उजनी धरण भरले खरे; मात्र मनमानी पाणी वाटपाने रिते करु नका
प्रशासनासह शेतक-यांची जबाबदारी, वाटपाच्या त्रिसुत्रीची व्हावी अंमलबजावणी
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण १०४.४६ टक्के भरले आहे. मंगळवार सकाळपर्यंतची ही ताजी आकडेवारी आहे. धरण भरल्याने जिल्हावासिय व शेतक-यांना आनंद झाला असला तरी प्रशासन हा आनंद फार काळ टिकू देत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. ‘ज्याच्या हाती ससा, तोच पारधी’ हिच म्हण आजवर इथे खरी ठरत आलीय.
धरणामध्ये ११९.६२ टी.एम.सी. इतका एकूण पाणीसाठा झाला आहे. त्यापैकी ५६ टी.एम.सी. उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाची एकूण पाणीपातळी ही ४९७.०३० एवढी झाली आहे. धरण भरले असले तरी उजनीत वरील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. दौंड येथून २४.५२५ क्युसेक विसर्ग येत आहे. तर दुसरीकडे बंडगार्डन येथून ११.०६१ विसर्ग येत आहे.
यंदा वरुणराजाची कृपादृष्टी
उजनी धरणक्षेत्र व लाभ क्षेत्रात यंदा दमदार पाऊस होत आहे. चालू वर्षी १८ जुलै रोजी उजनी धरण प्लसमध्ये आले होते. त्यानंतर मागील दीड महिन्यामध्ये काहीशी संथ गतीने, परंतु नियमितपणे धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ होत होती. भीमा खोऱ्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांतून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
बळीराजा झाला खूश
पुणे, सोलापूर व अहमनगर जिल्ह्यासाठी उजनी धरण वरदायिनी मानले जाते. धरण शंभर टक्के भरल्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. या पाण्यामुळे उद्योगांनाही मुबलक पाणी मिळणार आहे.
सलग दुसऱ्या वर्षी ऑगस्टमध्ये उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. चालु वर्षी भीमा खोऱ्यामध्ये सुरुवातीपासुनच दमदार पाऊस सुरु असल्यामुळे या भागांमध्ये आडसाली उसाच्याही मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.
पाणी वाटपाचे योग्य नियोजन हवे
दरवर्षी पावसाळा सुरु झाला की शेतकरी व जिल्हावासियांचे डोळे उजनीकडे लागतात. कारण एेन उन्हाळ्यात उजनी धरण मायनसमध्ये जाते. अशावेळी लोकांना धरणाचे महत्त्व वाटू लागते. मात्र पावसाळ्यात धरण शंभर टक्के भरले की, लोक मागील दिवस विसरतात. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात लोकांना मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागतो. यात सर्वात मोठा दोष हा प्रशासनाचा आहे. कारण पाणी वाटपाच्या त्रिसुत्रीनुसार प्रथम पिण्यास, द्वितीय शेती व नंतर उद्योग असे सूत्र ग्राह्य धरण्यात आलेय. मात्र हे होताना दिसत नाही. धरणाचे पाणी अनेकदा मनमानीपणे उद्योगांना दिले जाते. परिणामी एेन उन्हाळ्यात शेतीला तर नाहीच नाही मात्र पिण्यासही पाणी शिल्लक राहात नाही. उजनी परिसरात ऊसशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या शेतीला जास्त पाणी लागते हे खरे असले तरी याही पेक्षा अधिकचे पाणी मनमानीपणे हितसंबंधी उद्याेगधंद्यांना दिले जाते, हे वास्तव आहे. पाणी वाटपात हितसंबंधी नेतेमंडळींचा हस्तक्षेप टाळायला हवा.
उजनीच्या पाण्याचे योग्य वाटप होण्यासाठी जलसंपदामंत्री, पालकमंत्री व स्थानिक प्रशासनाने नियोजन करण्याची गरज आहे. याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी शेतकरी व जिल्हावासियांचा दबावगट निर्माण होण्याची गरज आहे.