‘कैवार’ कवितासंग्रहातील काव्य जाणीवा
प्रा. सखाराम बाबाराव कदम यांचा विशेष लेख
नुकताच शिवाजी नारायणराव शिंदे यांचा शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा जि. सोलापूर कडून प्रकाशित ‘कैवार’ हा पहिला काव्यसंग्रह वाचण्यात आला. यापूर्वी सहाध्यायी म्हणून सोबत शिकत असताना त्यांच्यातील मित्र व माणूसपणाचा परिचय होताच. भाषा व साहित्य संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यापीठ विद्यार्थी संसद सचिव म्हणून त्यांच्या अंगभूत नेतृत्व गुणांची चूनुक दिसली. ही दिवसेंदिवस विकसित होत जाणारी पाऊलवाट आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव पदापर्यंत येत मळवाट बनली आहे.
सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, अभावग्रस्त जगण्यामुळे सतत विवंचना सहन करत वाढत जाणाऱ्या, शिक्षणासाठी सतत धडपडणार्या संवेदनशील मनाची ही अस्वस्थ तगमग आहे. शेती व शेतकऱ्यांच्या जगण्याची दिवसेंदिवस होत जाणारी परवड, कधी अस्मानी तर कधी सुलतानी च्या कचाट्यात सापडून हवालदिल झालेला शेतकरी व कष्टकरी यांच्या व्यथा वेदना या काव्यसंग्रहातून ठळक होताना दिसतात. कवीचा हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे नवखेपणाच्या खुणा आपणास पानोपानी दिसून येतात. हे नवखेपण हळूहळू विरत जाऊन अधिक प्रगल्भ,अधिक समंजस काव्य जाणीव घेऊन येणारी सहजस्फूर्त कविता पुढील काळात त्यांच्या कडून लिहिली जावी यासाठी सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा!
१९८० नंतर गाव खेड्यात जन्मलेल्या व २००० नंतर लिहू लागलेल्या शिंदे सारख्या शेतकरी पुत्रांच्या भावभावना या कवितेतून स्फुट रूपाने व्यक्त झाल्या आहेत. आज जरी नोकरीच्या निमित्ताने गाव सुटले, तरी अजूनही आई वडील व भाऊ भावजय त्यांच्या लेकरासह अजूनही गावाकडेच असल्यामुळे या नव तरुणांच्या संवेदनशील मनाचे दुभंगलेपण या कविता नोंदवत असतानाच कवी मनाची मूळ हिरवी ठेवणारी तरीही सतत विकास पावणारी जाणीवजागृती या कवितांमधून येताना दिसते. ‘कैवार’ हा काव्यसंग्रह वाचून माझ्या आकलनानुसार त्यातील काव्य जाणीव खालील प्रमाणे नोंदवता येईल.
१) ‘कैवार’ मधील बाप:-
प्रस्तुत संग्रहातील बाप हा सर्व सामान्य शेतकरी असून तो मुलांच्या शिक्षणासाठी प्रसंगी सावकाराकडून कर्ज घेणारा, आपल्या लेकराबाळांसाठी मान अपमान गिळून वेळप्रसंगी उपासमार सहन करणारा, गरजू माणसांच्या मदतीला वेळेवर धावून जाणारा हा बापमाणूस पहिल्याच कवितेत आपणास भेटतो.
ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता
शेतामध्ये राब राब राबणारा
काळे आईची सेवा इमानेइतबारे करणारा
बाप पाहिला मी! (पृ.१९)
असा हा संघर्षशील बाप वेळोवेळा जगाचा पोशिंदा असल्याचा सार्थ अभिमान असून तो सर्वसामान्य पित्याप्रमाणे शेतीत बी भरणा मुळे अगोदरच कंगाल, पावसाच्या लहरीपणामुळे हतबल झाला आहे. सावकाराचे वाढत जाणारे कर्ज, शासनाचे भारनियमनाचे धोरण, घरी उपवर झालेल्या पोरीच्या लग्नाची चिंता, मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये ही विवंचना या सगळ्या घुसमटीतून अधिकच अगतिक होत जातो. पोरीला बघायला आलेले पाहुणे अंड्याची मागणी करतात तेव्हा हुंडा द्यायला असमर्थ ठरून तो मरणाला जवळ करतो असा आशय ‘पोरीच लगिन’ (पृ.२५) या कवितेत चित्रित होतो.
सगळे अनीतिमान जगत असताना कष्टकरी बापाचे नीतिमान असणे कमीपणाचे ठरताना पाहून ‘माझा कष्टकरी बाप’ (पृ.२९) या कवितेत..
बाबा, तुम्ही म्हणताय इमानदारीने जगावं
परंतु इमानदार इथं क्षणाक्षणाला मरतो आहे
बेईमान मात्र रोज मजेत
आपला खिसा भरतो आहे. (पृ.२९)
असं सांगून आपल्या बापानही जनरीतीला धरून थोडसं बदलावं ही अपेक्षा करतो. याच कवितेत ‘खऱ्याचं खोटं आणि लबाडा चा तोंड मोठं’या म्हणीचा समर्पक वापर करताना कवी निती हीन समाजातील नीतिमान बापाला थोडीशी तात्विक तडजोड करावी असे सुचवतो. शासनाच्या कर्जमाफी सारख्या गाजराला भूलून न जाता, कवी नाकर्त्या सरकारला पदावरून हटवून शासकीय पातळीवरील शेतकऱ्यां संबंधी धोरणे बदलण्याची मनीषा बोलून जातो.
२)’कैवार’मधील आई:-
या काव्यसंग्रहात अनेक स्त्री व्यक्तिरेखांची चित्रणे आली आहेत. आई-आजी गावातील घराशेजारच्या इतर स्त्रिया इत्यादी. कविमनाला स्मरते ती आई शेतात राब राब राबणारी, सगळी दुःख मूकपणे सोसणारी, सगळ्यांचे हवे-नको ते बघणारी, घरातील आजारी माणसाची सेवा सुश्रुषा करणारी, मुलाबाळांच्या कल्याणासाठी चालणारी तिची धडपड, दीनदलितांना सोबत घेऊन त्यांचा आधार बनू पाहणारी ही माऊली गाव खेड्यातील माणुसकीचे संस्कार रुजवू पाहते. हे पाहून कवी ‘माझी आई’ (पृ.३१) या कवितेत म्हणतो
वात्सल्याचे भांडार| मनाने उदार|
प्रेमळ आहे फार| आई माझी|
हीच आई कविता कुटुंबाचा प्रमुख आधार आहे. ती लेकरां बाळामध्ये शिकण्याची जिद्द निर्माण करते. लेकीबाळीच्या सुखदुःखात वाटेकरी होत समंजस शहाणपण सांगत राहते. म्हणून कवीला ती भेटतेच अशी…
आजीच्या बटव्यातील संस्कारांचा
अनमोल ठेवा जतन करूया
मातेच्या अपार कष्टाचे मोल जाणूया
जन्मदात्रीच्या पायी सदा नतमस्तक होऊया (पृ.४४)
‘कैवार’मधील पृष्ठ क्रमांक ५२ वर आलेली ‘ती कुठे काय करते’ ही कविता तर स्त्रीच्या बालपणापासून अख्ख्या आयुष्याचा पट नजरेसमोर उभा करते. वडिलांकडे लाडात वाढलेली अल्लड मुलगी सासरची पत व प्रतिष्ठा इमाने-इतबारे जपताना येथे दिसते. वंशाचा दिवा जन्माला येण्यासाठी असह्य प्रसव वेदना सहन करते. घरातील लहान लेकरांचे आनंदाने पालन पोषण करते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती अखंड राबत असते. स्वयंपाक, धुणी-भांडी, सडा-सारवण ही तीच मक्तेदारी असते.
कुटुंबाच्या आनंदापुढे तिला स्वतःच्या कष्टाची
श्रमाची आणि आरोग्याची कधीच पर्वा नसते…
ती स्वतःच्या इच्छाआकांक्षांना मुरड घालते
इतरांच्या सुखातच आपले सुख मानते (पृ.५३)
एवढे करूनही तिला घरातच जेव्हा शाब्दिक डागण्या दिल्या जातात. तेव्हा दुखावलेली ती माहेरच्या प्रतिष्ठेपायी स्वतःचा कोंडमारा सहन करते. कधी पतीकडून तर कधी मुला-बाळांना कडून होणारा अपेक्षाभंग तिला बाईपणाच्या अटळ दुःखाची गाथाच शिकवत असतो.
ज्या लेकरांना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची थोडीही जाण ठेवावीशी वाटत नाही अशा ‘कृतघ्न मुलां’चा समाचार सुद्धा कवी घेताना दिसतो. आई बाबांना वृद्धावस्थेत सांभाळण्याचे कर्तव्य दूर सारून परदेशी परागन्दा होणाऱ्या अशा कृतघ्न मुलांना कवी चार खडे बोल सुनावतो.
ज्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं
त्यांनाच एक दिवस त्यांच्या मुलांनी वाऱ्यावर सोडून दिलं
शेजार्यांनी जेव्हा वडीलाच्या मृत्यूविषयी सांगितलं
त्या दोघांनीही कामांमध्ये व्यस्त असल्याचं कळवलं (पृ.५५)
नातेसंबंधातील ही परवड कवीच्या नजरेतून सुटत नाही. एवढा स्वार्थी पण नात्यांमध्ये आल्यामुळे कुटुंब संस्थेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात असल्याचे दुःख तो बोलून दाखवतो.
३)’कैवार’मधील प्रेमजाणीव:-
माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रेमाची आस असतेच. ते मातृप्रेम असो मित्र प्रेम असो वा तारुण्यातील नवथर प्रीती. नायक-नायिकेच्या तारुण्यातील प्रेमाने मोहरून जाणे, प्रेमभावनेचा आनंद घेत मनसोक्त जगणे प्रत्येकाला हवेसे वाटते. कवीच्या नजरेतून म्हणूनच हा विषय देखील सुटत नाही.
प्रेम म्हणजे भेटण्याची आस
प्रेम म्हणजे दोघही एकमेकांना खास
प्रेम म्हणजे भेटण्यासाठी आतुर होण
एकमेकासाठी एकमेकात रीत होन (पृष्ठ ६४)
समर्पित प्रेमाची समंजस कबुली अशाप्रकारे कवी देऊन जातो. यामुळे प्रेमातील जीव लावण, रुसणं फुगणं, भांडण… तरीही समजून घेत घेत शेवटी एकरूप होणं ते स्पष्ट करतात. इथल्या नायकाला त्याची प्रेयसी भेटते तीच मुळात ‘आठवणीच्या पुस्तकांमध्ये'(पृष्ठ ६५) तिचे लोभस रूप, सोज्वळ स्वभाव, तिचे हसणे कवी मनाला भुरळ पाडते. तिचं काही काळ न दिसणं कवि मनाला हुरहूर लावणार… तसंच ती दिसल्यावर स्वतःला सुद्धा विसरून जाणारा नायक येथे बघायला मिळतो.
जागवशील का त्या क्षणांना?
मनी दाटलेल्या भावनांना
येशील का तू? भेटशील का?
जिथे भेटलो मी अन् तू (पृष्ठ ६६)
अशा या प्राक्तनाची अटळ गती स्वीकारलेल्या प्रेयसीला कवी म्हणतो मागे वळून बघ जरा| मग तुला कळून जाईल| कोणीतरी आतुरतेने| आपलीही वाट पाहिल|अशा या सखीला प्रश्न विचारणारा कवी सांग ना सखे असे म्हणत आपल्या सखी समोर काही सवाल उभे करतो.
प्रतिसाद द्यायचाच नव्हता तर
साद घातलीस च कशाला? (पृष्ठ ६६)
इथल्या प्रियकराला दुनियादारी माहिती असल्यामुळे आपल्या दबलेल्या अव्यक्त प्रेमभावना तो समंजसपणे मान्य करतो. तिचे दूर जाणे स्वीकारतो. मनातलं न सांगता येणार गुपित विरहाच्या अग्नीत स्वाहा होताना ची जाणीव ओढ पृष्ठ ६७ या कवितेतून येताना दिसते.
‘अन मला वाटतय ‘ (पृष्ठ ६९) कवितेत या अलवार प्रेमभावनेचा नितांत सुंदर रूप दिसून येते. तिच्या ओठावरील हसू टिपून घेतानाच तिच्या हृदयात घर करण्याची सुप्त इच्छा, तिच्यासोबत रानावनात मनसोक्त दाहीदिशा फिरण्याच स्वातंत्र्य त्याला हवय.
फुलपाखरासारखं पानाफुलावर
स्वच्छंदी वावरावं
भ्रमरा प्रमाणे कमलपुष्पात
स्वतःला गुंतवून घ्यावं
अन मला वाटतय
तुझ्या हृदयात घर करून रहावं (पृष्ठ ६९)
अशा काही प्रमुख काव्यजाणीवेशिवाय प्रस्तुत काव्यसंग्रहात कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरात आलेल्या महापूराचे संदर्भ देणार्या कविता, वीर जवानाच्या हौतात्म्यामुळे अस्वस्थ पत्नीची तगमग मांडणारी कविता, करुणा महामारी च्या काळातील जनमानसातील भीतीची भावना व्यक्त करणाऱ्या रचना, स्त्री-भ्रूण हत्ती विषयी हळ हळणारे कविमन, आज-काल हरवत चाललेली माणुसकी आदिने विषयी काही स्फुट कविता या काव्यसंग्रहात आहेत.
संकटाला घाबरून डगमगून जाऊ नकोस
वादळाला परतवुन लाव… मैदान सोडू नकोस
हे विरोधकांनाही कळू दे की…
बोलणार्यांना बोलू दे की…जळणा-यांना जळू दे की… (पृष्ठ ४१)
अशा काही चित्ताकर्षक रचना कवी करताना दिसतो. तरीही या काव्यसंग्रहाच्या शेवटी आलेली व कवि पणाचा शिक्का शिवाजी शिंदे यांच्या माथ्यावर उमटवणारी कवी’ (पृष्ठ ७०) या कवितेत कवीला खरा सूर सापडल्याचे दिसते. ती अशी
प्रेमभंगाच्या जखमांना
सांधत जातो कवी
प्रेमवीरांना एकमेकात
बांधत जातो कवी
माणसांना माणसाशी
जोडत जातो कवी
कालबाह्य प्रथा परंपरा
मोडत जातो कवी (पृष्ठ ७०).
प्रस्तुत काव्यसंग्रहाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर च्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश व ‘शेतकऱ्याच्या व्यथेचा ‘कैवार’ घेणारी कविता’ अशी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणारे अभ्यासू समीक्षक डॉ. राजेंद्र दास यांची सविस्तर प्रस्तावना ही जमेची बाजू ठरते.
काव्यसंग्रह वाचून झाल्यावर कवी शिवाजी शिंदे यांनी अधिक लिहिण्याचा सोस टाळायला हवा. कवितेची अंतर्गत लय मोडतोड न करता सहजस्फूर्त असावी असा आशावाद आपण करूया. प्रस्तुत दोष टाळून जर शिवाजी शिंदे यापुढेही लिहित राहतील तर त्यांच्या कवितेचा ‘कैवार’ घेण्यासाठी आम्हाला पाठराखण करताना अधिक ‘हुरूप’ येईल असे माझे प्रांजळ मत आहे.
एकूण ७० पृष्ठाच्या ह्या काव्यसंग्रहाची बांधणी मजबूत असून मलपृष्ठावर कवी व चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांचा समर्पक ब्लर्ब लाभल्यामुळे काव्यसंग्रह अधिकच नजरेत भरतो.