एसटीचे 14 कर्मचारी निलंबित

सरकारचे कारवाईचे हत्यार, चंद्रपुरातील घटना

Spread the love

मुंबई : थिंक टँक न्यूज नेटवर्क
सरकारमध्ये एसटीचे विलिनीकरण व अन्य मागण्यांसाठी राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सरकारने कारवाई सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एसटीचे 14 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. सरकारच्या या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे.

विविध मागण्यांसाठी बस सेवा पूर्णपणे बंद करून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील बहुतांश बसस्थानके ठप्प झाली आहेत. ऐन दिवाळीत हे आंदोलन सुरू ठेवण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याला न जुमानता हे आंदोलन सुरू ठेवण्यात आले. आंदोलक नमत नसल्याचे पाहून सरकारने कारवाईचे अस्त्र उगारले आहे. चंद्रपूर आगार, वर्कशॉ आदी ठिकाणच्या 14 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त News 18 Network ने दिले आहे.

संपावर कोणताही तोडगा नाही, आंदोलक ठाम
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची व्याप्ती दिवसागणिक वाढतच आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधीकच तीव्र झाला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळित झाले आहे. दिवाळी सुट्ट्यांमुळे परगावी गेलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. एसटी बसेस बंद असल्याची संधी साधून खासगी प्रवासी वाहनधारक अव्वाच्या सव्वा दर करून प्रवाशांची पिळवणूक करीत असल्याचे दिसत आहे.

आरटीओने शहरी भागात भरारी पथके तैनात केली असली तरी ग्रामीण भागात मात्र प्रवाशांची पिळवणूक सुरू आहे. विविध शहरातून दररोज ट्रॅव्हल्सद्वारे प्रवासी वाहतूक होते. यातून हजारो प्रवासी प्रवास करतात. सर्वाधिक गाड्या पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहरांच्या मार्गावर धावतात.

खेड्यापाड्यात जनजीवन खोळंबले
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सोलापूर विभागातील नऊ आगारांतून एकही एसटी बस सुटली नाही. सांगोला, पंढरपूर, करमाळा, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा या तालुक्यांसह इतरही ठिकाणी बस सेवा पूर्णपणे बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे खासगी वाहनांनी आपले गाव गाठण्यासाठी प्रवासी धडपडत होते. मात्र खासगी वाहने तिप्पट तिकीट दर आकारत असल्याने अनेकांनी बसस्थानकातच बसणे पसंत केले.

वडाप चालकांची मनमानी
बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने वडाप चालकांनी मनमानी सुरू केली आहे. दुप्पट दर देवूनही वाहनात प्रवाशांना बसण्यास जागा मिळणे दुरापास्त आहे. ट्रॅव्हल्स चालकांनी केलेली भाडेवाढ तब्बल तीनपट आहे. जादा तिकीट दर घेणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आरटीओकडून दोन भरारी पथकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतले जात असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. प्रवासी असाह्य झाले आहेत.याचा गैरफायदा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी उठविल्याचे दिसून येते. करोना काळात झालेला तोटा भरून काढण्याची नामी संधी म्हणूनच याकडे अनेक खासगी वाहतूकदार पहात आहेत. नोकरीच्या गावी परतण्याची प्रवाशांची आगतिकता आणि नाइलाज लक्षात घेता त्यांनी अचानक अघोषित भाडेवाढ केली आहे. प्रवाशांची परिस्थिती पाहून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे.

संप सुरूच
परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. संप केव्हा मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरित पाहता एसटी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. एसटी बस बंद असल्याने नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. वाहक-चालक आगार परिसरात धरणे-ठिय्या देत आहेत तर सुट्टीहून परतण्यासाठी प्रवाशी बसस्थानकात ताटकळत उभे आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका