कोरोनोमुळे पतीचे निधन होताच पत्नीची तासाभरात रेल्वेखाली आत्महत्या
सोलापूरातील हृदयद्रावक घटना, मृत मंगळवेढ्यातील
सोलापूर : कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने व पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी सोलापूरात घडलीय. आप्पासाहेब रावसाहेब कोरे (रा. शरदनगर, ता मंगळवेढा, वय ३९) असे कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्या पतीचे तर, प्रियांका कोरे असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे.
पतीचे पहाटे निधन, पत्नीनेही जीवनयात्रा संपविली
बुधवारी पहाटे पतीचे निधन झाले आणि काही तासाच्या आत पत्नीने रेल्वेखाली आपली जीवनयात्रा संपवली. पती पत्नीचा करूण अंत झाला असून या ह्रदयद्रावक घटनेत सातवी इयत्तेत शिकणारा व एकुलता एक असणारा मुलगा हा पोरका झाला.
मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर येथील आप्पासाहेब रावसाहेब कोरे (वय ३९) हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सोलापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. त्यांना गेल्या दोन दिवसांपासून जास्त त्रास जाणवत होता अखेर उपचारादरम्यान त्यांचे बुधवारी पहाटे निधन झाले.
दरम्यान पतीच्या सेवेसाठी सोलापूर येथे दवाखान्यात असणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रियांका यांना पतीच्या निधनाची बातमी समजताच त्यांना मोठा धक्का बसला त्यांनी थेट रेल्वेखाली पडून आत्महत्या केली
मुलगा झाला पोरका
कोरोना महामारीने अजूनही दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या पश्चात असलेल्या कुटुंबाने जगावे कसे, याची धास्ती अनेकांना लागली आहे. या विवंचनेतून शरदनगर येथील एका पत्नीने आपली जीवनयात्रा संपवली. शरदनगर येथील आप्पासाहेब कोरे हे गॅसकंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. पत्नी ही मोलमजुरी करीत होती. पती पॉझिटिव्ह आल्यानंतर ते सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, १० दिवसांच्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बातमी पत्नीला कळताच तिने सोलापूर येथे रेल्वेखाली आत्महत्या केली.