावात बडेबडे पुढारी आहेत ,पण त्यांनाही काही देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. आता मात्र एक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र हा रस्ता एक ना एक दिवस खड्ड्यात घालणार आहे. तालुक्यात बांधकाम विभागानेही मात्र आता खड्डे बुजविण्याचा जंगी कार्यक्रम सुरू केला आहे. तो ही चक्क मातीनेच. हे सर्व असे होत असताना, बांधकामचा उपअभियंता मात्र याला दुजोरा देत आहे. त्यामुळे तालुक्यात हा बांधकाम विभाग ठेकेदाराच्या तालावर नाचत असल्याचे पहावयास मिळत आहे.
तालुक्यात घेरडी गाव प्रसिद्ध आहे. पण विकासकामात मात्र पिछाडीवर असल्याचे पहावयास मिळत आहे. या गावाला येण्यास धड रस्ता नाही. इच्छाशक्ती किंवा निर्णय घेण्याची तेवढी कुवत नसल्याने पुढारी मंडळींना याचे देणे घेणे दिसत नाही. केवळ दळणवळणला रस्ताच नाही. जो आहे तो सत्तर हजार खड्ड्यांनी व्यापला आहे. मग गावाचा विकास कसा होणार?
घेरडी ते जवळा रस्ता हा जत, मंगळवेढा तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. तालुक्यातील दररोज शेकडो लोकांचा जवळा, सांगोला, घेरडी या गावांशी संबंध येतो. घेरडी ते जवळा रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने या रस्त्यावरून जाणे म्हणजे अग्नीपरिक्षा देण्यासारखे आहे. नेते मंडळी महागड्या गाड्यातून या रस्त्यावरून जातात. मात्र, हा रस्ता चांगला व्हावा असे त्यांना वाटत नाही. कारण जनतेला छळण्यात त्यांना आनंद वाटतो.
उपअभियंता काय करतात?
अख्खा सांगोला तालुका खड्ड्यात घालणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तालुक्यात शिरजोर झाले आहेत. ते कोणालाही जुमानत नाहीत. तालुक्यातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून, तालुक्यातील रस्तेही मातीत घालत आहे. याच मातीबाबत त्यांच्याकडे विचारणा केली पण हे मस्तावाल अधिकारी हे मानायला तयार नाहीत. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची अवस्था सुधरेल का? हा सारा संशोधनाचा विषय आहे. एकूणच काय तर बिनकामाचे नेते आणि बेफिकीर अधिकारी हे संगनमताने वाहन चालकांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहेत.