कोरेगाव भीमा ही दंतकथा?
महेंद्र लंकेश्वर यांचा खणखणीत लेख
संजय क्षीरसागर, संजय सोनवणी व इतर तत्सम अभ्यासक कोरेगाव भीमाच्या लढाईला मिथ म्हणतात. मिथ जर नीट सोडवली तर ती मानगुटीवर बसतात हे त्यांना माहीत आहे की नाही माहित नाही. यासाठीच इतिहासाचा अभ्यास वारंवार करावा लागतो असे एंगल्स बजावतो.
जर हे मिथ असते, दंतकथा असती तर त्याचा सर्वात मोठा भौतिक पुरावा हा विजयस्तंभ नसता. मोन्युमेंटस् फक्त विजयाचेच बनवले जातात. ज्यांच्या साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नाही असे म्हटले गेलेय, त्यांनी हा स्तंभ उभारलाय अन् सन्मानाने त्यावर महार वीरांची नावे कोरलीत.
तरीही हे मिथच?
स्तंभावर कोरलेले आहे, “One of the Triumphs of the British Army of the Earth…”
अर्थात
“ब्रिटिश आर्मीचा पृथ्वीवरील एक विजय”
पेशव्यांनी १८०२ आली ब्रिटीशांबरोबर वसईला तह केला तेव्हाच दुसर्या बाजूने सरसेनानी यशवंतराव होळकरांनी पेशव्यांना ताणून मारले होते. सुरूवात यशवंतरावांनी केली आणि १८१८ ला पेशवाईचा जरीपटका उतरला!
शोषितांच्या बाजूने कधीही इतिहास लिहिला गेला नाही, ब्रिटिश इम्पार्शियल होते म्हणून त्यांनी महार व तत्सम अस्पृश्यांचा इतिहास लिहिला.
मी अजूनही सांगतो सदर गोविंद गोपाळ ढगो मेघो ज्या संप्रदायाचे पालन करत होते तो शाक्ताशी संबंधित होता.
ढगो मेघो या नावातच स्पष्ट आहे की त्यांना निसर्गपूजक जरी म्हटलं गेलं असलं तरी त्यांना वातचक्राचं, ऋतूचक्र व पर्जन्यमानाचा अभ्यास होता. त्यातील एक संप्रदाय वातरशनी म्हणजे नग्न असावा असेही काही संदर्भ सांगतात. ते त्या विषयातले एक्स्पर्ट असल्यानेच त्यांनी सन्मान कमावला होता. आता आतापर्यंत महार जातींमध्ये ढगो मेघोंना पाण्याचे देव म्हणून गाणी गायली गेली आहेत.
राजे छ. राजाराम महाराजांनी जी जमीन दान केली ती फार उशिरा नंतर केली; पण तत्पूर्वीच संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाची सेवा ढगो मेघो पाबळच्या रानात राहून करतात हे सनदीत लिहिले आहे. याचा अर्थ आधी सेवा होत होती व जमीन नंतर दान केली.
कुणी जमीन नावे करावी म्हणून ढगो मेघोंनी सेवा, दिवाबत्ती केलीय असे नव्हे; तर त्यापूर्वीच ते मनापासून ते सेवा करीत होते..
आता ते संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाची सेवा का करत होते?
जरी समजा त्यांनी संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार नाही केला असे एकवेळ मान्य करूयात. पण मग ते सेवा का करत होते. तर याचं एकमेव कारण संभाजी महाराज व ढगो मेघो हे दोघेही शाक्त होते. हेच कनेक्शन आहे हे स्पष्ट होतं.
संगमेश्वरास संभाजी महाराजांना कैद जेरबंद केल्यानंतर तळकोकणातून वर भीमा तीरावर आणेपर्यंत तब्बल ५२ दिवसांचा (३०० किमी अंतर) कालावधी लोटला आहे. तरीही कुण्या मराठा रियासतीच्या सरदाराने महाराजांना त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा वा तहकरार करण्याचा का प्रयत्न केला नाही? हा प्रश्न इतिहासाला विचारला पाहिजे.
शोषितांच्या बाजूने कधीही इतिहास लिहिला गेला नाही, ब्रिटिश इम्पार्शियल होते म्हणून त्यांनी महार व तत्सम अस्पृश्यांचा इतिहास लिहिला.
दुसरा प्रश्न असा उभा राहतो की, याच परिसरात ही देहदंडाची शिक्षा का दिली गेली?
“महाराष्ट्र भूमीचा सर्वात धुरंदर छत्रपती संभाजीला भीमेच्या तीरावर कोल्ह्याकुत्र्यासाठी लचके तोडायला सोडून दिले” हे य. न. केळकरांनी लिहिलेले तुम्हाला सहज पचू शकते. व ठामपणे छत्रपती संभाजींची उत्तरक्रिया झालीच नाही असेही म्हणता येते.
पण ती उत्तरक्रिया पार पडली किंवा नाही याचे थेट उत्तर इतिहास देत नसला तरी समाधी ही उत्तरक्रिया /अंत्यसंस्कार झाल्यानंतरच बांधता येते एवढं साधं तुम्हाला समजून घ्यायचं नसेल तर याचं एकमेव कारण नेणीवेतला जातीय द्वेष तसे करू देत नाही आणि ब्राह्मणी कल्चरल हेजेमनीचे हे पायपूस वाहक आहेत, हे स्पष्ट आहे.
– महेंद्र लंकेश्वर
हेही वाचा