एकिकडे पेटलेल्या चिता, दुसरीकडे विजयाचे ढोल
पत्रकार निखिल वागळे यांंचा दणदणीत लेख
गेल्या चाळीस वर्षाच्या पत्रकारितेत अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटं मी पहिली. पण महामारीचा असा जीवघेणा अनुभव घेतला नव्हता. आत्ममग्न, अकार्यक्षम नेतृत्व आणि असहाय्य समाज यांचं हे रोजचं दर्शन आता नकोसं झालं आहे. २०२० साली तथाकथित महाशक्ती होणार होता हा देश! करोनाच्या विषाणूंनी या दाव्याचा दंभस्फोट केला आहे.
आज निवडणूक निकालांत किती जणांचं लक्ष लागेल हे सांगता येत नाही. काही चॅनल्सनी निकालाचे दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले आहेत. खरं तर ही निवडणूक पुढे ढकलायली हवी होती. पण ते न करण्याचा ऐतिहासिक मुर्दाडपणा निवडणूक आयोगाने दाखवला. त्यात सत्ताधारी आणि विरोधक अतिउत्साहाने सामिल झाले. डावे, काँग्रेस यांनी या प्रचारात भाग न घेण्याचा निर्णय एका विशिष्ठ टप्प्यानंतर घेतला, पण तोवर करोना अगदी आतपर्यंत घुसला होता. मद्रास हायकोर्टाने म्हटल्याप्रमाणे निवडणूक आयोगावरच मनुष्यहत्येचा गुन्हा लावला पाहीजे.
आजच्या निकालात बंगालचा निकाल सगळ्यात महत्वाचा आहे. इतर राज्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागतील. पण बंगाल हे मोदी-शहांचं खरं लक्ष्य आहे. भाजपच्या अवाढव्य निवडणूक यंत्रणेची सगळी ताकद त्यांनी पणाला लावली होती. एवढं करुन ममता बॅनर्जी जिंकल्या तर या दोघांना तो मोठा धक्का बसेल. पण ते तो दाखवणार नाहीत. भाजपच्या जागा कशा वाढल्या हे सांगण्याचा ते प्रयत्न करतील. २०२४ ची त्यांची तयारी सुरू झाली असेल.
विरोधक हे आव्हान स्विकारु शकतील का, हा कळीचा प्रश्न आहे. करोनाच्या या थैमानाच्या पार्श्वभूमीवर २०२४ च्या निवडणूकीत मोदींचा पराभव होईल का, याची चर्चा आजपासून रोज होणार आहे. मोदींवर आज लोकांचा राग आहे, पण विरोधी पक्षावर त्यांचा विश्वास आहे असा त्याचा अर्थ नाही. सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधकांनीही चांगल्या प्रशासनाकडे, लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच केलं आहे. बंगाल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. मोदी-शहांचा पराभव करायचा असेल तर ३८% जनता आज त्यांच्या पाठीशी का आहे याचा विचार करावा लागेल. भाजप आता फक्त शेटजी-भटजींचा पक्ष राहिलेला नाही. समाजातल्या प्रत्येक स्तरात तो घुसला आहे. आपल्याबरोबर फॅसिझमचं विष पसरवतो आहे.
शत्रूच्या बलस्थानाचा विचार करुन रणनीती आखल्याशिवाय त्याचा पराभव करता येत नाही. हे करोनाविषयी खरं आहे आणि मोदी-शहांच्या भाजपविषयीसुद्धा. हा विषाणू घालवण्यासाठी दिर्घ पल्ल्याचं नियोजन करावं लागेल. केवळ निवडणुकीपुरता विचार करुन चालणार नाही. समाजातला एक वर्ग धर्मनिरपेक्षतेपासून दूर का गेला याचा विचार करावा लागेल. लोक मूर्ख आहेत वगैरे बेजबाबदार वक्तव्यं करुन भागणार नाही. भारतीय मतदाराच्या उपजत शहाणपणावर माझा विश्वास आहे. त्यांच्यातले दोष दाखवत बसण्यापेक्षा विरोधकांनी आपलं घर नीट लावलं पाहीजे. अहंकार, संकुचितपणा सोडून सगळे विरोधक एकत्र येणार आहेत का हा पहिला प्रश्न आणि ही फॅसिझमविरोधी मोहीम जनचळवळ होणार का हा दुसरा प्रश्न. जनतेच्या सहभागाशिवाय मोदी-शहांचा पराभव होऊ शकणार नाही. त्यासाठी सोशल मीडियाच्या बाहेर असलेल्या समाजाशी जाऊन बोलावं लागेल. त्यांना समजणाऱ्या भाषेत.
आजच्या निवडणुकीनंतर हे सगळं होणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे. केवळ मनात इमले बांधून फॅसिझमचा पराभव होणार नाही. दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा पराभव करण्यासाठी दोस्त राष्ट्रांची एकजूट, रणनीती आणि स्टॅलिनचं युद्धनेतृत्व महत्वाचं ठरलं हे विसरुन चालणार नाही. (आणि हो, स्टॅलिनने नंतर केलेल्या अत्याचाराचं समर्थन मी अजिबात करणार नाही. तेव्हा विषय सोडून नसता वाद घालू नका!😀)
बघू या, घोडामैदान जवळच आहे.
– निखिल वागळे (सुप्रसिद्ध पत्रकार)