कार्यकर्त्यांनो माघारी फिरा, आबासाहेब बरे होत आहेत : जयंत पाटील
सोलापूर : भाई गणपतराव देशमुख यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत आहे. ते पूर्णपणे बरे होतील अशी खात्री आहे. कोणीही सोलापूरकडे येवू नये. माघारी फिरावे , असे आवाहन शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केले आहे. भाई जयंत पाटील यांनी आज बुधवारी दुपारी अश्विनी रुग्णालयात जाऊन माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या तब्येतीची विचारपूस केले . त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . जयंत पाटील पुढे म्हणाले की , आज मी गणपतराव देशमुख यांची भेट घेण्यासाठी आलो . मी समाधानाने रुग्णालयाच्या बाहेर पडलेलो आहे . आबासाहेबांच्या पायांची , हातांची हालचाल व्यवस्थित होत आहे . श्वासाची क्रियाही व्यवस्थित सुरु आहे . उपचारांना साथ देत आहेत . महाराष्ट्रातल्या तमाम चाहत्यांच्या अाशीर्वादाने आबासाहेब बरे होत आहेत. त्यांनी आयुष्यभरात जे पुण्य कमावले आहे त्याचा हा परिणाम आहे . ९५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी गरिबांसाठी काम केले त्यामुळे आबासाहेबांना पुन्हा आयुष्य मिळाले आहे . कोणीही चुकीचे मेसेज पसरवू नये . कार्यकर्त्यांनो माघारी फिरा , आबासाहेब बरे होत आहेत. जे कार्यकर्ते सोलापूरला येत आहेत . त्यांना माझे सांगणे आहे की त्यांनी माघारी फिरावे . आबासाहेब लवकरच बरे होतील अशी खात्री आहे.
यावेळी जयंत पाटील यांच्यासमवेत शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील , गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख, पोपटराव देशमुख , नातू डॉ . अनिकेत देशमुख , डॉ . बाबासाहेब देशमुख , जि.प. सदस्य सचिन देशमुख , बाबा कारंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.