ग्रंथ प्रकाशन व्यवसाय चक्रव्यूहात

जागतिक ग्रंथदिनानिमित्त विशेष लेख

Spread the love
ग्रंथ हे समाजमन घडवतात. ग्रंथातूनच इतिहास संवर्धित होतो. तो पुढच्या पिढीकडं प्रवाहित होतो. मानवी विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर ग्रंथ माणसाला साथ देत असतात. ग्रंथाचे हे योगदान आपण कधी नाकारूच शकत नाही. असे असले तरी ग्रंथ निर्मितीचा व्यवसाय अर्थात प्रकाशन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. संकटाचा हा चक्रव्यूह भेदणे आणि पूर्वपरिस्थितीत पुन्हा येणे वाटते तेवढे सोपे नाही. प्रकाशन व्यवसायाची ही स्थिती केवळ प्रकाशकच नव्हे,  तर लेखक,  वाचक आणि भाषेवर प्रेम करणा-या प्रत्येकासाठी विचार करायला लावणारी आहे. आज जागतिक ग्रंथदिन आहे. त्यानिमित्त प्रकाशन व्यवसायापुढील समस्यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.
विल्यम शेक्सपिअरचे स्मरण
जागतिक ग्रंथदिनानिमित्त काल रात्रीपासूनच समाजमाध्यमांवर शुभेच्छा संदेश धडाधड पडताहेत. यात वावगं काहीच नाही. समाजमन उत्सवी असतं. एखादा दिनविशेष,  सण, महापुरुषांची जयंती असली की तो दिवस अशा संदेशांमुळं माहोल बदलून टाकतो. दिनविशेषाचं नेमकं महत्त्व काय आहे? त्यातून बोध नेमका काय घ्यायचा आहे? हे ध्यानात न घेताच हा शुभेच्छांचा जल्लोष घडत असतो. जागतिक ग्रंथदिन साजरा करताना विल्यम शेक्सपिअरचं स्मरण करावं लागेल. जगविख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअरचा जन्मदिन 23 एप्रिल रोजीचा. त्यानिमित्त दरवर्षी या दिवशी जागतिक पातळीवर ग्रंथविषयक कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा सुरू झाली.
प्रकाशन व्यवसायापुढील नेमक्या समस्या
• प्रॉडक्शन कॉस्टमध्ये लक्षणीय वाढ
मागील वर्षभरापासून देशातील सर्वच व्यवसायांसमोर विविध समस्या उभ्या राहिल्या आहेत. लॉकडाऊनचा दीर्घकालिन परिणाम दिसत आहे. प्रकाशन व्यवसायही त्याला अपवाद नाही. कागदाचे दर किमान १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. बफ कागद इतर कागदांपेक्षा थोडा महाग असला तरी त्याचाही तुटवडा अनेक जिल्ह्यात जाणवतो. मूळात बफ कागदालाच अलिकडच्या काळात जास्त मागणी आहे. प्रिंटिंगचे मटेरिअल महागले आहे. कागद,  प्रिंटिंग,  कलर प्रिंटिंग,  लॅमिनेशन,  बायंडिंगच्या दरात सतत वाढच होतेय. यामागे जीएसटी हेसुद्धा एक मोठे कारण आहे.
• वितरण व्यवस्था ढासळली
वाढत्या डिजिटलायझेशनमुळे मुद्रित पुस्तकांची वाचकसंख्या घटली आहे. अनेक वाचक ई-बुककडे वळले आहेत. ही स्थिती कोरोना किंवा लॉकडाऊन काळातली नाही. मागील पाच-सहा वर्षांपासून हा परिणाम दिसून येत आहे. कोरोनाकाळात तर पुस्तक विक्रीची ही साखळी पूर्णपणे उदध्वस्त झाल्यात जमा आहे. पुस्तक विकत घेणे ही तातडीची किंवा अत्यावश्यक गरज नाही. त्यामुळे वाचक दुकानांकडे फिरकत नसल्याचे दिसते. कोरोनामुळे जवळपास सर्वच साहित्य संमेलने,  ग्रंथ प्रदर्शने व विक्रीचे इतर उपक्रम रद्द झाल्याने त्याचा थेट फटका ग्रंथ विक्रीला बसला आहे. ग्रंथविक्रीचे हक्काचे मार्केट असे ठप्प झाल्याने पुस्तकांचा उठाव झाला नाही.. सध्याही होत नाही.. पुढे कधी ही स्थिती पूर्वपदावर येईल हेही सांगता येत नाही. अनेक प्रकाशकांनी छापून ठेवलेले पुस्तकांचे गठ्ठे अजूनही फोडलेले नाहीत. पुस्तकं हा नाशवंत माल नसला तरी यामध्ये प्रकाशक व लेखकांची मोठी गुंतवणूक अडकून पडली आहे. परिणामी नव्या पुस्तकांची निर्मिती ठप्प झाली आहे.
• ई-बुकचा ट्रेंड
नव्या पिढीतील वाचक हे ई-बुकला प्राधान्य देताना दिसत आहे. अमेझॉन किंडलवर शेकडो ई-पुस्तके सशुल्क तसेच मोफतही उपलब्ध होत असल्याने तिकडे वाचकांचा राबता वाढला आहे. सशुल्क पुस्तकांतून लेखक व प्रकाशकांचा फायदा होत असला तरी मुद्रित पुस्तकाच्या तुलनेत हा व्यवहार अगदीच किरकोळ आहे. ई-बुकमुळे प्रकाशन व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला असला तरी नवलेखक व वाचकांसाठी असे डिजिटल प्लॅटफॉर्म एकाअर्थाने फायदेशीरच आहेत. ई-बुकच्या या प्रवाहाला सकारात्मकतेत रुपांतरित करण्यासाठी प्रकाशन क्षेत्राला आपल्या व्यावहारिक भूमिकांत बदल करुन प्राप्त परिस्थिती स्विकारण्याशिवाय पर्याय दिसत नाही.
• ऑडिओ बुकची क्रेझ
माणूस हा परिवर्तनशील आहे. तो नवे बदल स्विकारत असतो. हे वाईट मूळातच नाही. जे जे नवे तंत्रज्ञान आले त्याला प्रत्येकाने स्विकारले आहे. स्विकारलेच पाहिजे. कारण ती काळाची गरजही असू शकते. साहित्य क्षेत्रात आलेला ‘ऑडिओ बुक”चा प्रवाह याचेच उत्तम उदाहरण आहे. नव्या जमान्यातील लेखक व वाचकांत ऑडिओ बुकची क्रेझ असल्याचे दिसते. स्टोरीटेल सारख्या कंपन्या नवतंत्रज्ञानाचा चांगला वापर करुन मुबलक पैसा कमवित आहेत. यातील काही वाटा लेखकांनाही मिळतो,  हेही नाकारता येत नाही. ऑडिओ बुक हा प्रकार श्रवणाचा आनंद देणारा असल्याने त्याची क्रेझ पुढील काळातही वाढेलच, असे दिसते. याचा फटका पुस्तक विक्रीलाही बसला आहे हे वास्तव स्विकारतानाच आगामी काळात डिजिटलायझेनमुळे होणारे हे आघात सहन करुन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची ईच्छाशक्ती वृद्धींगत करावी लागणार आहे.
• अनुवादित पुस्तकांची दुनिया
मराठीतील असंख्य वाचक अनुवादित पुस्तकांकडे वळले आहेत. मात्र, त्यांची ही गरज पूर्ण होताना दिसत नाही. इंग्रजीसह अन्य भाषांतील साहित्य मराठीत अनुवादित होत आहे. इतर भाषांतील उत्तमोत्तम साहित्यकृतींचे मराठीत भाषांतर होण्यासाठी नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, खासगी प्रकाशकांकडून तसेच आंतरभारतीसारख्या प्रकल्पांतून प्रयत्न होत असले तरी ते अपुरे पडत आहेत. अनुवादित पुस्तकांच्या या व्यवहारातही व्यवसायाची चांगली स्पेस निर्माण होऊ शकते.
• शासन दरबारीही निराशाच
भाषेच्या संवर्धनात आणि माहिती,  ज्ञानाचा प्रवाह गतीमान करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा ग्रंथ व्यवहार शासन दरबारीही दुर्लक्षितच आहे. प्रकाशकांना पैशाच्या स्वरुपात मदत करणे सरकारला शक्य नसले तरी किमान या व्यवसायातील अडचणी दूर करुन पोषक वातावरण निर्माण करणे,  हे सरकारला शक्य आहे. मध्यंतरी भाजप सरकारच्या काळात तत्कालिन मंत्री विनोद तावडे यांनी प्रत्येक जिल्ह्यात शहराच्या ठिकाणी पुस्तक विक्रीसाठी नाममात्र दरात दुकानगाळे महापालिकेने उपलब्ध करुन द्यावेत,  असा अध्यादेश काढला होता. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. हे झाल्यास किमान ग्रंथ विक्री व्यवस्थेला बळ मिळू शकते. यासाठी प्रकाशक संघटना,  लेखक व सुजाण वाचकांनीही आवाज उठवायला हवा.
• भाषिक अस्मिताही देऊ शकते बळ
ग्रंथ चळवळ चालवण्यासाठी,  वाढण्यासाठी आपल्या भाषेप्रती असलेली मानसिकताही महत्त्वाची ठरत असते. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये स्वत:च्या मातृभाषेविषयी असलेले प्रेम व त्यातून फुललेली अस्मिता लक्ष्यवेधी आहे. भाषा व प्रांताच्या अस्मितेचे राजकारणही तेथे जोरात चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होताना दिसते. आशयाच्या बाबतीत तिथे सतत नवोपक्रम होताना दिसतात. ग्रंथांची विक्रीही चांगली होत असल्याचे वाचक सांगतात.  तेथील भाषिक वृत्तपत्रांचा खपही मोठा असून ती आपापल्या भाषेच्या ग्रंथविक्री व्यवहाराला भक्कम पाठबळ पुरवितात,  असेही दिसते. आपल्या मराठी राज्यात काय स्थिती आहे? खासगी वा सरकारी पाठिंब्याने दक्षिणी भाषांमध्ये स्थापन झालेल्या साहित्य संस्थांचा पायाही भक्कम आहे. अशा संस्था ग्रंथ चळवळ गतीमान करीत असतात.
• हे संकट कधी संपणार?
सध्या संपूर्ण जगच कोरोना महामारीला थोपवण्यासाठी आपली ताकद पणाला लावतेय. आरोग्य विषयावर जास्तीचा खर्च करावा लागत आहे. या स्थितीतून आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हा प्रकाशन व्यवसायाला उर्जितावस्थता देण्यासाठी,  हा माहिती व्यवहार अधिक गतीमान करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.
– डॉ. बाळासाहेब मागाडे

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका