उद्धव ठाकरे सांगोल्यात, गद्दार आमदारांचा घेणार समाचार
Shahajibapu Patil Sangola
सांगोला/नाना हालंगडे
उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर आमदार बनून शिवसेनेशीच गद्दारी केलेल्या महाराष्ट्रातील आमदार, खासदार व इतर गद्दार पदाधिकाऱ्यांवर तोफ डागण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत असून उध्दव ठाकरे यांची पुढील महिन्यात सांगोल्यात जंगी सभा होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही सभा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. ठाणे येथील टेंभी नाका येथून यात्रेची सुरुवात झाली. मुंबई तसेच कोकण भागात जंगी सभा घेऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांनी गद्दारांवर जोरदार टीका केली आहे.
सांगोल्याची सभा ठरणार वादळी
महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात सांगोला येथे होणारी सभा प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी बंड केल्यापासून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. खा. संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनाही त्यांनी सोडले नाही.
शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने दोन तरुण कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. त्यामध्ये शरद कोळी तसेच सांगोल्यातून लक्ष्मण हाके यांचा समावेश आहे. हे दोन्हीही तरुण नेते आमदार शहाजीबापू पाटील व शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या पदाधिकारी व आमदारांवर सडेतोड टीका करताना दिसत आहेत.
पक्षाने आमदारांचे कसे खच्चीकरण केले, पक्षात होत असलेली घुसमट त्यांनी चव्हाट्यावर आणली. खा संजय राऊत यांचा घमेंडीपणा त्यांनी लोकांपुढे मांडला. त्यांच्या या जहरी टीकेमुळे उद्धव ठाकरे यांनाही आमदार शहाजीबापू पाटील यांना प्रत्युत्तर द्यावे लागले. आता उद्धव ठाकरे हे स्वतः सांगोला येथे विराट सभा घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांचा हिसाब चुकता करण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यात होणार सभा
महाप्रबोधन यात्रे अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या आहेत दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, पंढरपूर, बार्शी तसेच सांगोला येथेही महाप्रबोधन यात्रेच्या सभा होणार आहेत. या सभांची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी सभा नेमक्या कोणत्या दिवशी व किती वाजता होणार आहे याबाबतची माहिती पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.
जिल्ह्यात दोन ताकदवान तरुण चेहरे
शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने दोन तरुण कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. त्यामध्ये शरद कोळी तसेच सांगोल्यातून लक्ष्मण हाके यांचा समावेश आहे. हे दोन्हीही तरुण नेते आमदार शहाजीबापू पाटील व शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या पदाधिकारी व आमदारांवर सडेतोड टीका करताना दिसत आहेत.
हेही पाहा
“तेव्हा शरद पवार कुठं होते?” : शहाजीबापूंची पुन्हा सडकून टीका