“आबासाहेब, आम्हाला सोडून जाऊ नका”, कार्यकर्त्यांची आर्त हाक
सांगोला तालुक्याचा जीव टांगणीला
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : “आबासाहेब तुम्ही आयुष्यभर एकनिष्ठेने लढलात, आम्हाला लढायला शिकवलं. सांगोला तालुक्याचा दुष्काळाचा कलंक मिटवलात.. अशा निर्णायक क्षणी आम्हाला पोरकं करू नका.. आबासाहेब आम्हाला सोडून जाऊ नका” अशी आर्त हाक सांगोला तालुक्यातील हजारो कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत.
सांगोला तालुक्याचे माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे. त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्याने चाहत्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. असे असले तरी अश्विनी रुग्णालय प्रशासनाने तसेच आबासाहेबांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. आबासाहेबांवर उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
• सांगोला तालुक्यात चुली पेटल्या नाहीत
माजी आ. गणपतराव देशमुख यांना मानणारा हजारो कार्यकर्त्यांचा वर्ग सांगोला तालुक्यात आहे. गणपतराव तथा आबासाहेबांना मानणा-या तिन पिढ्या सांगोल्यात आहेत. आबासाहेबांच्या निधनाची अफवा वा-यासारखी पसरली आणि अनेक बुजूर्ग मंडळींच्या दु:खाला पारावार उरला नाही. अनेकांनी या अफवामय असलेल्या सोशल मीडिया मेसेजना फॉरवर्ड केले. मात्र काही मिनिटांत नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे तालुकावासियांचा जीव भांड्यात पडला. आबासाहेबांची प्रकृती अतिशय नाजूक बनल्याने अनेक गावांत चुली पेटल्या नसल्याचे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ‘थिंक टँक लाईव्ह’शी बोलताना कळविले आहे.
• गावागावांत चिंतेचे वातावरण
आबासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी, ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी तालुक्यातील गावागावांत कार्यकर्ते घोळका करून जमल्याचे चित्र आहे. अनेकजण एेकमेकांना फोनकॉल करून विचारपूस करताना दिसत आहेत.
• अश्विनी रुग्णालयाबाहेर गर्दी
सोलापूरातील अश्विनी रुग्णालयात आबासाहेबांवर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती नाजूक बनल्याचे समजताच असंख्य कार्यकर्ते सोलापूरात आल्याचे दिसून येत आहे. रुग्णालय परिसरात गर्दी करण्यास अटकाव करण्यात आला असला तरी शेकडो कार्यकर्ते सोलापूरात तळ ठोकून आहेत.
पन्नास वर्षांहून अधिक काळ सांगोल्याचे नेतृत्व केलेल्या गणपतराव देशमुखांची तब्येत नाजूक बनल्याने कार्यकर्ते रात्र जागून काढत असल्याचे दिसत आहे.