कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
सोमवारपासून परीक्षांना होतोय प्रारंभ
सोलापूर/टीम थिंक टँक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 5 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना महामारी संकटामुळे विद्यार्थ्यांना घरी राहूनच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची सोय करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन केंद्राचीदेखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑफलाइन केंद्रावर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी कोरोना संसर्गाबद्दल सर्व उपाययोजना फॉलो करून परीक्षा द्यावी. मनात कोणतीही भीती न बाळगता अभ्यास करून बिनधास्तपणे विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे. परीक्षा संदर्भात काही अडचणी आल्यास विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करावे, असेही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी म्हटले आहे.
NO Exam आले की, घाबरून जाऊ नका
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 5 ऑक्टोबर पासून सुरु होत आहेत. वेळापत्रकानुसार होत असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेवेळी ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनला NO Exam आले की, अशा परीक्षार्थींनी घाबरून जाऊ नये. त्यांची परीक्षा 25 ऑक्टोबरनंतर घेण्यात येईल. त्याची सर्व नोंद विद्यापीठाच्या परीक्षा ‘वार रूम’मध्ये होत असते. हेल्पलाइन नंबरशी संपर्क साधून विद्यार्थ्यांनी आपल्या शंकेचे निरसन करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक सीए श्रेणिक शहा यांनी केले आहे.
– स्त्रोत : राहूल वंजारी (जनसंपर्क अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ)
5 ऑक्टोबर 2020 पासून फार्मसीच्या सर्व सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाकडून घेतली जाणार आहे. वेळापत्रकानुसार फार्मसीच्या सर्व सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्यानुसार फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.