काँग्रेसने अण्णासाहेब पाटील महामंडळाचा फायदा मराठा समाजापर्यंत पोहोचू दिला नाही : नरेंद्र पाटील
अण्णासाहेब पाटलांच्या स्मारकाच्या निर्णयाबाबत सोलापूर महापालिकेचे मानले आभार
सोलापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 1982 साली महाराष्ट्रातील पहिले बलिदान देणारे माथाडी कामगारांचे नेते कै. आण्णासाहेब पाटील यांचे सोलापुरात स्मारक उभारण्यात येणार आहे. सोलापूरकरांनी कै. आण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाच्यारुपाने त्यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल मी सोलापूर महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे मनपूर्वक आभार मानतो, अशी प्रतिक्रिया कै. आण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली.
सोलापूर महापालिकेने हा ठराव एकमताने मंजूर केल्याबद्दल पाटील यांनी महापौर, मनपा आयुक्त, सर्वपक्षीय सभागृह नेते, सर्वपक्षीय नगरसेवकांचे आभार मानले. यावेळी त्यांनी कृतज्ञता व्यक्त आभाराचे पत्रही दिले. त्यानंतर महापालिका पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयावर आपली परखड मते व्यक्त केली.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव आणि किरण पवार यांनी सोलापूर महापालिकेकडे 19 जून 2021 रोजी कै. आण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाची मागणी केली होती. त्यानंतर सोलापूर महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका मंदाकिनी पवार, गुरुशांत धुत्तरगांवकर, कॉंग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले, भाजपचे किरण देशमुख, प्रभाकर जामगुंडे यांनी हा प्रस्ताव मुख्य सभेत मांडला. त्यानंतर शुक्रवार दि. 24 सप्टेंबर रोजी झालेल्या मुख्य सभेत या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.
- हेही वाचा : वृक्षारोपनातून सांगोला तालुक्यात हरित क्रांती शक्य!
- तलवारधारी डॅशिंग पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते
- अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा हाबडा
विशेष म्हणजे 25 सप्टेंबर रोजी कै. आण्णासाहेब पाटील यांची 88 वी जयंती होती. त्याच्या पुर्वसंध्येला हा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेत मंजूर झाल्याने पाटील कुटुंबीय तसेच त्यांच्या समर्थकांना अतीव आनंद झाला. कै. आण्णासाहेब पाटील यांचे हे स्मारक निराळे वस्ती येथील माटे बगीचा येथे उभारण्यात येणार आहे.
हा प्रस्ताव एकमुखाने मंजूर केला त्याबद्दल भाजपचे गटनेते शिवानंद पाटील, शिवसेनेचे गटनेते आणि विरोधीपक्षनेते अमोल बापू शिंदे, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते किसन जाधव, एमआयएमचे गटनेते रियाज खरादी, वंचितचे गटनेते आनंद चंदनशिवे यांचेही आभार मानले.
महामंडळाचा फायदा मराठा समाजापर्यंत पोहोचू दिला नाही : नरेंद्र पाटील
महाराष्ट्रात 1995 साली भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. त्यावेळीही महामंडळाच्या माध्यमातून मराठा बांधवांना फारशी मदत झाली नाही. त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंत सत्तेत असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात हे खाते कॉंग्रेसकडे गेले. मात्र महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाने कै. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा फायदा मराठा बांधवांपर्यंत पोहोचू दिला नाही. आपल्याला जर खातरजमा करायची असेल तर माहिती अधिकारात हि माहिती मागवावी असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. 2014 साली फडणवीस सरकारने महामंडळाला भरीव निधी देवून मराठा बांधवांना मोठी मदत केली. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर महामंडळाला पुन्हा निधीची कमतरता निर्माण झाल्याची खंतही नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली.
राजेंद्र कोंढरे हेच मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष : नरेंद्र पाटील
मराठा महासंघाचे मुंबईच्या गिरगावमधील नवलकर लेनमध्ये ज्या वास्तूची पुनर्बांधणी सुरु आहे. त्याला अखिल भारतीय मराठा महासंघातील बहुतांश पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. मात्र शशिकांत पवार आणि दिलीप जगताप यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र कोंढरे यांच्याबाबत जे काही निर्णय जाहीर केले त्यात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे हेच असतील अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केली.
सोलापुरातील आक्रोश मोर्चानंतर 102 व्या घटनादुरुस्तीचा मार्ग मोकळा : नरेंद्र पाटील
सोलापुरातील 4 जुलै रोजीच्या मराठा आक्रोश मोर्चानंतर मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी 5 ऑगस्ट रोजी आपल्या शिष्टमंडळासह केंद्रीय कायदामंत्री किरण रिजिजू यांची भेट घेऊन 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करण्याची मागणी केली. यावेळी सोलापूर भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम जाधव, किरण पवार यावेळी शिष्टमंडळात होते. दरम्यान या निवेदनाची दखल घेऊन 5 ऑगस्ट रोजीच्या केंद्रीय कॅबिनेट मिटींगमध्ये 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करण्यात निर्णय घेतला.
——————–