एस.टी. कर्मचार्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचविणार
माजी आम. दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे अभिवचन
सांगोला : तालुका प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील तमाम एसटी कर्मचारी बांधव एस.टी. कर्मचाऱ्यांचा समावेश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये करावा व एस.टी.च्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती मिळाव्यात म्हणून वेळोवेळी आंदोलन संप या सारखे शस्त्र उपसत आहेत. दिवाळी सारखा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सांगोला आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दि. 29 रोजी आपल्या मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि भावना आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांच्या पर्यंत पोहोचू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करून राज्य सरकारच्या या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सेवा सवलती एसटी कर्मचाऱ्यांना मिळाव्या म्हणून शुक्रवार, दि 29 रोजी सांगोला आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता यावेळी आंदोलन स्थळी उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील सांगोला बसस्थानक येथे उपस्थित राहिले होते यावेळी मा. नगराध्यक्ष अनिल खडतरे, नगरपालिकेचे गटनेते सचिन लोखंडे, प्रशांत साळुंखे आदींसह एसटी कर्मचारी उपस्थित होते.
सर्वाधिक वाचलेली बातमी : ‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’
यावेळी एसटी कर्मचारी बांधवांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचून दाखवत देशाचे नेते शरदचंद्रजी पवार व संवेदनशील स्वभावाचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनेचा आदर करून आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एसटी कर्मचारी बांधवांच्या सुरू असलेल्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी भावना व्यक्त केली.
यावर आपली व्यथा आपली भावना जशीच्या तशी लेखी पत्राद्वारे शरदचंद्रजी पवार, उद्धवजी ठाकरे, अजितदादा पवार व राज्याचे परिवहन मंत्री अनिलजी परब यांच्यासमोर मांडून सर्व एसटी कर्मचारी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे आश्वासन शेवटी दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी दिले.