“गायछाप”ला भामट्यांनी लावला “चुना”
सोलापुरात आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
सोलापूर (एच.नाना): एरव्ही गायछाप तंबाखू्ला चुना लावून सेवन केल्याचं आपण ऐकतो. सोलापुरात मात्र वेगळंच घडलंय. भामट्यांनी चक्क गायछाप कंपनीलाच “चुना” लावलाय.. वाचा मती गंडवणारी बातमी..
- सर्वाधिक वाचलेली बातमी :
- ‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’
त्याचं झालं असं. मालपाणी कंपनीचा लोकप्रिय तंबाखू ब्रँड “गायछाप”ची नक्कल करून सोलापूर जिल्ह्यातील कुरुल (ता. मोहोळ) येथे विक्री होत असल्याची माहिती संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे सोलापूर प्रतिनिधी कैलास सोमाणी यांना कळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कुरुळ येथील दुकानावर धाड टाकली.
दुकानात बनावट गाय छाप तंबाखुचे पुडे आढळले. याची अधिक माहिती घेऊन त्यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक इसम बनावट गाय छाप तंबाखू वितरीत करत असल्याची फिर्याद पोलिसांत दिली. व्याप्ती आंतरराज्य असल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक मांजरे यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना याबाबत सांगितले.
अधीक्षक सातपुते यांनी याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. यानुसार पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी तपासादरम्यान आग्रा येथील मनोजकुमार उर्फ हिमांशूला ताब्यात घेतले. त्याच्याकडून माहितीच्या आधारे मास्टर माईंड रमेशकुमार गुप्ता (रा. गोंदिया) यास स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करीत त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला.
यानंतर रविशंकर कोटा, व्यंकटेश नागनाथ कोटा, हनुमंत खुने (सर्व रा. कुरुल, ता. मोहोळ) व दौंड येथील संतोष सतीश शेळके यांना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्यासह सहाय्यक निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, अंमलदार नारायण गोलकर, सलीम बागवान, रवी माने, चालक समीर शेख यांनी केली.
या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एकासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गाय छाप तंबाखू बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने राज्यात विविध ठिकाणी छापे टाकले. मास्टर माईंड रमेशकुमार गुप्ता याला विदर्भातील गोंदिया येथून अटक केली. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याची माहिती, कामती पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी दिली.
(तंबाखू सेवन करणे आरोग्यास हानिकारक आहे. Tobacco consumption is harmful to health.)