कोरोनावर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणारा मांसाहार
डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा उपयुक्त लेख
“आज आमचा उपवास आहे, त्यामुळे आज आम्ही फराळ करणार आणि फराळासाठी शाबुदाणा, चीप्स (बटाटे), रताळे, शेंगदाणे, खजूर, भगर इत्यादी पदार्थच खाणार. आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत. मांसाहार करणारांकडे आम्ही पाणीही पीत नसतो. आमच्या सोसायटीत फक्त शाकाहारी लोकच राहतात, मांसाहारी कुटुंबाला आम्ही फ्लॅटही देत नाही. शाकाहारी लोक सात्विक, सोज्वळ, सुसंस्कृत, हुशार असतात. मांसाहारी लोक उग्र, तामसी, रानटी, मंद असतात.”
शाकाहाराचे समर्थन करणारे आणि मांसाहाराला तुच्छ लेखणारे लोक साधारणपणे अशा पद्धतीने सातत्याने बोलत असतात. कोणी कोणता आहार घ्यावा, आपण शाकाहारी, मिश्राहारी की मांसाहारी असावे, हे प्रत्येक व्यक्तीचे घटनात्मक स्वातंत्र्य आहे. संवैधानिक लोकशाहीमध्ये तर त्या स्वातंत्र्याचा आदरच केलेला आहे . एखादी व्यक्ती शाकाहारी असेल तर त्याचा आदर केला पाहिजे, एखादी व्यक्ती मिश्राहारी किंवा मांसाहारी असेल त्याचाही आदर केला पाहिजे. त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरती हल्ला करणे, हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. तरीदेखील प्रत्येक व्यक्तीला आपले विचार व्यक्त करण्याचे, आपला विचार निर्भीडपणे, अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेले आहे. त्यामुळेच मनुष्यप्राणी शाकाहारी की मांसाहारी याचे विवेचन करण्याचा हा प्रयत आहे.
हे विवेचन करण्यामागील उद्देश हा आहे की, आपल्या देशामध्ये वर्चस्ववादासाठी भाषा, लैंगिकता (सेक्स) धर्म, संस्कृती, परंपरा, आहार इत्यादींचा सातत्याने हत्यार म्हणून वापर केलेला आहे. माणसाने स्वतंत्र, आनंददायी, तणावमुक्त आणि बुद्धिप्रामाण्यवादी असावे, हा या लेखामागील उद्देश आहे. कोणाच्या धार्मिक भावना दुखावणे, कोणालाही जाणीवपूर्वक डिवचणे हा या लेखामागे उद्देश नाही.
मध्ययुगाच्या पूर्वार्धात अंधारामध्ये चाचपडणाऱ्या युरोपमध्ये वैज्ञानिक, साहित्यिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कला, औषधनिर्माण, पेंटिंग, औद्योगिक इत्यादी क्षेत्रांमध्ये आमूलाग्र क्रांती का झाली? तर त्या देशाने ग्रंथप्रामाण्य नाकारून बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारला, त्यासाठी अनेक प्रतिभावंतांनी बलिदान दिले. तेथे झालेल्या रेनेसॉन्स अर्थात पुनर्जागरण चळवळीमुळेच युरोपमध्ये क्रांती झाली. म्हणून जगातील महत्त्वाचे शोध युरोपमध्ये लागले. आपल्या भारत देशाला तर महावीर-बुद्धाची बुद्धीप्रामाण्यवादी परंपरा आहे. तरीदेखील आपण आज देखील परिपूर्ण बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारलेला नाही. त्यामुळेच आहाराच्या माध्यमातून वर्चस्ववाद, त्यातून अंधश्रद्धा- आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झालेले आहेत.
आपल्या देशात अनेक नैसर्गिक बाबींचा संबंध धार्मिकतेशी लावला जातो. लैंगिकतेचा संबंध धर्माशी (नैतिकतेशी), आहाराचा संबंध धर्माशी, मुळात धर्म अगोदर की आहार अगोदर ? नामवंत प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात “मानवी समूहाकडे सरप्लस धान्य झाल्यानंतरच धर्म ही संकल्पना उदयास आली.” मानव प्राणी भटक्या अवस्थेत असताना आतासारख्या त्याच्या आहाराबाबत संकल्पना निश्चितच नव्हत्या. जगविख्यात मानवशास्त्रज्ञ (अंथ्रोपोलॉजिस्ट) डार्विन असं म्हणतात की “जगातील कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झालेला नाही तर तो विशिष्ट काळामध्ये उत्क्रांत झालेला आहे”
सजीवांची निर्मिती ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. अडॉप्टेशन हे सजीवाचे वैशिष्ट्य आहे. निसर्गातील संकटे, संघर्ष, वातावरण, हवामान यानुरूप प्रत्येक सजीव स्वतःत बद्दल करतो व जिवंत राहतो. ज्यांच्याकडे अडॉप्टेशन नाही तो काळाच्या ओघात नष्ट होतो किंवा कमकुवत राहतो. अर्थात तो उत्क्रांत होऊ शकत नाही. आताचा मानव एका विशिष्ट काळामध्ये उत्क्रांत झाला. अर्थात तो मानवासारखा दिसू लागला तो काळ सुमारे 40 लाख वर्षांपूर्वीचा आहे,असे मानवशास्त्रज्ञ मानतात. दहा हजार वर्षांपूर्वी जगात प्रथमत: शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, असे प्राच्यविद्यापंडित शरद पाटील मांडतात. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी (आर्किऑलॉजिस्ट) पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे नवाश्मयुगात म्हणजेच आतापासून दहा हजार वर्षांपूर्वी प्रथमतः शेतीचा शोध लागला, असे सप्रमाण सिद्ध केले आहे.
म्हणजे सुमारे एकोणचाळीस लाख नव्वद हजार वर्षे मानव प्राणी हा भटकत आहे. तो अन्नाच्या शोधात भटकत आहे. त्याचा आहार अर्थातच निसर्गामध्ये सापडणारे पशुपक्षी, प्राणी म्हणजेच मांसाहार आहे. छोटे-छोटे मानवी कळप हे शिकार करून उदरनिर्वाह करत होते, याचे पुरावे अनेक ठिकाणच्या रॉक पेंटिंग मध्ये सामूहिक शिकारीच्या (हंटिंग गॅदरिंगच्या) रूपाने आज देखील उपलब्ध आहेत. अर्थात मानव हा निसर्गातील एक प्राणीच आहे. जेथे जे उपलब्ध आहे ते खाणे, हा त्याचा नैसर्गिक धर्म आहे. मांसाहाराबरोबर तो फळे-कंदमुळे देखील खात असणार, हे निश्चित ! म्हणजे मनुष्य प्राणी हा शंभर टक्के मांसाहारी किंवा शंभर टक्के शाकाहारी होता किंवा आहे, असा ठामपणे दावा करणे हे अनैसर्गिक आहे. पण तो शंभर टक्के मिश्राहारी आहे, हे मात्र निश्चित आहे.
सुमारे 70 हजार वर्षांपूर्वी मानव प्राण्यांमध्ये बोधात्मक क्रांती (कॉग्निटिव्ह रिवोल्यूशन) झाली, असे विश्वविख्यात इस्त्रायली इतिहासकार युवाल नोआ हरारी त्याच्या जगद्विख्यात अशा सेपियन्स या ग्रंथात सांगतो, म्हणजे याचा अर्थ आज उपवास आहे, उद्या एकादशी आहे, परवा शिमगा आहे, आज हा वार आहे, उद्या तो वार आहे, या संकल्पना तोपर्यंत आलेल्या नव्हत्या. मिश्राहारी असताना आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत,असा बडेजाव मारणे, हा वेडेपणा आधुनिक आहे, हे मात्र निश्चित!
जगातील पहिली नागरी संस्कृती म्हणजेच भटक्या अवस्थेतला मानवप्राणी नदीकिनाऱ्यावरची शेती करून राहू लागला, तो काळ म्हणजे आपल्याकडील हरप्पण संस्कृती (इसपू सुमारे 4000 ते 1600) ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणजेच इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो. त्याच काळात आत्ताच्या इराक- इराण- तुर्कस्तानमध्ये असणारी मेसोपोटेमिया आणि नाईलच्या खोऱ्यातील इजिप्त संस्कृती होय.या संस्कृती समकालीन होत्या. या काळापासून मानव प्राणी अन्नधान्य उत्पादन करू लागला, पण त्यासोबत तो मासेमारी, शिकार करत असल्याचे पुरातत्वीय पुरावे सापडलेले आहेत. आर्य आक्रमणानंतर सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला, असे पुरातत्त्वज्ञ मॉर्तीमर व्हीलर, गोडन चाइल्ड, डॉ. जे. एन. पांडे इत्यादी सांगतात.
गोमांस हे तर आर्याब्राह्मणांचे आवडते खाद्य होते, याचे अनेक पुरावे वैदिक वाड्मयामध्ये आहेत. वर्धमान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध हे वैदिक आर्यांच्या पशुहत्याविरुद्ध तत्त्वज्ञान घेऊन उभे राहिले. त्यांना मोठ्या समुदायाचा पाठिंबा मिळाला. वर्धमान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध हे अहिंसावादी होते. पशुहत्या विरुद्ध ते धार्मिक अंगाने नव्हे, तर भौतिक अंगाने होते, असे जगविख्यात इतिहासकार डॉ. रोमिला थापर त्यांच्या अर्ली इंडिया या ग्रंथात सांगतात. डॉ. रोमिला थापर या प्राचीन इतिहासाच्या महान अभ्यासक आहेत. बुद्ध- महावीर – अशोक हा त्यांच्या व्यासंगाचा विषय आहे. त्यांच्या मतानुसार सिंधू संस्कृतीच्या ह्रासानंतर दुसरे नागरीकरण (सेकंड अर्बनायझेशन) गंगेच्या खोऱ्यात झाले.
इसवी सन पूर्व सुमारे एक हजार वर्षांपासून जगात लोखंडाचा वापर सुरू झाला. त्यामुळे नागरीकरण अधिक गतिमान झाले. लोखंडी हत्यारामुळे गंगेच्या खोऱ्यातील जंगल साफ झाले. वहीवाटीसाठी मुबलक जमीन उपलब्ध झाली. परंतु, मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे पशुबळ हेच गंगेच्या खोऱ्यातील शेतीसाठी अधिक महत्त्वपूर्ण होते. महावीर आणि बुद्ध हे संघ गणातून आलेले राजपूत्र होते. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांचा अधिक ऋणानुबंध आणि जिव्हाळा होता. त्यामुळे ते शेतकऱ्यांचा कैवार घेऊन यज्ञयाग आणि पशुहत्येच्या विरुद्ध ब्राह्मणी धर्माविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने वैचारिक संघर्ष करू लागले. शेतीसाठी उपयुक्त असणारे पशुधन यज्ञासाठी दान देऊ नका, हा त्यांचा आग्रह होता. तरी ते पूर्णतः शाकाहारी होते, असा पुरावा सापडत नाही.
महावीर-बुद्ध यांनी यज्ञयागाला विरोध केला, पण आहाराबाबत ते कर्मठ नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. बुद्ध तर म्हणाले “जेथे जे उपलब्ध आहे ते खावा”. बुद्ध अहिंसावादी होते, परंतु टोकाचा क्लेश आणि टोकाचा उपभोग बुद्धाला मान्य नव्हता. बुद्ध हे मध्यममार्गी होते. ते निसर्गवादी होते. अन्नदात्याला न छळता उपलब्ध असणारा आहार ते घेत होते, त्यामध्ये मांसाहार अपवाद नव्हता. परंतु, शाकाहारच घेतला पाहिजे किंवा मांसाहारच घेतला पाहिजे हा हटवाद बुद्धाकडे नव्हता.
जशी आहारावरून बुद्धिमत्ता-गुणवत्ता ठरत नसते, तशी भाषेवरून देखील गुणवत्ता ठरत नसते. परंतु, जगामध्ये भाषा, आहार, धर्म, लैंगिकता याचा उपयोग वर्चस्वासाठी केला जात आहे. प्रमाणभूत-शुद्ध भाषा बोलणारे लोक म्हणजे हुशार, सुसंस्कृत आणि अशुद्ध भाषा बोलणारे लोक म्हणजे निर्बुद्ध, गावंढळ, अशी एक अंधश्रद्धा निर्माण करण्यात आलेली आहे. त्यातून लोकभाषा- बोलीभाषेतला बुद्धिमान, गुणवान लोकांना महत्वाच्या पदावरती येताना जाणीवपूर्वक डावलले जाते, तसेच आहाराबाबत देखील आहे. शाकाहारी लोक म्हणजे सज्जन, शाकाहारी लोक म्हणजे सुसंस्कृत, गुणवान, बुद्धिमान, नीतिमान, असे ठरविले की मांसाहार करणाऱ्या लोकांना तुच्छ लेखणे, निर्बुद्ध लेखणे, त्यांच्यावरती नियंत्रण मिळवणे. प्रसंगी त्यांना घर नाकारणे, त्यांच्या आहारावरती नियंत्रण आणणे, हे वर्चस्ववादी राजकारण सुरू होते. डाटा असे सांगतो की अनेक गुन्हेगार देखील शाकाहारी आहेत. अनेक मांसाहारी लोक देखील सुसंस्कृत असून त्यांनी बौद्धिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केलेली आहे. जगातील महत्त्वाचे शोध लावणारे शास्त्रज्ञ शाकाहारी की मांसाहारी यावर महत्वपूर्ण संशोधन होऊ शकते.
काही वर्षांपूर्वी भारतीय वायू दलात काम करणाऱ्या एका युवकाच्या घरावर हल्ला करून तुमच्या घरी गोमांस शिजवले जात आहे, अशी विचारणा केली, त्यामध्ये अखलाक यांचा मृत्यू झाला. ते गोमांस नसून बकऱ्याचे मांस होते, हे तपासात पुढे सिद्ध झाले. मुळात एखाद्याने घरी कोणते अन्न शिजवावे, हे ठरवण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे का? हा संवैधानिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे. म्हणजेच आहाराचा उपयोग वर्चस्वासाठी, ध्रुवीकरणासाठी अर्थात राजकारणासाठी केला जात आहे. मोठ्या शहरांमध्ये मांसाहार करणाऱ्या कुटुंबाला सोसायटीमध्ये घर नाकारले जात आहे. हे कृत्य अमानवी आहे, कारण मानव प्राणी हा काही पूर्णतः शाकाहारी नाही.
आपण जे दही खातो, ताक पितो. ते दही बॅक्टेरियाशिवाय तयारच होऊ शकत नाही. बॅक्टेरिया उपयुक्त सजीव आहे. तो दह्यात असतो आणि आपण ते खातो. मग सांगा आपण बकरा खाल्ला काय, कोंबडा खाल्ला काय, मासा खाल्ला काय. दही खाल्ले काय सगळे सारखेच! जसा बॅक्टेरियाला जीव आहे, तसाच माशाला जीव आहे, आपण अनेक वेळा औषधे (मेडिसिन) घेतो. अनेक औषधे प्राणीजन्य आहेत. त्यामध्ये प्राण्यांच्या हाडांचा, चरबीचा, विविध अवयवांचा वापर केला जातो, हे आपणाला औषधनिर्माते (फार्मासिस्ट) देखील सांगतील. शुद्ध शाकाहरीच्या गप्पा मारणारे लोक ताक आणि औषधे घेत नाहीत का? अनेक शाकाहारी पदार्थ शरीरासाठी जसे उपयुक्त आहेत, तसेच अनेक मांसाहारी पदार्थ देखील उपयुक्त आहेत.
आपल्याला शरीरासाठी मिळणारे कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स मांसाहारातून मोठ्या प्रमाणात मिळते. कोरोनाच्या काळात देखील अनेक डॉक्टर्स अंडी, मटण, चिकन, मासे खाण्याचा सल्ला देतात, ती आज गरज आहे. किंबहुना मांसाहार करणाऱ्या व्यक्तीमध्ये कोरोनापासून बचाव करणारी प्रतिकारशक्ती अधिक असते,असे तज्ज्ञांचे मत आहे. नियमित मांसाहार करणारांना कोरोनापासून अत्यल्प धोका आहे. मांसाहारातून उत्तम दर्जाची प्रथिने (प्रोटिन्स) मिळतात. शरीराची झीज भरून काढून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रोटिन्स खूप उपयुक्त असतात. प्रोटिन्सच्या अभावी अनेक व्याधी होतात, आपण जेंव्हा औषधोपचार घेऊन दवाखान्यातून बाहेर पडतो, तेव्हा डॉक्टर आहाराबद्दल काय सांगतात? रोज अर्धा लीटर चहा पीत जावा, चार बटाटे, चार रताळे, पाव किलो शाबूखिचडी खात जावा, असे सांगतात का?. ते भाजीपाला, अंडी, चिकन, मटण खाण्याचा सल्ला देतात.
आपल्याकडचे अनेक लोक अभिमानाने सांगत असतात, आज आमचा शनिवार आहे, आज आमचा गुरुवार आहे, आज आमचा सोमवार आहे, त्यामुळे आज उपवास आहे. बरे शनिवार, सोमवार, गुरुवार उपवास करणारे लोक रविवारी, बुधवारी, शुक्रवारी, मांसाहार करतात. मग त्यादिवशी केलेला मांसाहार उपवासादिवशी शरीरात नसतो का?. म्हणजे आपण कोणाची फसवणूक करत आहोत? मानव प्राणी चंद्रावर जाऊन हवामान, वातावरण, दगड-धोंडे यांचा अभ्यास करून, जेवण करून आणि मलमूत्र विसर्जन करून आला, तरीदेखील चंद्रोदय झाल्याशिवाय अनेकांची चतुर्थी सुटत नाही. चंद्राचा, चतुर्थीचा आणि आहाराचा काय संबंध?.
सामान्यपणे उपवास याचा अर्थ हलका व मित्ताहार घेणे असा होतो. बृहदारण्यक उपनिषदात ईश्वराप्रत जाण्याचे जे विविध उपाय सांगितले आहेत, त्यापैकी उपवास हाही एक आहे, असे मानले जाते. उपवास म्हणजे च्याजवळ वास करणे, पोहचणे, जाणे असाही अर्थ होतो. उदाहरणार्थ उपसरपंच, उपमुख्यमंत्री, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक म्हणजे सरपंच, मुख्यमंत्री, प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या जवळचे पद. उपवास म्हणजे देवाच्या नावाने उपाशी राहणे व विशिष्ट पदार्थ खाणे असा नव्हे. उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग आहे, असे गौतम धर्मसूत्रात सांगितले आहे. यज्ञ कर्माला उपयुक्त असे धान्य शिजवून त्याचा अल्पाहार घेणे, असा उपवास याचा अर्थ काठक गृह्यसूत्रात सांगितला आहे. तपाच्या निरनिराळ्या प्रकारात उपवास हा श्रेष्ठ असे महाभारत या ग्रंथात सांगितले आहे. एकादशी, महाशिवरात्री, हरितालिका, रामनवमी अशा विविध व्रतांमधेही उपवासाचे स्थान महत्त्वाचे आहे. श्रमण संस्कृतीत श्रमाला महत्व आहे, ऐतखाऊ वृत्तीला नाही, त्यामुळे स्वाभाविकच श्रम करणारा वर्ग उपवास करून प्रोटिनचा सोर्स बंद करणार नाहीत, परंतु धर्माच्या नावाखाली अभिजन वर्गाने श्रमणांवर उपवास/शाकाहार लादले आहे, हे स्पष्ट होते. आहाराला नैतिकतेच्या/धर्माच्या चौकटीत बंदिस्त करून मानवप्राण्याच्या आहाराबाबतच्या नैसर्गिकतेवर निर्बंध आणले.
आपल्याकडे उपवासासाठी साधारणता साबुदाणा खिचडी, बटाटे, रताळे, शेंगदाणे, भगर, खजूर इत्यादींचा वापर करतात. प्रत्येक अन्नपदार्थाचे पृथ्वीवर एक मूळस्थान आहे. त्या मूळस्थानाचा शोध पुरातत्वशास्त्राने (आर्किऑलॉजीने) लावलेला आहे. पुण्याच्या जगविख्यात डेक्कन कॉलेजमधील डॉ.सतीश नाईक हे त्या विषयाचे म्हणजेच पुराजीवशास्त्राचे (आर्किओबॉटनीचे) जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आहेत. कोणते अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळ पृथ्वीच्या कोणत्या भूभागावरती प्रथमता निर्माण झाले व ते जगभर कसे स्थानांतरित झाले, याचे ते अभ्यासक आहेत.
पुरावनस्पतिशास्त्र (आर्किओबॉटनी) आणि ओरिजिन ऑफ अग्रिकल्चरच्या अभ्यासानुसार आपल्या देशात उपवासासाठी वापरला जाणारा शाबुदाणा याचे मूळस्थान ब्राझील येथील आहे. तो वेगवेगळ्या मार्गाने विशेषता व्यापाऱ्यांनी तो भारतात प्रथमत: 1944 साली आणला. सुरुवातीला तो तामिळनाडूमध्ये आला. शकरकंद नावाच्या वनस्पतीच्या मुळातील गाभ्यापासून साबुदाणा तयार केला जातो. त्यामध्ये सुमारे 94 टक्के कार्बोहायड्रेट्स असतात, की जे नियमित खाल्ल्यामुळे शरीराला खूप हानिकारक असतात. यामुळे इन्सुलिनची मोठ्या प्रमाणात हानी होते, त्यामुळे अकाली शुगर होण्याची दाट शक्यता असते. आपल्याकडे एकादशीला-महाशिवरात्रीला साबुदाणा खिचडी खातात. मी स्वतः महादेव, पंढरीचा पांडुरंग, ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, म्हसोबा, तुळजा भवानी यांच्यावरती श्रद्धा ठेवणारा भाविक आहे. हे सगळे आपले प्राचीन काळातील महामानव आहेत. प्राचीन काळातील महामानव 1944 साली भारतात आलेला शाबुदाना खाणे शक्यच नाही. आपण त्यांच्या नावाने त्याचे सेवन करणे, हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे की हानीकारक आहे? याचा सर्वांनी गंभीरपणे विचार करावा. कोणाच्याही धार्मिक श्रद्धा दुखावण्याचा हेतू नाही.
आपल्याकडे उपवासासाठी मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणारे रताळे, मिरची हे अन्नपदार्थ मेक्सिकोमधून भारतात आलेले आहेत. शेंगदाणे ब्राझीलमधून भारतात आलेले आहेत. बटाटा हे पीक दक्षिण अमेरिकेतून सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात आलेले आहे. खजूर अरब राष्ट्रातून भारतात आलेले आहे. उपवासासाठी खाल्ली जाणारी केळी इंडोनेशिया-मलेशियातून भारतात आलेली आहे. द्राक्षे अरबराष्ट्रातून भारतात आलेली आहेत. ही फळे-पिके विदेशातून भारतात आलेली.आहेत, म्हणून त्याचा तिरस्कार करायचा नाही, तर ज्या देवदेवतांशी, धार्मिक श्रद्धाशी आणि आहाराशी ती जोडलेली आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. ज्वारी हे भारतातील मूळ पीक आहे. तसेच तूर, कुळीथ, काकडी, पावटा, मूग, उडीद, मोहरी, तीळ इत्यादी अन्नपदार्थ अस्सल भारतीय आहेत. आपल्याकडील लोकप्रिय ज्वारी-बाजरी प्राचीन काळात आफ्रिकेतून भारतात आलेली आहे. करडईचे मूळ तुर्कस्तानातील आहे. सर्व अन्नपदार्थ भाजीपाला, बी-बियाणे, कडधान्य यांचे मूळस्थान याची सविस्तर यादी आज उपलब्ध आहे. सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की उपवासासाठी आपल्या देशात खाल्ले जाणारे अनेक पदार्थ हे विदेशातून भारतात आलेले आहेत. देव देशी पदार्थ विदेशी, अशी आपल्या धार्मिक श्रद्धांची अवस्था आहे.
आपल्याकडे अनेक लोक कांदा-लसूण या पदार्थांना वर्ज्य मानतात. अनेक पंथात तर ते कधीच खात नाहीत. एकादशी, चातुर्मास इत्यादी काळात कांदा-लसूण निषिद्ध मानले जातात. कांदा लसूण म्हणजे तंबाकू, गुटखा, गांजा नाही. कांदा-लसूण हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून शरीर निरोगी ठेवण्यासाठी कांदा, लसूण, हळद, मिरची, लिंबू हे पदार्थ खूप उपयुक्त आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे. हे पदार्थ अँटिकॅन्सर आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अन्नपदार्थांना धर्माशी, पावित्र्याशी किंवा नैतिकतेशी जोडणे हे फार घातक आहे.
आहारावरच्या नियंत्रणातून मोठ्या समुदायावरती वर्चस्व प्रस्थापित करायचे व त्यातून राजकारण, अर्थकारण, हे यामागील षड्यंत्र आहे. आपल्याकडच्या घुगऱ्या, कोंड्याची भातोडी, सांडगे अशा अनेक पौष्टिक सकस आहाराचा त्याग करून बर्गर, पिझ्झा, मॅगी, लेज, कुरकुरे याच्या मागे धावणे, म्हणजे अनेक आजारांना निमंत्रित केल्यासारखे आहे. तसेच या माध्यमातून अविकसित व विकसनशील राष्ट्रांचे आर्थिक शोषण करण्याचा देखील पाश्चिमात्य राष्ट्रांचा हेतू आहे.
आपल्याकडे अनेक व्यक्तींच्या शरीरातील कॅल्शियम, बी, बी12, प्रोटिन्स कमी झाल्यानंतर डॉक्टर नॉनव्हेज खाण्याचा सल्ला देतात. ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही, त्यांना मेडिसिनस् देतात, की जी प्राणीजन्य असतात. आता तर कोरोनापासून वाचायचे असेल आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर व्यायामाबरोबरच आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मानव हा एक प्राणी आहे, त्याच्यासाठी शाकाहार जसा महत्त्वाचा आहे तसाच मांसाहार देखील महत्त्वाचा आहे. जेथे जे उपलब्ध आहे ते खाणे, हा निसर्गधर्म आहे. तुम्ही टुंड्रा प्रदेशात जाणार आणि भगर, साबुदाणा, उकडीचे मोदक, अळूचे फदफद मागणार, ते तेथे मिळणार नाही आणि मिळाले तरी ते शरीरासाठी त्या वातावरणात किती उपयुक्त आहेत? हे अभ्यासाअंती स्पष्ट होते. बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीने विचार केला तर मानव प्राणी हा केवळ मांसाहारी, केवळ शाकाहारी नसून तो मिश्राहारी आहे. गाय ही शाकाहारी आहे, कारण तिची पचनसंस्था त्यासाठी अनुकूल आहे, वाघ हा मांसाहारी आहे, कारण त्याची पचनसंस्था त्यासाठी अनुकूल आहे, परंतु मानवप्राण्याची पचनसंस्था शाकाहारी आणि मांसाहारी अन्न पचवणारी अशी मिश्र आहे, त्यामुळे निसर्गतः मानवप्राणी मिश्राहारी आहे.
– डॉ. श्रीमंत कोकाटे (सुप्रसिद्ध इतिहास संशोधक)