कोरोना लसीच्या सक्तीमुळे घटनात्मक स्वातंत्र्याचे उल्लंघन
सक्ती मागे घ्या अन्यथा आंदोलन : बापूसाहेब ठोकळे
अनेकांची शासकीय कामे जसे उत्पन्नाचे, जातीचे दाखले यासारखी कामे खोळंबली आहेत. हा एक प्रकारचा अन्याय असून लोकांच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे.
सांगोला : थिंक टँक न्यूज नेटवर्क
कोरोना लसीच्या सक्तीसाठी अनेक ठिकाणी सर्वसामान्यांना विविध शासकीय कार्यालये, बँका, धान्य दुकान आदी ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येत आहेत. विविध ठिकाणी लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र दाखवल्या नंतरच प्रवेश दिला जात आहे. यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांची प्रशासकीय कामे, बँकांचे व्यवहार, नगरपालिका मधील कामे, रेशन दुकानातील धान्य मिळणे यामध्ये अडथळा निर्माण होत असून लस घेणे ही ऐच्छिक बाब असताना प्रवेशास बंधने घालून सर्वसामान्य जनतेवर एक प्रकारचा अन्याय केला जात आहे. प्रवेश बंदी तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा मोठ्या प्रमाणत आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, दोन डोस पैकी अनेक लोकांनी एक डोस घेतलेला असतानाही अशा लोकांना प्रवेश शासकीय कार्यालये, बँका, रेशन धान्य दुकान आदी ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच प्रवेश अशा आशयाचे फलक अनेक ठिकाणी लावले गेले आहेत. शासनाच्या लसी संदर्भात अशा धोरणामुळे समाजातील अनेक गरजू लोकांची शासनाच्या दरबारी असणारी अनेक कामे खोळंबली आहेत, अनेकांना त्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या शासकीय कार्यालयात येणारा प्रत्येक व्यक्ती काहीतरी महत्वाच्या कामासाठीच येत असतो, धान्याची गरज असल्यानेच व्यक्ती धान्याच्या दुकानात जातो, पैशाची गरज असल्या कारणाने व्यक्ती बँकासारख्या ठिकाणी जात आहे. सदर प्रवेश बंदीमुळे पेन्शन सुरु असणाऱ्या महिला- पुरुष- अपंग यांना त्यांना मिळणारा लाभ घेता येत नाही, अनेकांना लसीच्या प्रमाणपत्राअभावी धान्य मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.
अनेकांची शासकीय कामे जसे उत्पन्नाचे, जातीचे दाखले यासारखी कामे खोळंबली आहेत. हा एक प्रकारचा अन्याय असून लोकांच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे.
या उलट लसीकरणा संदर्भात मोठ्या प्रमाणात कोठेही जाणीव जागृती संबधित स्तरावर होताना दिसत नाही. लोकांना लसीच्या सुरक्षेसंदर्भात, लसीचे महत्व आदी बाबी जाणीव जागृतीमधून लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असताना लसी संदर्भात गावोगावी, वाड्यावस्त्यांवर जाणीव जागृती करण्या एवजी अनेक ठिकाणी प्रवेश बंदी केली जात आहे.
यामुळे अनेक लोकांची कामे थांबली जात असून सदर प्रवेश बंदी तत्काळ रद्द करवाई अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी दिला आहे.