आ. गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक
आटपाडी येथील घटना, कार्यकर्ते जखमी
सांगली : थिंक टँक न्यूज नेटवर्क
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. आटपाडी येथे ही घटना घडली. या घटनेत कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत २१ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी २३ नोव्हेंबर केली जाईल. अर्ज मागे घेतल्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आ. पडळकर हे आटपाडी येटे आले होते. आटपाडी येथे सोसायटी गटातील उमेदवार फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले. या दोन्ही गटात चांगलाच वाद झाला. यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच पडळकर यांच्या ताफ्यातील काही गाड्यादेखील फोडण्यात आल्या.
आटपाडी येथील साठे चौकात हा प्रकार घडला आहे. या भागात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.